रोहित पवारांचे थेट फडणवीसांवर आरोप.., सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या?

सुमित भुजबळ

• 09:26 AM • 18 Nov 2026

अजित पवार यांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. रोहित पवारांच्या भावनिक भूमिकेचा आदर करण्याचे आवाहन करत त्यांनी चौकशीच्या अहवालाची वाट पाहण्यास सांगितले.

Supriya Sule

Supriya Sule

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

रोहित पवारांचे थेट फडणवीसांवर आरोप..

point

सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या?

Supriya Sule Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणातील विमान कंपनीशी संबंधित व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला होता. तसेच व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रोहित पवारांच्या या आरोपांनंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी शरद पवार यांना पत्र लिहून रोहित पवारांच्या आरोपांबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. रोहित आणि अजित पवार यांच्यात प्रेमाचे नाते होते. त्यामुळे आपल्या काकांचं नेमकं काय झालं? याची अनेक प्रश्नांची उत्तरे रोहितला अपेक्षित आहेत. त्याच्या मनातील अस्वस्थता समजून घेतली पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हे वाचलं का?

आता चौकशीच्या अहवालाची वाट पाहिली पाहिजे - सुप्रिया सुळे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास कालमर्यादेत पूर्ण करून सत्य समोर आणण्याचा शब्द दिल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यामुळे आता चौकशीच्या अहवालाची वाट पाहिली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. विमान अपघाताच्या तपासाबाबत मर्यादित कालावधीत अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचणे शक्य झालेले नाही, असेही त्यांनी नमूद केले. व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना वाचवले जात असल्याचा आरोप आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल का होत नाही? या प्रश्नावर त्यांनी रोहित पवारांशी बोलणार असल्याचे सांगितले. नागरी विमान वाहतूक विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे या प्रकरणात कोणत्या यंत्रणेला काय अधिकार आहेत? हे समजून घेणे आवश्यक आहे. रोहित पवार यांनी या संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे का, याची माहितीही आपण त्यांच्याकडून घेऊ, असे त्या म्हणाल्या.

शरद पवारांनी आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण केले नाही - सुळे 

रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थन आहे का? असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर प्रसाद लाड यांनी शरद पवार यांना पत्र लिहिले असेल, तर त्याचे उत्तर शरद पवार देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कधीही आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण केले नाही. प्रत्येकाची राजकारण करण्याची पद्धत वेगळी असते, असेही त्या म्हणाल्या. रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीनंतर पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे टाळायला हवे होते का? असा प्रश्न विचारला असता, कदाचित त्यांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकले नसेल किंवा पत्रकार परिषद पाहिली नसेल, असे उत्तर त्यांनी दिले. रोहित पवारांची भूमिका नेमकी काय आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच स्पष्ट करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा का? यावर सुप्रिया सुळे यांनी आपण सक्षम प्राधिकारी नसल्याचे सांगितले. संबंधित यंत्रणांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, भाजपकडून रोहित पवारांच्या साखर कारखान्याच्या परिसरातील परिस्थिती आणि अपघाताच्या ठिकाणाबाबतही आरोप करण्यात आल्याचे त्यांना विचारण्यात आले. मात्र, हा आरोप आपण ऐकलेला नसल्याने त्यावर माहिती घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनाला अद्याप वर्षही पूर्ण झालेले नाही. आमच्या घरातील कर्ता पुरुष, माझा मोठा भाऊ या अपघातात गेला आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप म्हणून पाहू नये. सर्वांनीच या प्रकरणात माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवावी, अशी हात जोडून विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. तसेच रोहित पवारांच्या मनातील प्रश्नांचा आदर केला पाहिजे आणि विमान अपघाताच्या चौकशीचा अहवाल येण्याची वाट पाहिली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.