Shrinivas Vanga joins bjp , पालघर : पालघर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, शिंदेंच्या शिवसेनेतील माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार हेमंत सावरा आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खासदार क्रीडा महोत्सवाच्या व्यासपीठावर वनगा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. वनगा यांच्या या प्रवेशामुळे पालघर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेत बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या वनगा यांनी आता शिंदे गटाची साथ सोडली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीचा विचार भाजपने ही महत्त्वाची राजकीय खेळी केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'खोलवरच्या जखमा जालीम औषधानेच भरतात', शंभूराज देसाईंनी वचपा काढला! जयकुमार गोरेंचा यु-टर्न
शिंदेंनी 2024 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली
भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आले. पुढे शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ दिली. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे वनगा नाराज झाले होते. काही दिवस ते राजकीय संपर्कापासून दूर राहिले. त्यानंतर समोर येत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनीही शिंदे गटाविरोधात नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा : गोंदिया : एअर होस्टेसच्या हत्येचा धक्कादायक उलगडा; प्रेमसंबंधाला वैतागून 13 लाखांची सुपारी, मास्टरमाईंड कोण?
गेले काही महिने श्रीनिवास वनगा राजकारणापासून अलिप्त होते
या घडामोडींनंतर काही महिने श्रीनिवास वनगा राजकारणापासून अलिप्त राहिले होते. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत पुन्हा सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आपण घरवापसी केल्याचे वनगा यांनी सांगितले. राजकीय घडामोडींमुळे आपण भरकटलो होतो, मात्र आपला मूळ राजकीय पिंड भाजपचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही वनगा यांच्या प्रवेशावर प्रतिक्रिया दिली. मागील काळात त्यांचे गैरसमज दूर करण्यात भाजपला अपयश आले होते. मात्र, आता त्यांची घरवापसी झाली असून, त्यांच्या पक्षप्रवेशाचा भाजपला निश्चितच फायदा होईल, असे चव्हाण यांनी म्हटले.
पालघरमध्ये शिंदेसेनेला झटका
दरम्यान, पालघर जिल्ह्यात याआधीच रिलीफ रुग्णालयातील राडा प्रकरणामुळे शिंदे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी झाली आहे. अशा परिस्थितीत माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेच्या राजकीय ताकदीवर काय परिणाम होणार, याकडे लक्ष लागले आहे. वनगा यांच्या प्रवेशामुळे पालघर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वनगा यांना भाजपकडून कोणती जबाबदारी दिली जाणार आणि त्यांच्या प्रवेशाचा आगामी निवडणुकीत किती फायदा होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT












