'ते मफलर मॅन.. देवेंद्र फडणवीस', अजित पवार मृत्यू प्रकरणी रोहित पवारांचा मोठा आरोप!

सुमित भुजबळ

16 Nov 2026 (अपडेटेड: 16 Nov 2026, 05:43 PM)

Rohit Pawar Press Conference : रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांचा मफलर घातलेला फोटो दाखवत अजित पवार अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप केले. व्ही. के. सिंग आणि व्हीएसआरला वाचवणारे नेते फडणवीस असल्याचा दावा त्यांनी केला.

Rohit Pawar Press Conference

Rohit Pawar Press Conference

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'ते मफलर मॅन.. देवेंद्र फडणवीस'

point

अजित पवार मृत्यू प्रकरणी रोहित पवारांचा मोठा आरोप!

Rohit Pawar Press Conference :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला एक फोटो दाखवला. हा फोटो उद्योगपती रोहित सिंह यांच्या लग्नातील असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार मफलरवाल्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचं सांगत होते. अखेर आज त्यांनी पत्रकार परिषदेत हा फोटो दाखवत आपले आरोप मांडले.

हे वाचलं का?

हेही वाचा : लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर देशमुखांची सत्ता; भाजपचा दारुण पराभव.., कोणी किती जागा जिंकल्या?

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्योगपती राघव सिंह याला पाठीशी घातल्याचा आरोप केला. तसेच व्ही. के. सिंह आणि व्हीएसआरला वाचवणारे नेते देवेंद्र फडणवीस आहेत, असंही ते म्हणाले. अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र, अजितदादांच्या अपघातामागे किंवा घातपातामागे फोटोमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा संबंध नसावा, असं मतही रोहित पवार यांनी व्यक्त केलं. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या फोटोतील व्यक्ती आणि अजित पवार यांच्या अपघाताचा थेट संबंध असल्याचा दावा त्यांनी केलेला नाही. 

व्ही के सिंग यांच्या जवळचे संबंध मुख्यमंत्री यांचे आहेत. निवडणूक असतानाही ते लग्नाला गेले होते. फोटोत सोबत राघव शर्मादेखील आहे. त्यामुळे कारवाई होत नाही, असा आरोपही रोहित पवारांनी केला. 

अपघात की घातपात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. काही नेते मॅनेज होवू शकतात, पण स्वाभिमानी जनता नाही. अनेकांचे ऋण माझ्यावर आहेत.  यापूर्वीही मी अनेक मुद्दे समोर आणले आहेत. अजितदादांना विमानाने का जावे लागले? हे कारण मी सांगितले आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे ते रस्ते मार्गे न जाता विमानाने जावे लागले. जास्त प्रमाणात इंधन टँकमध्ये टाकले गेले होते. याप्रकरणी अद्याप एफआयआर झालेला नाही. व्हीएसआर कंपनी बंद करण्याची मागणी केली होती.  साडेनऊ महिने झाले आहेत, तरीही काही झालेले नाही. शंकेचे निरसन सत्ताधारी करत नाहीयत. राजकारण केवळ बघायला मिळत आहे, असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.