नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी आता निवडणूक आयोगाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत दिपके यांनी गुरुवारी (24 सप्टेंबर) रोजी दिल्लीत महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याचे X पोस्टद्वारे जाहीर केले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये,
ADVERTISEMENT
“Election Commission Thik Karo! Important PC tomorrow in Delhi. Gyanesh, it’s done bro!”
असा मजकूर आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न
दिपकेंची ही घोषणा अशा वेळी झाली आहे, जेव्हा निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा दावा करणारा एक अहवाल समोर आला आहे. The Indian Expressच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा औपचारिक आक्षेप नोंदवले. या आक्षेपांचा संबंध मतदार यादी, मतदार नोंदणी प्रक्रिया आणि Special Intensive Revision (SIR) यांसारख्या मुद्द्यांशी असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
मतदार यादीतील नावांवरून वाद
निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीने एकमताने झाल्याचे स्पष्ट केले आहे. निर्णय प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेणं हा अंतर्गत कामकाजाचाच एक भाग असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने आता हा वाद अधिक चिघळू नये यासाठी डॅमेज कंट्रोल सुरू केल्याचं बोललं जात आहे.
CJPची नवी रणनीती काय?
CJPने यापूर्वी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, परीक्षा आणि सरकारी शाळांशी संबंधित मुद्द्यांवर आंदोलने आणि मोहिमा केल्या आहेत. आता संघटनेने मतदानाचा अधिकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचे संकेत दिले आहेत. CJPचे प्रवक्ते सौरव दास यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत, मतदानाचा अधिकार हा नागरिकांकडे असलेले महत्त्वाचे साधन असल्याचे म्हटले आहे.
24 सप्टेंबरला काय होणार?
अभिजीत दिपके यांनी 24 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर, SIR प्रक्रियेवर आणि मतदार याद्यांशी संबंधित मुद्द्यांवर CJPची भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिपकेंच्या या पत्रकार परिषदेत नेमके कोणते आरोप किंवा मागण्या समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने दोन आयुक्तांच्या आक्षेपांना आयोगातील नियमित विचारविनिमयाचा भाग असल्याचे सांगत, SIRसह आयोगाचे निर्णय तिन्ही आयुक्तांच्या एकमताने झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दिपके आणि CJPकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न आणि निवडणूक आयोगाची अधिकृत भूमिका यांच्यातील हा वाद पुढे कोणते स्वरूप घेतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT












