दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, दिवाळीपूर्वी अतिरिक्त रक्क्म थेट खात्यात...

मुंबई तक

14 Oct 2026 (अपडेटेड: 14 Oct 2026, 12:50 PM)

Maharashtra drought : राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. पाणीटंचाई, चारा आणि कर्जमाफीबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.

Maharashtra drought

Maharashtra drought

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

point

कर्जमाफीसह अतिरिक्त रक्कम थेट खात्यात...

Maharashtra drought , मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.  दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना द्यावयाच्या एकूण मदतीतील आगाऊ रक्कम म्हणून हे 5 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. 

हे वाचलं का?

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन यापूर्वी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. आता ट्रिगर वन आणि ट्रिगर टू या दोन्ही निकषांचा आढावा घेऊन आणखी 40 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा : सिंधुदुर्ग : महिला पोलिसाच्या मृत्यू प्रकरणात ट्वीस्ट, पोलीस पतीला अटक; नेमंक काय घडलं?

फडणवीस म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागांसाठी सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या 12 सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्यतः दुष्काळाची घोषणा नोव्हेंबरच्या अखेरीस केली जाते आणि डिसेंबरमध्ये मदत दिली जाते. मात्र, यंदाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण मदत मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरील काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता दिवाळीपूर्वी संपूर्ण मदत देणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्य सरकारने आगाऊ मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच कर्जमाफीच्या प्रक्रियेचे कामही सुरू असून, नव्याने साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया थांबलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे : कोट्याधीशाच्या हत्येसाठी 20 लाखाची सुपारी, पण कॉन्ट्रॅक्ट किलरने चुकून कामगाराला संपवलं

चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी राज्य सरकार सुरु

दुष्काळग्रस्त भागांतील पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावरही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये निरीक्षण विहिरींमधील पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा खाली गेली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टँकरचे जीपीएस प्रणालीद्वारे निरीक्षण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याच्या दृष्टीने आतापर्यंत सुमारे 16 हजार अवैध पाणी जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. यापुढेही अवैध पाणी उपसा आढळल्यास संबंधित जोडणी तोडण्यात येणार आहे. चाऱ्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर काही भागांमध्ये केवळ 90 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचे समोर आले आहे, तर काही भागांमध्ये सहा ते सात महिन्यांचा चारा उपलब्ध आहे. चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून, रब्बी हंगामात चाऱ्याची पिके घेण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. चाऱ्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून उत्पादित चारा हमीभावाने खरेदी करण्याबाबतही सरकार निर्णय घेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी अभिनंदनाचा ठराव

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक पदावरील नेतृत्वाची 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा ठराव मंजूर केला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांत सुमारे 12 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले किंवा पूर्ण झाले असल्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे. गरीब आणि वंचितांसाठी राबवलेल्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास, संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचा ठरावात उल्लेख असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा ठराव पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. याशिवाय दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफीसंदर्भातील निर्णयातील अटी काढून तो सर्वांना लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. जिल्हा बँका आणि सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खासगी सूक्ष्म वित्तपुरवठा संस्थांनीही सक्तीच्या वसुलीचे मार्ग वापरू नयेत, यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.