महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वाढते आहे. २१ ते ३१ मार्च या कालावधीत राज्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली. या सगळ्यामध्ये विशेष नोंद घेण्याची बाब ही की लहान मुलांमध्येही कोरोनाचं संक्रमण वाढू लागलं आहे. ११ ते २० या वयोगटात कोरोना होण्याचं प्रमाण राज्यात वाढतं आहे. याबद्दल तात्याराव लहाने यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत लॉकडाऊन होणार का? BMC आयुक्त चहल यांची Exclusive मुलाखत
काय म्हणाले आहेत डॉ. तात्याराव लहाने?
महाराष्ट्रात जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा कोरोनाचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांना होत होता. आता दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग लहान मुलांमध्ये जास्त होतो आहे असं दिसून येतं आहे. साथरोग आजाराचे विषाणू हे त्यांचं स्वरूप बदलत असतात. पहिल्या लाटेत आलेला हा विषाणू हाच होता मात्र आता त्याचं स्वरूप बदललं आहे. पहिल्या लाटेत तीन-चार लोकांना संसर्ग होत होता. सध्याच्या घडीला या विषाणूचं बदललेलं स्वरूप हे एकापासून दहा जणांना संसर्ग करणारं ठरतं आहे. २० ते ४० या वयोगाटातील जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे.
१० ते २० वर्षांची जी मुलं यांच्यात जो संसर्ग वाढतो आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मुलांना कोरोना होतो आहे म्हणून आई-वडिलांनी घाबरून जाऊ नये. यामध्ये सौम्यता आहे.. जर तुमच्या मुलांमध्ये अशा काही आजाराची लक्षणं आढळली तर डॉक्टरांकडे जावं. विषाणूचं स्वरूप बदलल्याने कमी वयोगटाच्या मुलांनाही कोरोनाची लागण होते आहे. ११ ते २० वयोगटात मृत्यूचं प्रमाण नाही. तीव्र स्वरूपाचा आजार यामध्ये होत नाही, सौम्य स्वरूपाचा आजार होतो आहे. तो लवकर बराही होतो आहे, त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन तात्याराव लहाने यांनी केलं आहे.
परीक्षेला जात असताना मुलांनी कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री पाळावी. हात धुणे, सॅनेटायझर वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री प्रत्येक मुलाने पाळली पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असंही आवाहन तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असते त्यामुळे त्यांना कोरोना झाला तरीही तो सौम्य स्वरूपाचा होतो आणि तो लवकर बराही होतो.
पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
जे पालक घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे
जेवण करताना, चहा पित असताना शक्यतो एकट्याने या गोष्टी कराव्यात म्हणजे समोरच्या माणसाच्या संपर्कात तुम्ही येणार नाही
बाहेरून, ऑफिसमधून घरी आल्यानंतर अंघोळ करावी, स्वतःला सॅनिटाईझ करावं त्यानंतर लहान मुलांच्या जवळ जावं
आपली बॅग, आपण बाहेर नेलेल्या वस्तू यादेखील सॅनेटाईझ कराव्यात, एका कुटुंबात एका माणसाला कोरोना झाला तर तो संपूर्ण कुटुंबाला होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.
जर लहान मुलं बाहेरून घरात येत असतील तर त्यांनीही हात-पाय धुणे, आंघोळ करणे, स्वतःला सॅनेटाईझ करणं, मास्क वापरणं या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. मास्क लावला, हात धुतले, सुरक्षित अंतर ठेवलं तर कोरोना होत नाही हे पालकंनीही मुलांना समजावून सांगितलं पाहिजे त्यांच्याकडून या सगळ्या कृती करून घेतल्या पाहिजेत.
ADVERTISEMENT











