जिल्हा बँकेच्या सत्तेत भाजप बाहेर? शिवेंद्रराजेंनी सांगितली पडद्यामागची संपूर्ण कहाणी

इम्तियाज मुजावर

• 04:40 PM • 18 Nov 2026

सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीतील राजकीय चर्चांना वेग आला असून शिवेंद्रराजे भोसले यांनी वरिष्ठांच्या सूचनांनुसार काम केल्याचा खुलासा केला आहे.

bjp minister shivendraraje bhosale satara district bank election mahayuti dispute

शिवेंद्रराजे भोसले

Google CTA

सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवरून महायुतीतील राजकीय चर्चांना वेग आला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निर्णय घेतल्याने भाजपच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी संपूर्ण प्रक्रियेवर भाष्य करत वरिष्ठांच्या सूचनांनुसार आपण काम केल्याचा दावा केला. महायुतीतच निवडणूक लढवायची आणि कुठेही वाद होऊ द्यायचा नाही, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

वरिष्ठांचे निरोप मित्रपक्षांपर्यंत पोहोचवले

जिल्हा बँकेच्या निवडीबाबत वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेतील सूचना आपण महायुतीतील सहकारी पक्षांच्या नेत्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. अगदी निवडीच्या दिवशी सकाळपर्यंत आलेले निरोपही संबंधित नेत्यांना दिले होते. मात्र, त्यानुसार निर्णय झाला नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने एकत्रितपणे वेगळा निर्णय घेतला, असं शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा>> 'या' जिल्हा बँकेत भाजपने केला मोठा गेम! 10 जागा बिनविरोध, महाविकास आघाडी बॅकफुटवर

या संपूर्ण प्रक्रियेत आपण कुणाशीही गुपचूप बैठक घेतली नाही किंवा परस्पर तडजोड करण्याचा प्रयत्न केला नाही. सर्व बैठकींमध्ये खासदार धैर्यशील यांना सोबत घेऊनच गेलो, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार माघार घेतली

निवडणुकीच्या प्रक्रियेत भाजपने काही जागांवर माघार घेतली. साताऱ्यात मतांचा पाठिंबा असूनही मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पक्षाने माघार घेतल्याचं शिवेंद्रराजेंनी सांगितलं. पक्ष आणि मुख्यमंत्री यांचा निर्णय अंतिम मानून आम्ही त्यानुसार काम केलं. मात्र, निवडणुकीदरम्यान आमच्या उमेदवारांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा>> सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठी उलथापालथ; खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांची अचानक माघार

जयकुमार गोरे यांनी जिल्हा बँकेच्या निवड प्रक्रियेत आपली भूमिका नसल्याचं म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रराजेंनी अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. निवड झाली तर सगळे पुढे येतात, पण निर्णय झाला नाही तर जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली जाते, ही भूमिका योग्य नसल्याचं ते म्हणाले.

'राजकीय वचपा काढण्यासाठी बँकेचा वापर नको'

जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात भाजप कमी पडला का, असा प्रश्न विचारला असता शिवेंद्रराजेंनी यावर थेट भाष्य टाळलं. पक्ष म्हणून सर्वांनी प्रयत्न केले असून पुढील राजकीय निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील, असं त्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पातळीवर याबाबत चर्चा होऊ शकते, असंही ते म्हणाले.

जिल्हा बँकेच्या राजकारणात व्यक्तिगत हेवेदावे किंवा वचपा काढण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही बँक हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांची शेती, मुलांचं शिक्षण, सहकारी सोसायट्या आणि साखर कारखान्यांचं आर्थिक व्यवहार बँकेच्या माध्यमातून चालतात. त्यामुळे बँकेचा राजकीय संघर्षासाठी वापर झाल्यास संस्थेला अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी जावळीतील राजकीय विषय मांडल्याच्या चर्चाही शिवेंद्रराजेंनी फेटाळल्या. आपण केवळ विकासकामांच्या मंजुरीसाठी भेट घेतली होती. शाहू कला मंदिर, राजपथ आणि रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासह काही प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

जिल्हा बँकेच्या निवडीवरून महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असतानाच शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्यामुळे साताऱ्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात महायुतीतील वरिष्ठ नेते या विषयावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.