मुंबई: देशभरात मान्सूनच्या प्रगतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भारतीय हवामान विभाग (IMD) आणि खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदर यांच्या अंदाजांमध्ये काहीसा फरक दिसून येत आहे. सध्या मान्सूनने ईशान्य भारत, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांपर्यंत प्रगती केली असून महाराष्ट्रातील कोकण आणि दक्षिण भागातही त्याने हजेरी लावली आहे. मात्र, पुढील वाटचाल अपेक्षेपेक्षा काहीशी मंदावू शकते, असा अंदाज स्कायमेट वेदरने व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
मान्सून नेमका कुठपर्यंत पोहोचला?
IMD च्या माहितीनुसार 6 जूनपर्यंत नैऋत्य मान्सूनने ईशान्य भारतातील सर्व राज्ये, संपूर्ण सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागांना व्यापले आहे.
महाराष्ट्रात पाहिल्यास सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण कोकण किनारपट्टी मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हे ही वाचा>> बीड: अधिक मासात जावयाला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पुढं काय घडलं?
तसेच 10 ते 20 जूनदरम्यान मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो, असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
स्कायमेटचा वेगळा अंदाज का?
स्कायमेट वेदरच्या मते, सध्या मान्सूनची प्रगती सुरू असली तरी बंगालच्या उपसागरात मान्सूनला गती देणारी पोषक हवामान प्रणाली सक्रिय झालेली नाही.
हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनच्या जलद प्रगतीसाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) किंवा चक्राकार वाऱ्यांची (Cyclonic Circulation) निर्मिती होणे आवश्यक असते. अशा प्रणाली तयार झाल्यास मान्सूनला मध्य आणि पूर्व भारतात वेगाने आगेकूच करण्यास मदत मिळते.
हे ही वाचा>> मुंबईची खबर : मुंबईकरांनो, काळजी घ्या! यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्र खवळणार; बीएसीनं काय सांगितलं?
सध्या मात्र अशी कोणतीही प्रभावी प्रणाली तयार झालेली नसल्यामुळे मान्सूनची गती काही प्रमाणात मंदावू शकते, असे स्कायमेटने म्हटले आहे.
किनारपट्टीवर मुसळधार पाऊस, अंतर्गत भागात तुलनेने कमी प्रभाव
IMD च्या पर्जन्यमान नकाशानुसार कोकण-गोवा, केरळ आणि किनारी कर्नाटक या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मात्र तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंतर्गत कर्नाटकातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. यामुळे मान्सून अद्याप देशाच्या अंतर्गत भागांमध्ये पूर्ण ताकदीने पोहोचलेला नसल्याचे चित्र दिसत आहे.
कोकण-गोव्यासाठी यलो अलर्ट
हवामान विभागाने कोकण-गोवा, केरळ आणि किनारी कर्नाटकासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माजी हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनीही दक्षिण कोकण, गोवा, उत्तर कर्नाटक आणि केरळच्या काही भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सध्या अरबी समुद्रातून मिळणाऱ्या आर्द्रतेमुळे कोकण, गोवा आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. मात्र बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली तयार न झाल्यास मान्सूनची पुढील वाटचाल काहीशी संथ राहू शकते.
त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील उर्वरित भागात मान्सून वेळेत पोहोचतो की काही दिवस विलंब होतो, याकडे आता हवामान तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. बंगालच्या उपसागरातील पुढील हवामान घडामोडींवर मान्सूनच्या गतीचे गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार आहे.
ADVERTISEMENT











