Satara Bank Election : साताऱ्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेनंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासंघर्षातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेत बहुमत नसतानाही सत्तेच्या जोरावर मित्रपक्षांना बाजूला सारत भाजपचा झेंडा फडकवण्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना यश आले होते. मात्र, त्याच धर्तीवर जिल्हा बँकेवरही भाजपची सत्ता आणण्याचे प्रयत्न फसले आणि भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले. विशेष म्हणजे, या पराभवानंतर जयकुमार गोरे यांनी आपण या संपूर्ण घडामोडींमध्ये कुठेच नव्हतो, अशी भूमिका घेतली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची संपूर्ण सूत्रे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे होती, असे सांगत त्यांनी पराभवाची जबाबदारी शिवेंद्रराजेंवर ढकलल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर 'यशाचे श्रेय घ्यायचे आणि अपयश आले की राजेंना विचारा म्हणायचे, हे कसे चालेल?' असा सवाल करत शिवेंद्रराजेंनीही गोरे यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सातारा भाजपमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
'शेवट आम्ही करणार...'
या सत्तासंघर्षाची पार्श्वभूमी पाहिली तर 20 मार्च रोजी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 27, राष्ट्रवादी काँग्रेसने 20, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 15 जागा जिंकल्या होत्या. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढल्याने अध्यक्षपदावरून संघर्ष निर्माण झाला. यावेळी जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांना बाजूला सारत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप झाला, तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेने वातावरण अधिकच तापले. अखेर भाजपच्या प्रिया शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. या प्रकारामुळे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील प्रचंड नाराज झाले होते. 'सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट आम्ही करणार,' असा इशाराही शंभूराज देसाई यांनी दिला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत याच नाराजीचा परिणाम दिसून आल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा : Weather Update: नोव्हेंबरमध्येही उन्हाचा चटका कायम! मुंबईसह राज्याचं तापमान जाणार तब्बल...
भाजप सत्तेबाहेर
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. 21 पैकी भाजपचे नऊ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ आणि शिंदेंच्या शिवसेनेचे चार संचालक निवडून आले होते. सर्वाधिक जागा भाजपकडे असल्याने बँकेचे अध्यक्षपद भाजपलाच मिळणार, अशी भूमिका जयकुमार गोरे यांनी घेतली होती. मात्र, अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला 11 हा जादुई आकडा भाजपकडे नव्हता. दुसरीकडे, जिल्हा परिषदेत भाजपने केलेल्या राजकारणाचा वचपा काढण्याची संधी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळाली. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी एकत्र येत 12 संचालकांची मोट बांधली. 18 नोव्हेंबर रोजी एका बाजूला शिवेंद्रराजे यांच्या सुरुची बंगल्यावर भाजपचे संचालक एकवटले, तर दुसरीकडे मकरंद पाटील यांच्या कृष्णानगर बंगल्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संचालक एकत्र आले. या बैठकीत उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या अध्यक्षपदासाठी, तर दीपक चव्हाण यांच्या उपाध्यक्षपदासाठी नाव निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोघांनीही अर्ज दाखल केले आणि भाजपला सत्तेबाहेर राहण्याची वेळ आली.
हे ही वाचा : Personal Finance: प्लॉट न घेता जमिनीच्या वाढत्या किंमतीतून किती कमाई?
भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष?
या संपूर्ण घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा असतानाही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करता आली नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेत भाजपच्या विजयाचे श्रेय जयकुमार गोरे यांना मिळाले होते; मात्र जिल्हा बँकेतील पराभवानंतर त्यांनी जबाबदारी शिवेंद्रराजेंवर ढकलल्याने भाजपमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला. शिवेंद्रराजेंनीही थेट प्रत्युत्तर देत शांतपणे काम केल्यास गोष्टी साध्य होतात, सतत बोलून काही पदरात पडत नाही, असा टोला लगावला. त्यामुळे साताऱ्यातील भाजपचा अंतर्गत कलह आता केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो उघडपणे समोर आला आहे. जिल्हा परिषदेत भाजपला साथ देणाऱ्या मित्रपक्षांनीच जिल्हा बँकेत भाजपला सत्तेबाहेर ठेवले. या सत्तांतराची जबाबदारी जयकुमार गोरे यांची की शिवेंद्रराजे भोसले यांची, यावरून आता साताऱ्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ADVERTISEMENT












