वाल्मीकने जेलमधून कसा कट रचला? बजरंग सोनवणेंचे तुरुंग प्रशासनावरही गंभीर आरोप

मुंबई तक

02 Oct 2026 (अपडेटेड: 02 Oct 2026, 08:53 AM)

Bajrang Sonawane on walmik karad audio clip : विलास घुले हत्या प्रकरणात सौरभ सोनवणे यांना अडकवण्यासाठी कट रचल्याचा बजरंग सोनवणेंचा आरोप. वाल्मीक कराड, सुग्रीव कराड आणि रमेश घुले यांच्यावर आरोप करत कथित ऑडिओ क्लिप ऐकवली.

Bajrang Sonawane on walmik karad audio clip

Bajrang Sonawane on walmik karad audio clip

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वाल्मीकने जेलमधून कसा कट रचला?

point

बजरंग सोनवणेंचे तुरुंग प्रशासनावरही गंभीर आरोप

Bajrang Sonawane on walmik karad audio clip : वाल्मीक कराड, सुग्रीव कराड आणि रमेश घुले यांनी मिळून आपला मुलगा सौरभ सोनवणे याला विलास घुले हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी कट रचल्याचा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. हा कट तुरुंगातून रचण्यात आल्याचा दावा करत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत एक कथित ऑडिओ क्लिपही ऐकवली. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून सत्यता पडताळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, बजरंग सोनवणे यांनी 'मुंबई Tak'वर याबाबत सविस्तर भाष्य केलं. ते नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..  

हे वाचलं का?

हेही वाचा : Weather Update: महाराष्ट्रात मान्सूनची ‘एक्झिट’ की पावसाचा आणखी एक डाव? पाहा हवामानाचा ताजा अंदाज

सौरभ सोनवणेंवर केलेले आरोप प्रत्येक वेळी बदलत गेले- बजरंग सोनवणे 

बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांचा 21 जून रोजी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सुरुवातीला विलास घुले यांच्या नातेवाईकांकडून सौरभ सोनवणे यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर सौरभ सोनवणे यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचा दावा बजरंग सोनवणे यांनी केला. सुरुवातीला मुलगा घटनास्थळी गेला, आरोपींना साथ दिली, पोलिसांवर दबाव आणला आणि आरोपींना पळून जाण्यास मदत केली, अशा स्वरूपाचे आरोप करण्यात आले. मात्र, हे आरोप प्रत्येक वेळी बदलत गेले, असंही सोनवणे यांनी नमूद केलं. विलास घुले यांना मारहाण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अंबाजोगाईला हलवण्यात आले आणि घटनेनंतर सुमारे दीड दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा : Personal Finance: मोबाईल नंबर बंद झाला तर तुमचे पैसे अडकू शकतात का? एक छोटी चूक आणि मोठा त्रास!

तुरुंग प्रशासनाचीही चौकशी करण्याची सोनवणेंची मागणी 

आपल्या मुलाला या प्रकरणात अडकवण्यासाठी वाल्मीक कराड याने तुरुंगातून सुग्रीव कराड याला फोन केल्याचा दावा सोनवणे यांनी केला. या फोनवरील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवण्यात आली. या संभाषणात सौरभ सोनवणे यांना प्रकरणात अडकवण्यासंदर्भात सूचना असल्याचा दावा त्यांनी केला. वाल्मीक कराड, सुग्रीव कराड आणि रमेश घुले यांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप सोनवणे यांनी केला. तसेच तुरुंग प्रशासनाच्या मदतीशिवाय अशा प्रकारचा फोन होऊ शकत नाही, त्यामुळे तुरुंग प्रशासनाचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून आवाज आणि कॉल रेकॉर्डची तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली असून क्लिप खोटी ठरल्यास आपल्यावर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात आपल्याकडे आणखी पुरावे असल्याचेही बजरंग सोनवणे यांनी सांगितले. मात्र, सध्या समोर आणलेली ऑडिओ क्लिप हा केवळ ‘ट्रेलर’ असून आधी या क्लिपच्या आधारे चौकशी आणि कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या आणि आपल्या मुलाच्या बदनामीसाठी विविध आरोप करण्यात आल्याचा दावा करत संबंधितांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणातील कथित कटाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन पत्र देणार असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.