'माझ्यावर वार होत होते पण...', भारताचा ढाण्या वाघ कॅप्टन स्मितने PM मोदींना Video Call वर सांगितला सगळा थरार!

मुंबई तक

• 03:41 PM • 02 Oct 2026

कॅप्टन स्मित मच्छार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना विमानातील त्या थरारक क्षणाचा अनुभव सांगितला. गंभीर जखमी असतानाही प्रवाशांना वाचवण्यासाठी त्यांनी कसा प्रयत्न केला, याची माहिती त्यांनी दिली.

captain smit machchhar pm modi video call plane emergency passengers rescue

PM मोदींचा कॅप्टन स्मितला Video Call

Google CTA

नवी दिल्ली: फ्लायदुबईच्या विमानात ओमानच्या सहवैमानिकाने केलेल्या भीषण हल्ल्यातून सुखरुप बचावलेला भारतीय नागरिक आणि कॅप्टन स्मित मच्छारशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (2 ऑक्टोबर) व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्मितच्या प्रकृतीची विचारपूस करत त्याच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक केले. त्यावर स्मितने अपघाताच्या वेळी कॉकपिटमध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली होती आणि स्वतः गंभीर जखमी असतानाही प्रवाशांना वाचवण्यासाठी कसा प्रयत्न केला, याचा थरारक अनुभव सांगितला.

हे वाचलं का?

स्मितने सांगितलं की, अपघाताच्या त्या क्षणी तो स्वतःच्या आयुष्यासाठी लढत होता. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या आणि तो खाली कोसळला होता. मात्र, त्याच वेळी त्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. आपण उठलो नाही आणि काही केलं नाही, तर मोठी दुर्घटना होऊ शकते आणि प्रवाशांचा नाहक जीव जाऊ शकतो, याची त्याला जाणीव झाली.

“मी गेल्या 17 वर्षांपासून विमान उडवत आहे आणि गेल्या 11 वर्षांपासून कॅप्टन आहे. त्यामुळे डोळे बंद करूनही विमानात काय घडत आहे, हे मला समजतं,” असं स्मितने पंतप्रधान मोदींना सांगितलं.

हे ही वाचा>> “विमानात तुम्हाला कोण वाचवणार?” एक वर्षापूर्वीचं 'ते' विधान ठरलं खरं, भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ व्हायरल!

विमान वेगाने खाली जात असल्याचं स्मितला जाणवत होतं. त्या वेळी दरवाजा उघडण्यासाठी शेवटचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानी तो प्रयत्न केला आणि दरवाजा उघडला. त्यानंतर बाकीचे लोक कॉकपिटमध्ये आले. या संपूर्ण प्रक्रियेत इतरांचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचं स्मितने स्पष्ट केलं.

“मी माझ्या जीवाच्या आकांताने ते करत होतो. पण त्याच वेळी मला हेही माहीत होतं की, मी सगळ्या प्रवाशांना मरू देऊ शकत नाही,” असं स्मितने सांगितलं.

हे ही वाचा>> कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्यामुळे 180 प्रवाशांचे प्राण कसे वाचले? कसं आहे मुंबई कनेक्शन?

मोदींसोबतच्या या संवादात स्मितने भारतीय संस्कृती आणि हनुमान चालीसाबद्दलही भावना व्यक्त केल्या. संकटाच्या क्षणी आपण हनुमान चालीसा म्हणत असल्याचं त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.

पंतप्रधान मोदी आणि कॅप्टन स्मित यांच्यातील Video Call संवाद जसाच्या तसा.. 

PM मोदी: स्मित, नमस्ते.

स्मित: नमस्ते सर.

PM मोदी: कसा आहेस? आता तब्येत कशी आहे?

स्मित: सर, सगळं ठीक आहे. सगळं ठीक आहे.

PM मोदी: पाहा, संपूर्ण देश तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. ठिकठिकाणी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू आहे. तुमच्या धैर्याने, संयमाने आणि प्रसंगावधानाने तुम्ही काही क्षणांत इतके निर्णय घेतले आणि इतक्या लोकांचे प्राण वाचवले. आज संपूर्ण देश अभिमानाने सांगू शकतो की, आम्ही हिंदुस्थानी जीव घेणारे लोक नाही, तर जीव वाचवणारे लोक आहोत.

पण तुमच्या शरीरावर एवढी मोठी जखम झाली. तुम्ही स्वतः जीवन-मृत्यूची लढाई लढत होता. त्या वेळीही तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. सर्व प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 140 कोटी देशवासीयांचा मान तुम्ही वाढवला. त्यामुळे मला मनापासून, हृदयापासून तुमचा अभिमान वाटतो.

काल मला भूपेंद्र भाईंशी बोलण्याची संधी मिळाली. गीता बेनशी बोललो, सोनल बेनशींही बोललो. जावा आणि बॉबीशी मात्र बोलता आलं नाही. पण मी गीता बेनला म्हणालो होतो की, तुमचं नाव गीता आहे; पण तुम्ही श्रीकृष्णाची गीता पूर्णपणे आत्मसात केली आहे. आणि तुम्ही स्मितचं आयुष्य त्या साक्षात गीतेच्या संस्कारांनी घडवलं आहे.

स्मित: अगदी सर.

PM मोदी: स्मित, आता मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल.

स्मित: सर, मी तुमच्याशी बोलतोय ही गोष्ट माझ्यासाठी सर्वात मोठी आहे... तुम्ही फार मोठे आहात. आणि तुम्ही मला अशा प्रकारे फोन करून माझी विचारपूस करत आहात. मला खूप-खूप अभिमान वाटत आहे.

त्या क्षणी, सर, मी माझ्या आयुष्यासाठी लढत होतो. पण एक असा क्षण आला, जेव्हा मला जाणवलं की, मी काही केलं नाही तर... कारण मी खाली पडलो होतो. मला इतक्या जखमा झाल्या होत्या की मी खाली कोसळलो होतो.

आणि त्या वेळी मी विचार केला, जर मी उठलो नाही तर... मी गेल्या 17 वर्षांपासून विमान उडवत आहे. गेल्या 11 वर्षांपासून मी कॅप्टन आहे. आणि डोळे बंद करूनही विमानात काय घडतं आहे, हे मला समजतं.

जेव्हा मी खाली पडलो होतो, तेव्हा मला जाणवत होतं की विमान वेगाने खाली जात आहे. आणि मला अगदी स्पष्टपणे माहीत होतं की, ही एक शेवटची संधी आहे. जर मी तो प्रयत्न केला तर दरवाजा उघडेल. आणि त्याच वेळी मी प्रयत्न करत होतो. बस, तो दरवाजा उघडला सर. बाकी सगळे कॉकपिटमध्ये आले. आणि बाकी सगळ्यांचीही त्यामध्ये तितकीच महत्त्वाची भूमिका होती.

पण खरं सांगायचं तर मी माझ्या जीवाच्या आकांताने ते करत होतो. त्याच वेळी मला हेही माहीत होतं की, मी सगळ्या प्रवाशांना मरू देऊ शकत नाही.

त्यानंतर इथे आणि सौदीमध्ये लोकांनी माझी जी काळजी घेतली... यापेक्षा चांगली काळजी आणि यापेक्षा चांगलं वैद्यकीय उपचार मला मिळू शकले नसते.

आणि सर, मी फक्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. मला जेव्हा-जेव्हा वेदना होतात, तेव्हा मला एकच गोष्ट सुचते. मी फक्त हनुमान चालीसा म्हणतो. त्या वेळीही मी फक्त हनुमान चालीसाच म्हणत होतो.

आता मला समजतंय की, देवाने मला का वाचवलं.

PM मोदी: माझा एक फोन आला म्हणून?

स्मित: हो सर. तुमचा एक फोन आला.

मला आता स्वतःचा खूप-खूप अभिमान वाटतो. आत्ताच मला माझा अभिमान वाटायला लागला आहे. आतापर्यंत वाटत नव्हता, पण आता वाटतोय सर.

सॉरी सर, मी तुमच्यासमोर रडत आहे.

PM मोदी: स्मित, माझ्यासमोर तू भावुक होणार नाहीस, तर कुठे होणार? हे सगळं माझ्यासाठीही अनपेक्षित होतं. कधीच वाटलं नव्हतं की तुमच्याशी माझी अशी बातचीत होईल.

तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे भाई, की आज प्रत्येक देशवासी... जगभरातील लोक तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्याशी बोलण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

आणि तुम्ही हनुमान चालीसाबद्दल जी गोष्ट सांगितली, त्यासाठी मी गीता बेनला प्रणाम करेन, ज्यांनी तुम्हाला असे संस्कार दिले. भूपेंद्र भाईंनाही प्रणाम करेन.

आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा माझी सोनल बेनशी बोलणं झालं, तेव्हा मला आश्चर्य वाटलं. एवढ्या कठीण परिस्थितीतही त्या इतक्या स्थिरपणे आणि एवढ्या धैर्याने बोलत होत्या. खरंच, अशा परिस्थितीत सोनल बेन इतक्या धैर्याने बोलू शकतील, याची मी कल्पनाही केली नव्हती.

त्यामुळे मला वाटतं की, एका कुटुंबाच्या नात्याने तुम्ही खरंच संपूर्ण देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.

स्मित: सर, मी रोज सकाळी पूजा करतो. माझा दोन वर्षांचा मुलगा माझ्या मांडीवर बसतो आणि माझ्यासोबत हनुमान चालीसा म्हणतो. मी त्याला हनुमान चालीसा ऐकवतो. कारण आज आपण देशापासून दूर आहोत, पण आपल्या संस्कृतीपासून दूर होता कामा नये.

PM मोदी: अगदी बरोबर.

स्मित: आणि आता इथे आल्यावर असंही वाटत नाही की आपण आपल्या देशापासून दूर आहोत. इथले लोकही आपल्याला खूप, खूप, खूप प्रेमाने आणि काळजीपूर्वक ठेवत आहेत.

PM मोदी: तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण सगळीकडे एक भावुक वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण हिंदुस्थानात तर हे वातावरण आहेच. काल सर्व मंदिरांमध्ये पूजा, प्रार्थना आणि आरती करण्यात आली. सर्व तीर्थक्षेत्रांमध्येही आरती झाली. तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सगळे प्रार्थना करत आहेत.

त्यामुळे तुम्ही लवकरच पूर्णपणे बरे होणार आहात. भारत तुमचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

आता शरीरात काही त्रास असला तरी मी ते समजू शकतो. तुम्ही वीर पुरुष आहात. त्यामुळे या जखमाही सहन करणं कदाचित तुमच्यासाठी सोपं झालं असेल.

स्मित: नाही सर. मी या जखमांकडे जखमा म्हणून पाहत नाही. कारण तसं विचार केलं तर माझ्या रिकव्हरीसाठी ते आणखी कठीण होईल. मी याकडे एका प्रवासासारखं पाहत आहे. हा प्रवास हळूहळू होणार आहे आणि त्याला वेळ लागणार आहे. पण मला पूर्ण विश्वास आहे की मी यातून नक्की बरा होईन आणि पूर्णपणे निरोगी होईन.

PM मोदी: मी सौदी सरकारचाही आणि यूएई सरकारचंही मनापासून आभार मानतो की, त्यांनी तुमची खूप काळजी घेतली. त्यांचाही मी आभारी आहे.

स्मित, तुला जेव्हा जेव्हा माझी गरज भासेल, तेव्हा मी फक्त एका फोनच्या अंतरावर आहे.

पण तुम्ही खरंच खूप मोठं काम केलं आहे. काल मी पाहत होतो, लोकांनी सोशल मीडियावर ज्या भावना व्यक्त केल्या... लोक म्हणत होते की, जर असं झालं नसतं तर हिंदुस्थानवर काय-काय संकट आलं असतं, भारताच्या सर्व पायलट्सवर काय परिणाम झाला असता, भारताच्या सर्व पायलट्सकडे कोणत्या नजरेने पाहिलं गेलं असतं. तुम्ही या सगळ्यांना वाचवलं आहे. म्हणजे तुम्ही खूप मोठं काम केलं आहे.

जेव्हा आपली भेट होईल, तेव्हा या घटनेबद्दलच्या आतल्या गोष्टी नंतर ऐकून घेईन. कारण मोबाईलवर अशा गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलू इच्छित नाही. आधी तुम्ही पूर्णपणे बरे व्हा.

आणि हो, संपूर्ण देश तुमच्यासोबत आहे. मला तुम्हाला जास्त त्रास द्यायचा नाही.

माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा.

आज गांधी जयंती आहे. अहिंसा काय असते, हे तुम्ही प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं आहे.

स्मित: थँक यू सर.

PM मोदी: चला, जय श्रीकृष्ण.

PM मोदी: बेटा, तू गुजरातीमध्ये बोल. जय श्रीकृष्ण.

PM मोदी: बॉबी, जेवा गुजराती बोलतात की नाही?

स्मित: बोलतो सर, गुजराती बोलतो. गुजराती शिकवली आहे.

PM मोदी: अच्छा, तो बालको-मलको ने डॉक्टर करा मवा माटे मारी मोटी दिक नहीं गई.

PM मोदी: अच्छा-अच्छा, तर थोडीफार क्लोज ना?

नाही, आम्ही तर पाहतच होतो. पण सोनल बेन खूप धैर्याने आणि स्थिरपणे बोलल्या. नाहीतर मी तर विचार करत होतो की, अशा परिस्थितीत कोणाकडूनही काही तक्रार किंवा दुःख व्यक्त होईल.

भूपेंद्र भाईंशी, गीता बेनशी मुंबई विमानतळावर बोललो. पण त्यांच्या बोलण्यात तक्रारीचा लवलेशही नव्हता. फक्त एकच गोष्ट होती भगवान सारं ठीक करेल.

स्मित: बस, बस सर.

PM मोदी: चला, जय श्रीकृष्ण. खूप लवकर बरा हो आणि पुन्हा आपण भेटू.

स्मित: येस सर.

PM मोदी: हां जी. गॉड ब्लेस.

जय जय हिंद.