Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विकासकामांच्या श्रेयवादावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुळजापूर येथील आठवडी बाजाराच्या विकासकामांसाठी आणलेल्या 18 कोटींच्या निधीत जाणूनबुजून अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. इथल्या लोकांना प्रत्येक गोष्टीत दुधात मिठाचा खडा टाकायची घाणेरडी सवय असून, 40 वर्षांपासून चाललेली ही 'आडवा आणि जिरवा'ची प्रवृत्ती आता खपवून घेतली जाणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
ADVERTISEMENT
ट्रोलिंगसाठी कोट्यवधींचा खर्च
तसेच, तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना संप करण्यास कोणी भाग पाडले, याची सर्वांना माहिती आहे, असे सांगत त्यांनी जुन्या कारणांवरूनही विरोधकांवर निशाणा साधला. केवळ ओमराज्याला विरोध करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर ट्रोलिंगच्या टीमवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. त्यापेक्षा स्वतःचा वेळ आणि पैसा वाया न घालवता एखाद्या गरिबाची चांगली कामे करावीत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. या सर्व प्रकारावर जर-तरच्या राजकारणात अडकण्यापेक्षा जनतेच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : 33 FD, कोट्यवधीचा बँक बॅलन्स; चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?
दोन्ही गट एकत्र आल्यास...
दरम्यान, दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी सूचक विधान केले आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास आपल्यासारखा आनंदी माणूस दुसरा कोणी नसेल, असे सांगत त्यांनी दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी आपली वैयक्तिक भावना असल्याचे स्पष्ट केले.
हे ही वाचा : Mahrashtra Weather : शनिवारी दुहेरी संकट, काही ठिकाणी दिवसा उष्णता अन् रात्री गारवा
म्हणून घेतली आक्रमक भूमिका
विकासकामांमध्ये खोडा घालणाऱ्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी आणि हक्काचा निधी मार्गी लावण्यासाठी आपण आक्रमक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरपालिकेने आठवडी बाजाराच्या निधीसाठी एनओसी न देण्यामागील राजकारण जिल्ह्याला माहीत आहे. आपण कधीही कुणाची रेषा खोडत बसत नाही, तर स्वतःची रेषा वाढवण्यात विश्वास ठेवतो, असं खासदार ओमराजेंनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT












