सातारा : सरकारी अभियंत्याचा अपघात, 3 लाखांची सुपारी, बायकोचा कट

मुंबई तक

10 Jun 2026 (अपडेटेड: 10 Jun 2026, 11:11 AM)

Karad Crime News : कराडमधील अभियंता लक्ष्मण मंडले यांच्या मृत्यूचे प्रकरण धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या घटनेमागे कथितपणे पत्नी, प्रियकर आणि साथीदारांनी रचलेला हत्येचा कट असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Karad Crime News

Karad Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सातारा : सरकारी अभियंत्याचा अपघात

point

3 लाखांची सुपारी, बायकोचा कट

Karad Crime News : कराडमध्ये जलसंपदा विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या 54 वर्षीय लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या मृत्यूच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. 6 जूनच्या पहाटे मुंबईहून कराडमध्ये परतलेल्या मंडले यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. पहाटे सुमारे 5.20 वाजता ते बसमधून उतरून घराच्या दिशेने निघाले होते. सुपर मार्केट परिसरात पोहोचताच मागून भरधाव वेगाने आलेल्या एका ऑल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा एक सामान्य रस्ते अपघात असल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते. मात्र तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्याने पोलिसांनी अधिक सखोल चौकशी सुरू केली.

हे वाचलं का?

हेही वाचा : Personal Finance: महाराष्ट्रातील टॉप 10 जागा.. 'इथे' फ्लॅट खरेदी केल्यानंतर मिळेल जबरदस्त पैसा!

अनैतिक संबंधातून सरकारी अभियंत्याचा खून  

त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, फॉरेन्सिक पुरावे आणि डिजिटल ट्रेल यांचा आधार घेत तपासाची दिशा बदलली. या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मृतकाची पत्नी सारिका मंडले हिचे 2023 पासून प्रथमेश थोरात याच्यासोबत प्रेमसंबंध होते. याच संबंधातून लक्ष्मण मंडले यांना कायमचे मार्गातून दूर करण्याचा कथित कट रचण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सारिका मंडले, तिचा प्रियकर प्रथमेश थोरात आणि त्याच्या साथीदारांनी मिळून संपूर्ण योजना आखली होती. या योजनेचा भाग म्हणून एक ऑल्टो कार खरेदी करण्यात आली होती. लक्ष्मण मंडले कराडमध्ये कधी पोहोचणार आणि कोणत्या मार्गाने घरी जाणार याची माहिती आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आली होती.

हेही वाचा : समजून घ्या: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंडीत नेहरूंचा रेकॉर्ड खरंच मोडला?

अॅल्टो कारने चिरडून केला खून 

तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 6 जूनच्या सकाळी मंडले यांचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले. कोल्हापूर नाका परिसरातील कमल हॉस्पिटलसमोर योग्य संधी साधून कारने त्यांना मागून धडक देण्यात आली. मात्र केवळ एकदाच धडक देऊन आरोपी थांबले नाहीत. पहिल्या धडकेनंतरही मंडले जिवंत असल्याचा संशय आरोपींना होता. त्यामुळे कार पुन्हा त्यांच्या अंगावर घालण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. यानंतर आरोपींनी त्यांची बॅग घेतली आणि मोबाईल फोनही काढून घेतला. कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी हा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण कटासाठी तीन लाख रुपयांची आगाऊ सुपारी देण्यात आल्याचेही तपासात समोर आले असून एकूण व्यवहार किती रकमेचा होता याचा तपास अद्याप सुरू आहे.

या प्रकरणात पोलिसांनी सर्वप्रथम सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम चव्हाण यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान महिलेने नवरा त्रास देत असल्याचे सांगितले आणि त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा दावा केल्याची माहिती तपासातून समोर आली. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे प्रथमेश थोरात तसेच त्याचा साथीदार आकाश अशोक होनसुरे यांनाही अटक करण्यात आली. 

डीवायएसपी राजश्री पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले 5 जून रोजी सुट्टीसाठी येणार असल्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर ती प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला देण्यात आली होती. मंडले यांनी कराडमध्ये पोहोचल्यानंतर पत्नीला संपर्क करून आपण आल्याची माहिती दिली आणि त्यानंतर ती माहिती आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आली. पोलिसांच्या मते, आकाश होनसुरे कार चालवत होता तर प्रथमेश थोरात त्याच्या शेजारी बसला होता. सुरुवातीला तीन लाख रुपयांचे पेमेंट झाले होते आणि आणखी रक्कम देण्याचे ठरले होते. अपघाताचा मुखवटा चढवून करण्यात आल्याचा दावा असलेल्या या कथित हत्येच्या कटामुळे कराडमधील हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.