'या' जिल्हा बँकेत भाजपने केला मोठा गेम! 10 जागा बिनविरोध, महाविकास आघाडी बॅकफुटवर

नितीन शिंदे

• 03:08 PM • 18 Nov 2026

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनेलचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

solapur district bank election bjp 10 unopposed mva maha vikas aghadi backfoot

Solapur District Bank Election

Google CTA

सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. जिल्ह्यातील सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय सत्ताकेंद्रांवर या पक्षांची मजबूत पकड होती. मात्र, भाजपच्या ऑपरेशन लोटस आणि बदलत्या राजकीय समीकरणांनंतर या वर्चस्वाला धक्के बसू लागले. आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही भाजपने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भाजप आणि विरोधी गटांकडून त्यासाठी चर्चा आणि राजकीय जुळवाजुळव केली जात होती. मात्र, हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत आणि निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.

माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राजन पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याची प्रतिक्रिया प्रशांत परिचारक यांनी दिली.

भाजपप्रणीत पॅनेलचे 10 उमेदवार बिनविरोध

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर भाजपप्रणीत पॅनेलने मोठे यश मिळवले आहे. संचालक मंडळाच्या निवडणुकीत तब्बल 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपने आपले पारडे जड केले आहे.

हे ही वाचा>> सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मोठी उलथापालथ; खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांची अचानक माघार

बिनविरोध निवडून आलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, शंभूराजे जगताप, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर अवताडे, पृथ्वीराज माने आणि श्रीदीप हसापुरे यांचा समावेश आहे.

या प्रमुख नेत्यांच्या बिनविरोध निवडीमुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात भाजपप्रणीत गटाची ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे.

महाविकास आघाडीला माघार घ्यावी लागली

दुसरीकडे, महाविकास आघाडीला या निवडणुकीत मोठा राजकीय फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह मविआच्या अनेक नेत्यांना आणि उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले.

हे ही वाचा>> रोहित पवारांनी फडणवीसांवर आरोप करताच सत्यजित तांबे संतापले; थेट फेसबुक पोस्ट,पण कमेंट्स ऑफ

उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर विरोधकांची रणनीती कमकुवत पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजपप्रणीत पॅनेलने बिनविरोध निवडीच्या माध्यमातून आघाडी घेतल्याने महाविकास आघाडीसमोर उर्वरित जागांवर विजय मिळवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

उर्वरित 9 जागांसाठी 24 उमेदवार मैदानात

संचालक मंडळाच्या एकूण जागांपैकी 10 जागा बिनविरोध झाल्यानंतर आता उर्वरित 9 जागांसाठी 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागांसाठी आता प्रत्यक्ष मतदान होणार असून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सोलापूर जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीतील विजय केवळ बँकेच्या सत्तेसाठीच नव्हे, तर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

एकीकडे भाजपने 10 जागा बिनविरोध जिंकत मोठी आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला माघारीच्या राजकारणामुळे धक्का बसला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसत असले, तरी उर्वरित 9 जागांच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.