33 FD, कोट्यवधीचा बँक बॅलन्स; चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?
काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या संपत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीचीही जोरदार चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गिरणा कामगाराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री
चंद्रकांत पाटील यांची संपत्ती किती?
Chandrakant Patil Net Worth : 'स्कूटरवर फिरणाऱ्या डी. वाय. पाटलांच्या मुलाकडे इतकी संपत्ती आली कुठून?' असा प्रश्न विचारत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली असताना, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी प्रतिप्रश्न करत खुद्द चंद्रकांत पाटील यांच्याच संपत्तीवर सवाल उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी चंद्रकांत पाटील यांनी सादर केलेल्या अधिकृत निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पाटील आणि त्यांच्या पत्नी अंजली पाटील यांची एकूण एकत्रित संपत्ती सुमारे 8 कोटी 93 लाख 55 हजार रुपये इतकी आहे. प्रतिज्ञापत्रातील नोंदीनुसार, 2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीत चंद्रकांत पाटील यांचे वार्षिक उत्पन्न 28.81 लाख रुपयांवरून 53.60 लाख रुपयांवर पोहोचले असून त्यामध्ये सुमारे 86 टक्के वाढ झाली आहे. आमदार व मंत्री म्हणून मिळणारे मानधन, भत्ते, घरभाडे आणि शेती हे आपल्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
जंगम मालमत्ता किती?
पाटील दांपत्याच्या एकूण संपत्तीपैकी 5 कोटी 46 लाख 80 हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावावर 2 कोटी 16 लाख, तर पत्नीच्या नावावर 3 कोटी 30 लाख रुपयांची मालमत्ता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, चंद्रकांत पाटील यांनी शेअर बाजारात नाममात्र गुंतवणूक केली असली तरी कोल्हापुरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्यांच्या नावावर 33 मुदत ठेवी (एफडी) असून त्यांची एकत्रित रक्कम 1 कोटी 15 लाख 50 हजार रुपये आहे. याशिवाय त्यांच्या पीपीएफ खात्यात 28 लाख 48 हजार रुपये जमा आहेत, तर पत्नी अंजली पाटील यांच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये 91.50 लाख रुपयांच्या मुदत ठेवी आणि पीपीएफमध्ये 69.80 लाख रुपये आहेत. वाहनांमध्ये पाटील यांच्याकडे टोयोटा इनोव्हा, इनोव्हा क्रिस्टा आणि दोन ॲक्टिवा अशा चार गाड्या असून पाटील दांपत्याकडे एकूण 410 ग्रॅम सोने व चांदीचे दागिने आहेत.
हे ही वाचा : Mahrashtra Weather : शनिवारी दुहेरी संकट, काही ठिकाणी दिवसा उष्णता अन् रात्री गारवा
स्थावर मालमत्ता किती?
स्थावर मालमत्तेचा विचार करता पाटील पती-पत्नींकडे एकूण 3 कोटी 46 लाख 68 हजार रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावावर कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील वडिलोपार्जित शेतजमीन, शाहूपुरीतील दोन व्यावसायिक गाळे, कोल्हापुरातील छत्रपती संभाजी पार्क येथील स्वतंत्र घर आणि शाहुपुरी येथील अरहम प्लाझातील दोन निवासी फ्लॅट्स अशा 2 कोटी 68 लाख 38 हजार रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे. तर पत्नी अंजली पाटील यांच्या नावावर मुंबईतील सायन कोळीवाडा येथे 78 लाख रुपये बाजारमूल्य असलेला 290 चौरस फुटांचा वडिलोपार्जित फ्लॅट आहे. कर्जाच्या रकान्यात पाटील यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे केवळ 21 लाख 69 हजार रुपयांचे वाहन कर्ज असून पत्नीवर कोणतेही कर्ज किंवा शासकीय थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा : धाराशिव : 'पप्पा, मला मोबाईल पाहिजे...' 29 वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवले
गिरणी कामगाराचा मुलगा ते कॅबिनेट मंत्री
एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा ते अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री असा प्रवास करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीचा तपशील समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, त्यांच्या नावावर सुमारे 4 कोटी 84 लाख रुपये आणि पत्नीच्या नावावर 4 कोटी 9 लाख रुपयांची एकूण मालमत्ता आहे. डी. वाय. पाटील कुटुंबाच्या संपत्तीवरून चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे आता या दोन्ही नेत्यांच्या मालमत्तेची तुलना महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.
