ठाकरेंची कोंडी करताना चुकून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला, शायना अडचणीत!

सुमित भुजबळ

18 Nov 2026 (अपडेटेड: 18 Nov 2026, 03:38 PM)

Shaina nc on balasaheb thackeray photo : शिवसेना शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही चुकून फाडला गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांच्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केलीये.

Shaina nc on balasaheb thackeray photo

Shaina nc on balasaheb thackeray photo

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

ठाकरेंची कोंडी करताना चुकून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला, शायना अडचणीत!

point

सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा आरोप 

point

किशोरी पेडणेकरांची शिंदे गटावर टीका, बाळासाहेब थोरातांनीही सुनावलं 

Shaina nc on balasaheb thackeray photo : शिवसेना शिंदे गटाच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही चुकून फाडला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी केला. या लिखाणाचा निषेध करण्यासाठी पत्रकार परिषदेत पुस्तकाच्या प्रती फाडण्यात आल्या. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी सावरकर यांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचं सांगितलं. सावरकर हे आपले आराध्य असल्याचं म्हणत त्यांनी पुस्तकातील लिखाणाचा निषेध केला. मात्र, पुस्तक फाडताना शायना एनसी यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडला गेल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाला.

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबई : लोकल ट्रेन सुरु झाली अन् नाशिकच्या तरुणाने फेकून मारला चाकू, पुढं काय घडलं?

सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांबाबत आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचा आरोप 

आनंद दुबे यांनी पत्रकार परिषदेत सावरकर यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख केला. सावरकर यांना 50 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली होती आणि त्यांनी 11 वर्षे सेल्युलर जेलमध्ये यातना सहन केल्या, असं ते म्हणाले. सावरकर यांच्याविषयी वारंवार अपमानास्पद वक्तव्य केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुस्तकातील 201 व्या पानाचा उल्लेख करत त्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडल्या. सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी त्यांच्या त्यागाचा विचार करावा, असंही आनंद दुबे यांनी म्हटलं. सावरकर यांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारला असून अशा पुस्तकांचा निषेध केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा : रोहित पवारांचे थेट फडणवीसांवर आरोप.., सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या?

दरम्यान, या घटनेवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शायना एनसी आणि शिंदे गटावर टीका केली. शिंदे गट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर पक्ष चालवत असताना त्यांचाच फोटो फाडला जाणं ही गंभीर बाब असल्याचं त्या म्हणाल्या. सावरकर यांचा अपमान झाल्याचं शिंदे गटाला वाटत असेल, तर बाळासाहेबांच्या अपमानाबाबतही त्यांनी भूमिका घ्यायला हवी होती, असं पेडणेकर यांनी सुनावलं.

किशोरी पेडणेकरांची शिंदे गटावर टीका, बाळासाहेब थोरातांनीही सुनावलं 

किशोरी पेडणेकर यांनी शायना एनसी यांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत असल्याचं सांगितलं. बाळासाहेबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेचा अपमान सहन करू नये, अशी टीकाही त्यांनी केली. दुसरीकडे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती फाडण्याच्या प्रकाराचा निषेध केला. एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद असू शकतात. मात्र, ते मांडण्यासाठी पुस्तक वाचून त्यातील मुद्द्यांवर बोललं पाहिजे. पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न दुर्दैवी असल्याचं थोरात म्हणाले. सोनिया गांधी यांचा त्याग, संघर्ष आणि देशाप्रती असलेलं समर्पण या पुस्तकातून वाचकांना समजण्याची संधी मिळाली आहे, असंही त्यांनी सांगितलं. या प्रकारामुळे उलट अधिक लोक हे पुस्तक वाचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चारी बाजूंनी झालेल्या टीकेनंतर शायना एनसी यांचे स्पष्टीकरण 

दरम्यान, टीका झाल्यानंतर शायना एनसी यांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अपमान किंवा फोटो फाडल्याचं दाखवावं, असं आव्हान त्यांनी टीकाकारांना दिलं. जाणीवपूर्वक घटनेचा चुकीचा अर्थ लावून खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्याविरोधात बदनामीकारक दावे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, मणिशंकर अय्यर यांचा फोटो आपण हजार वेळा फाडू आणि हेच बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलं आहे, असंही शायना एनसी यांनी म्हटलं. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या निषेधाच्या कार्यक्रमाला आता बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या कथित विटंबनेचा वाद जोडला गेला आहे.