धाराशिव : 'पप्पा, मला मोबाईल पाहिजे...' 29 वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवले
धाराशिवमधील एका मुलाने मोबाईलसाठी आपल्या वडिलांची हत्या केली आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव हादरले!
मोबाईलसाठी वडिलांना संपवले
मुलाची क्रूरता
Dharashiv Crime : जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील येवती गावात एक धक्कादायक घटना घडली. मोबाईल आणि पैशांच्या वादातून एका मुलाने आपल्या 56 वर्षीय जन्मदात्या वडिलांची लोखंडी पाइपने वार करून हत्या केली आहे. खंडू पांडुरंग डोंबाळे असे मृत पित्याचे नाव असून, श्रीशैल ऊर्फ बबलू खंडू डोंबाळे असे आरोपी मुलाचे नाव आहे. 10 नोव्हेंबर रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
लोखंडी पाईपने सपासप वार
घटनेच्या रात्री आरोपी श्रीशैल याने वडील खंडू डोंबाळे यांच्याकडे मोबाईल आणि नवीन मोबाईल घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, रात्रीची वेळ असल्याने वडिलांनी कोणालाही कॉल करण्यास मज्जाव करत मोबाईल व पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून वडील घरासमोरील अंगणात झोपल्यानंतर आरोपी मुलगा काही वेळाने पुन्हा घरी परतला आणि त्याने चुलीजवळ असलेला लोखंडी पाइप हातात घेऊन झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर जोरदार वार केले.
हे ही वाचा : Mahrashtra Weather : शनिवारी दुहेरी संकट, काही ठिकाणी दिवसा उष्णता अन् रात्री गारवा
आईने दिली फिर्याद
या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले खंडू डोंबाळे जागीच मृत पावले. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मृताची पत्नी तथा आरोपीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला त्वरीत बेड्या ठोकल्या आहेत.
हे ही वाचा : 'भाजपच्या सापळ्यात अडकू नका, योग्य वेळी निर्णय घेऊ..' छठ पुजेवरुन राज ठाकरे आक्रमक
चार दिवसांची पोलीस कोठडी
पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला 12 नोव्हेंबर रोजी तुळजापूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. किरकोळ कारणावरून आणि हट्ट पूर्ण न झाल्यामुळे एका तरुणाने आपल्याच पित्याचा जीव घेतल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असून, या घटनेमुळे मयताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
