भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे. विराट कोहलीने दिवाळी साजरी करण्याबद्दल टिप्स देणार असल्याचं सांगत एक व्हिडीओ ट्वीट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी कोहलीला ट्रोल करण्यास सुरूवात केली.
ADVERTISEMENT
भारतीय संघाचं एकदिवसीय आणि टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयामुळे आतापर्यंत चर्चेत असलेल्या कोहलीला सोमवारी नेटकऱ्यांनी वेगळ्याच कारणांवरून ट्रोल केलं. विराट कोहलीने एक व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर ट्विटरवर नाराजी आणि संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे ट्विटरवर #भौंक_मत_कोहली हा हॅशटॅग ट्रेंड झाला.
विराट कोहलीवर नेटकरी का भडकले?
दसरा झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बाजारपेठांसह सगळीकडे दिवाळीची लगबग दिसत आहे. कंपन्यांनी उत्पादनांच्या जाहिराती सुरू केल्या आहेत.
दरम्यान, दिवाळीचे वेध लागलेले असताना विराट कोहलीने एक व्हिडीओ ट्वीट केला. ज्यात विराट कोहली म्हणतो, ‘भारत आणि जगभरातील लोकांसाठी हे वर्ष खूप कठीण होतं. प्रत्येकजण आता दिवाळीची वाट पाहत आहे आणि मी तुम्हाला तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत दिवाळी कशी साजरी करायची. तसेच सणाबद्दल काही टिप्स देईन’, असं आवाहन कोहलीने केलं आहे.
विराट कोहलीच्या या व्हिडीओनंतर सुनो कोहली हा हॅशटॅग ट्रेंड झाला. त्यानंतर #भौंक मत कोहली हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. सेलिब्रिटी दिवाळी आल्यानंतर फटाके न फोडण्याचं आवाहन करतात. त्याचबरोबर ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन करतात. कोहलीही हेच सांगणार असल्याच्या शंकेवरून नेटकऱ्यांनी कोहलीला ट्रोल केलं आहे.
वाढते प्रदूषण आणि हवामान बदलामुळे सण साजरेपणाने साजरे करण्याचं आवाहन सेलिब्रेटींकडून नेहमीच केलं जातं. दिवाळीतही फटाके न फोडण्याचं आवाहन सेलिब्रेटी आणि विविध जाहिरातीमधून केलं जातं. मात्र, यावर अनेकजण नापसंती दर्शवतात.
ADVERTISEMENT
