लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही विद्यार्थी का झाला पॉझिटिव्ह?

मुंबई तक

• 06:11 AM • 01 Mar 2021

मुंबई: सायन हॉस्पिटलमधील 21 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याला कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचं आढळून आलंय. फ्लू सदृश्य लक्षणं जाणवू लागल्याने या विद्यार्थ्याने कोरोना चाचणी केली. तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. याबद्दल माहिती देताना सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, ‘लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. मात्र, यात […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: सायन हॉस्पिटलमधील 21 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थ्याला कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्याचं आढळून आलंय. फ्लू सदृश्य लक्षणं जाणवू लागल्याने या विद्यार्थ्याने कोरोना चाचणी केली. तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.

हे वाचलं का?

याबद्दल माहिती देताना सायन हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले, ‘लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. मात्र, यात घाबरण्यासारखं काहीच नाही. लस घेतल्यावर रोगप्रतिकार शक्ती लगेच निर्माण होत नसल्याने हे घडलंय.’

लस घेतल्यानंतर रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे लस घेतल्यावरही कोरोनाच्या नियमांचं तंतोतंत पालन करणं तितकच आवश्यक असल्याचंही डॉ. जोशी यांनी मुंबई तकशी बोलताना स्पष्ट केलं.

‘या विद्यार्थ्याने लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यामुळे त्याला कोरोनाची सौम्य लक्षणं आढळून आली. मात्र दुसऱ्या डोसनंतर रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यापूर्वीच त्याला लागण झाली. केवळ कोरोनाच नाही तर कुठल्याही आजारात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्यापूर्वी अशाप्रकारे आजाराची लागण होऊ शकते.

आम्ही कोरोना लस घेतलेल्या प्रत्येकाला पुढील दोन महिन्यांसाठी कोरोनाच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना देतो. त्याचं पालन होणं अत्यंत गरजेचं असतं. तसं झालं नाही तर अशाप्रकारे लागण होण्याची शक्यता असते,’ असंही ते म्हणाले.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला विद्यार्थी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात आहे. शनिवारी त्याचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर आता त्याला मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलंय.

या विद्यार्थ्याला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलंय.

‘या विद्यार्थ्यांची अंतिम वर्षाची परीक्षा लवकरच सुरू होणार होती. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आल्यावर त्यांच्या परीक्षेसंदर्भातला पुढील निर्णय घेतला जाईल’, असंही जोशी यांनी सांगितलं.

    follow whatsapp