पुणे: पेटता सिलेंडर बाहेर फेकला पण... आई-वडिलांसह मुलाचा जागीच गेला जीव, काळीज पिळवटून टाकणारी घटना!

मुंबई तक

पुणे येथील खराडी भागात गॅस गळतीमुळे झालेल्या प्रचंड स्फोटात बीड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

massive explosion in pune due to gas leak heartbreaking tragic deaths of a son and his parents from Beed district
Pune Gas leak (प्रातिनिधिक फोटो)
google news

रोहिदास हातागळे, बीड: पुणे येथील खराडी भागात गॅस गळतीमुळे झालेल्या प्रचंड स्फोटात बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीमध्ये शुक्रवारी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. सिलेंडर बदलत असताना अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात आणि परळी तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.

विष्णू मुंजाजी गिते (वय 60), पांडुरंग विष्णू गिते (वय 35) आणि वृंदावनी विष्णू गिते (वय 55, सर्व सध्या रा. खांदवेनगर, खराडी, पुणे, मूळ रा. नंदागौळ, ता. परळी, जि. बीड) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी सदस्यांची नावे आहेत. या दुर्घटनेत राजेश्री पांडुरंग गिते आणि निहारिका पांडुरंग गिते (वय 5 वर्षे) या किरकोळ जखमी झाल्या असून त्या सुदैवाने थोडक्यात बचावल्या आहेत. हे कुटुंब कामानिमित्त पुण्यामध्ये स्थायिक झाले होते.

नेमकं काय घडलं?

खांदवेनगर परिसरातील एका घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर संपल्याने दुसरा सिलेंडर लावण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी अचानक गॅसची मोठी गळती होऊन सिलेंडरने पेट घेतला. पांडुरंग गिते यांनी प्रसंगावधान राखून पेटता सिलेंडर गॅलरीतून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच क्षणी घरात पसरलेल्या गॅसचा प्रचंड स्फोट झाला. या आगीत घरात असलेले विष्णू, पांडुरंग आणि वृंदावनी हे तिघेही गंभीररीत्या भाजले. त्याच वेळी सून राजेश्री या बाथरूममध्ये आणि पाच वर्षांची मुलगी निहारिका गॅलरीत असल्याने त्या दोघी या भीषण आगीतून सुखरूप बचावल्या.

हे ही वाचा>> 'तू उशीरा का आलीस?' हात-पाय बांधले अन् गरम इस्त्रीने...; पोलिसानं हे काय केलं?

घटनेची माहिती मिळताच खराडी, येरवडा आणि धानोरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. गंभीर जखमी झालेल्या तिघांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि छताचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद चंदननगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक या दुर्घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

हे वाचलं का?