”आम्ही ५० थरांची हंडी फोडली” ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंची टोलेबाजी

मुंबई तक

• 01:48 PM • 19 Aug 2022

आम्ही ५० थरांची हंडी फोडली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात राजकीय टोलेबाजी केली. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात जी दहीहंडी आयोजित करण्यात आली होती तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड केलं. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आणि […]

Mumbaitak
follow google news

आम्ही ५० थरांची हंडी फोडली असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात राजकीय टोलेबाजी केली. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात जी दहीहंडी आयोजित करण्यात आली होती तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं आहे. २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड केलं. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आणि उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला तसंच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडीचा उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रात गेला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभीनाका या ठिकाणी येऊन सलामी देऊन जातो. आपला इतिहास आणि परंपरा हीच आहे ही परंपरा वाढवण्याचं आणि पुढे घेऊन जाण्याचं, जोपासण्याचं काम आपण करत आहोत.

ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे आनंद दिघे यांचं स्वप्न

ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे मी मुख्यमंत्री झालो आणि मला या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाता आलं, मी हे माझं भाग्य समजतो असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

५० थरांची हंडी आम्ही फोडली

दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब ठाकरेंच्या आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील याची काळजी करण्याची गरज नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाण्यातल्या टेंभी नाका भागात दहीहंडी आयोजित करण्यात आली. या दहीहंडीला अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली होती.

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

अभिनेत्री श्रद्धा कपूरने या वेळी मराठीत भाषण केलं. तिचंही कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. त्यांची आई कोल्हापुरे आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर कपूर आडनाव असलं तरी मी मराठीच आहे असं श्रद्धा म्हणाली. श्रद्धा कपूर ही अभिनेते शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांची मुलगी आहे. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि दिग्दर्शिका तेजस्विनी कोल्हापुरे या तिच्या मावशी आहेत.

    follow whatsapp