5 हजार 675 कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प 56.75 कोटी रुपयांचा कसा झाला? विवेकानंद पाटीलचा सवाल

सुमित भुजबळ

17 Nov 2026 (अपडेटेड: 17 Nov 2026, 09:12 AM)

Vivekanand Patil on tarli pump storage project : तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधातील आंदोलनात विवेकानंद पाटील यांचा सहभाग. सह्याद्रीतील प्रस्तावित 23 प्रकल्प रोखण्यासाठी तीव्र लढा देण्याचा इशारा.

Vivekanand Patil on tarli pump storage project

Vivekanand Patil on tarli pump storage project

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तारळीतील शेतकरी आंदोलनात प्रसिद्ध व्याख्याता विवेकानंद पाटीलने हजेरी लावली

point

साताऱ्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला विरोध

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात प्रस्तावित तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध केला जात आहे. या प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात MPSC आंदोलनातून चर्चेत आलेल्या विवेकानंद पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला थेट आव्हान दिले. सह्याद्रीच्या रांगांमध्ये प्रस्तावित असलेले 23 प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. या प्रकल्पांमुळे सह्याद्रीतील पर्यावरणाचे नुकसान होण्याबरोबरच वाघांच्या अधिवासालाही धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. धरण परिसरात झालेल्या सभेला स्थानिक नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

हे वाचलं का?

हेही वाचा : 'मी गर्लफ्रेंडला त्याच रेस्टॉरंटमध्ये नेलं होतं, जिथे...', राहुल गांधींनी सांगितला खास किस्सा!

5 हजार 675 कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प 56.75 कोटी रुपयांचा कसा झाला?

विवेकानंद पाटील यांनी तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाच्या खर्चातील बदलावर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, 5 हजार 675 कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प अचानक 56.75 कोटी रुपयांचा कसा झाला? याची चौकशी होणे आवश्यक आहे. वन विभागाला द्यायची असलेली रक्कमही यामुळे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा आरोप त्यांनी केला. वन विभागाला 226 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 2 कोटी 26 लाख रुपये देण्यात येणार असल्याचा दावा त्यांनी केला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असे प्रकल्प प्रस्तावित करणे आणि पर्यावरणाचे नुकसान होईल अशा पद्धतीने काम करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. प्रकल्पाची माहिती आणि पर्यावरणासंदर्भातील आराखडा स्थानिक नागरिकांना आधी दाखवला जात नाही. प्रकल्पाचे काम मोठ्या प्रमाणात पुढे गेल्यानंतरच नागरिकांना त्याची माहिती मिळते, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा : Personal Finance: सरकारी कंत्राटदारांना निधी देऊन कमाई करता येते? पण 'हे' गणित समजून घ्या!

पोलीस प्रशासनाला तक्रार अर्ज दिल्याची माहिती दिली

या प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड आणि गौण खनिजांचे उत्खनन होत असल्याचा आरोप विवेकानंद पाटील यांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून मुरूम आणि इतर गौण खनिजांची वाहतूक कोणत्या अधिकारात केली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. मात्र, पोलिसांवर अनावश्यक दबाव आणणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी सध्या पोलीस प्रशासनाला तक्रार अर्ज दिल्याची माहिती दिली. या अर्जाची चौकशी करून वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महसूल, वन आणि पर्यावरण विभागानेही या प्रकरणात आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले. या प्रकरणात न्यायालयीन मार्गानेही लढा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये प्रस्तावित असलेले 23 प्रकल्प रोखण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. अदानी असो किंवा अंबानी, कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात झालेल्या बदलासह इतर अनियमिततांची चौकशी झाली पाहिजे, असे विवेकानंद पाटील म्हणाले. या लढ्यात सयाजी शिंदे, स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्रातील पर्यावरणप्रेमी सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले. केवळ एका जिल्ह्याचा हा प्रश्न नसून सह्याद्रीमुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या पर्यावरणावर परिणाम होत असल्याने सर्व लोकप्रतिनिधींनी या विषयावर भूमिका मांडली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलनाची ही केवळ सुरुवात असून पुढील प्रकल्प जिथे प्रस्तावित होतील, तिथे जाऊन विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. सह्याद्रीतील 23 प्रकल्पांना विरोध करण्याचा लढा शेवटपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.