सरकार आणि राजाने खूप उंचावर बसू नये...

मुंबई तक

15 Oct 2026 (अपडेटेड: 15 Oct 2026, 11:20 AM)

Delhi Protest : दिल्लीतील आंदोलन (Delhi Protest) आणि पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलकांनी सांगितलेले अनुभव आता समोर आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या CJP आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही आंदोलकांनी ताब्यात असताना मारहाण, शिवीगाळ, मोबाईल फोन ताब्यात घेणं आणि दूरच्या ठिकाणी नेल्याचे आरोप केले आहेत.

Delhi Protest

Delhi Protest

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सरकार आणि राजाने खूप उंचावर बसू नये...

point

Rahul Gandhi Protest | आंदोलकांना समोर आणलं, अंगावर काटा आणणारे अनुभव एकदा ऐकाच

Delhi Protest : सुरुवात करूया धर्मेंद्रपासून. वय वर्षं 18-19. परवा तो दिल्लीत काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाला. मागणी काय होती? ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि एसआयआरची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी. या प्रक्रियेत बेकायदेशीर पद्धतीने 13 कोटी नागरिकांची नावं कापण्यात आल्याचा आरोप आहे. पार्लमेंट स्ट्रीटवरून आंदोलन करणाऱ्या धर्मेंद्रला आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी उचललं, गाडीत टाकलं आणि डिटेन्शन सेंटरपर्यंत पोहोचेपर्यंत लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली. इतकंच नाही, तर वाहाबसिंग तोमर आणि अंकित कसाना या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या मुलांना आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. ‘आता तुम्हाला वाचवायला राहुल गांधी येणार आहेत का? तुमच्यातली नेतेगिरी काढतो,’ असं म्हणत सूड घ्यावा, अशा पद्धतीने या मुलांना बदडण्यात आलं. त्यांच्याविरोधात कोणती कलमं लावण्यात आली? त्यांनी पोलीस गाडीच्या काचा फोडल्या आणि 50 पेक्षा जास्त लोकांचा जमाव गोळा करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला. न्यायाधीशांसमोर जेव्हा या सगळ्या मुलांना उभं करण्यात आलं, तेव्हा धर्मेंद्रला हातसुद्धा वर करता येत नव्हता. त्याला इतक्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे, धर्मेंद्र हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.

हे वाचलं का?

उदाहरण क्रमांक दोन. रमित हा एक कंटेंट क्रिएटर आहे. त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. रमित 11 ऑक्टोबरला ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात उतरला. त्यानेही घोषणा दिल्या. या ठिकाणी भाजपला समर्थन करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी रमितला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलीसही तिथे आले. पोलिसांनी रमितला अक्षरशः फरफटत गाडीत नेलं. गाडीत घातल्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचा फोन काढून घेण्यात आला आणि तो फॉरमॅट करण्यात आला. काही लोकांचे फोन तर पोलिसांनी अद्याप परत केलेले नाहीत. याआधी जुलैमध्ये झालेल्या आंदोलनातही रमितच्या डोक्यात पोलिसांनी काठी घातल्याचं आठवतं. रमितसुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाही. केवळ निवडणूक आयोगात सुरू असलेल्या गोंधळाची जबाबदारी निश्चित करा, अशी त्याची मागणी आहे.

उदाहरण क्रमांक तीन. ऋतु बराल ही एनएसआयची कार्यकर्ती आहे. 13 ऑक्टोबरला झालेल्या आंदोलनात ती सहभागी झाली. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनात उतरल्याची किंमत काय मोजावी लागली, ते पाहा. ऋतु बरालचे केस धरून तिला पोलीस व्हॅनमध्ये फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कांचन यादव नावाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ठोसे मारले. नखांनी ओरखडले. तिच्या कानात इअरिंग होती. त्याच कानावर बुटासकट पाय देऊन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात एक इअरिंग तिच्या कानाच्या आत अडकली. डॉक्टरांच्या उपचारानंतरच ती काढणं शक्य झालं. तिचा गळा आवळण्याचाही प्रयत्न झाला. शिवीगाळ आणि अपशब्द वापरण्यात आले. पोलीस ठाण्यात नेल्यानंतर दांडक्याने तिच्या दोन्ही पायांवर प्रहार करण्यात आले. ऋतु जखमी झाली. अर्थात, ऋतूनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; पण पोलीस वर्दीचा पुरेपूर फायदा कांचन यादवने उचलला, असा आरोप आहे.

उदाहरण क्रमांक चार. अधिरा मूळची केरळची आहे. ती दिल्ली विद्यापीठात शिकते. तीही आंदोलनात सहभागी झाली होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि गाडीत कोंबलं. त्यावेळी गाडीत एकही महिला पोलीस उपस्थित नव्हती. पोलिसांनी तिच्या चेहऱ्यावर ठोसे मारले. तिचा ओठ फाटला. कानावर आणि मानेवरही मारहाण करण्यात आली. अधिराला आता एका कानाने ऐकू येणं बंद झालं आहे. तिच्या कानावर आणि मानेवर इतक्या जोरात प्रहार करण्यात आले. यापुढे जाऊन पोलिसांनी तिच्या खासगी अवयवांवर लाथा मारल्या. ती जखमी होऊन अक्षरशः विव्हळत होती; पण पोलिसांना दया आली नाही. अशी शेकडो उदाहरणं आहेत, ज्यातून दिल्ली पोलिसांच्या अमानुष वर्तनाचे आरोप समोर येतात.

नीट पेपरफुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या मुलांनाही अशाच प्रकारे बदडण्यात आलं होतं. काठ्यांना खिळे लावून मारहाण करण्यात आली होती. महिलांना पुरुष पोलिसांनी मारहाण केली होती. खासगी अवयवांमध्ये काठ्या घुसवण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप झाले होते. हे सगळं केल्यानंतरही आजवर कुठल्याही पोलिसावर कारवाई झाल्याची बातमी आलेली नाही. पोलीस अशी क्रूर मारहाण का करत आहेत? कारण त्यांना माहिती आहे की, आपलं काहीही आणि कुणीही नुकसान करू शकणार नाही. त्यांच्या मागे शक्ती आहे. ती शक्ती अमित शहांची आहे का, हा प्रश्न आहे. कारण दिल्ली पोलीस हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यांचं नियंत्रण थेट केंद्र सरकारकडे आहे. दिल्ली पोलिसांना आदेश गृह मंत्रालयाकडून येतात. मग या मुलांना चिरडण्याचे, त्यांना बदडण्याचे आदेश कुठून आले? अमित शहांकडून आले का, हा प्रश्न आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गणवेशात नसलेले लोक आंदोलनात घुसतात. सत्ताधाऱ्यांना समर्थन करणाऱ्या संघटनांचे लोक येतात आणि आंदोलकांना मारहाण करतात. हे सगळं पोलिसांसमोर घडतं; पण पोलीस काहीच करत नाहीत. हे कसं शक्य होतं? कोणाच्या परवानगीने हे घडतं? त्याचा धडधडीत पुरावा म्हणजे पिंकी चौधरीचा व्हिडिओ. पिंकी चौधरी हा हिंदू रक्षक दलाचा कार्यकर्ता आहे. सीजेपीने दिल्लीत आंदोलनाची हाक दिल्यानंतर पिंकीचा एक व्हिडिओ समोर आला. त्यात लाठ्याकाठ्या घेऊन सीजेपीच्या लोकांचा समाचार घेऊ, असं तो म्हणताना दिसतो. पोलिसांना पिंकीचं अकाउंट माहीत नाही का? पिंकी कोण आहे, हे माहीत नाही का? प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांनी पिंकीला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना अटक केली का? कदाचित, दिल्लीत अशा लोकांनी थैमान घालावं, असंच पोलिसांना हवं होतं का, हा प्रश्न आहे.

दाढी वाढवलेले, गणवेशात नसलेले; पण पोलिसांच्या काठ्या हातात असलेले चेहरे दिल्लीच्या रस्त्यांवर कसे दिसतात? या प्रश्नाचं उत्तर या मुलांना झालेल्या अमानुष मारहाणीत आहे का? दिल्ली पोलिसांच्या नावाखाली स्वतःची गुंडगिरी करणारी ही प्रॉक्सी फळी किती विषारी आहे, ते पाहा. तुम्हाला स्वतंत्र भारद्वाज नावाचा मुलगा आठवतो का? एका पॉडकास्टमध्ये बसून हा मुलगा खुशाल सांगत होता की, नीटच्या आंदोलनावेळी त्याने लोकांची डोकी फोडली. तरीही पोलिसांनी त्याला अटक केली नाही. तो मोठमोठ्या नेत्यांची नावं घेत राहिला आणि त्यामुळे आपल्याला कोणी हात लावत नाही, अशी हुशारी मारत राहिला. अख्ख्या देशाने हा व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओने दिल्ली पोलिसांची खरी कुवत आणि लायकी जगासमोर मांडली. या स्वतंत्र भारद्वाजला न्यायालयानेही तीन आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हा नवा भारत आहे. मग या नव्या भारतात पोलीस गुंडांसारखे का वागू लागले, हा प्रश्न तरुण विचारत आहेत. हा नवा भारत आहे. मग पोलीस सूड घेतल्यासारखी वर्तणूक का करत आहेत, हा प्रश्न तरुण विचारत आहेत. हा नवा भारत आहे. ज्या भारतात 60 टक्के तरुण आहेत आणि 2029 च्या निवडणुकीपर्यंत या तरुणांच्या हातात देशातील सत्तेची चावी असणार आहे. मोदी आपल्या भाषणांमध्ये म्हणतात की, देशाचा तरुण ही आपली सर्वात मोठी ताकद आहे. मग प्रश्न असा आहे की, या ताकदीला चिरडण्याचा प्रयत्न का होतोय?

आंदोलनं यूपीएच्या काळातही झाली. तेव्हा संसदेकडे निघालेल्या तरुणांवर वॉटर कॅननचा वापर करणाऱ्या आणि लाठ्या उगारणाऱ्या सरकारला घरी जावं लागलं होतं. त्यावेळी मोदींना तरुणांचा कळवळा होता, कणव होती. आता बारा वर्षांनंतर पुन्हा आंदोलनांचा दौर सुरू झाला आहे. मग आता आंदोलकांबद्दलचा तिरस्कार पोलिसांच्या कारवाईतून का दिसतोय, हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सरकारला प्रश्न विचारणं हा सरकारविरोधातील द्रोह नाही. सरकारला उत्तरदायित्वाची आठवण करून देणं हा गुन्हा नाही. याची आठवण सरकारनेही ठेवली पाहिजे.

सरकारने किंवा राजाने फार उंचावर बसू नये. उंचावरून खालचं सगळं जग छोटं छोटं दिसू लागतं. जग छोटं छोटं दिसू लागलं की, समजावं की काहीतरी गडबड आहे. कुठे गडबड आहे? काय गडबड आहे? हे शोधण्याची वेळ राजाचीही आहे आणि खालून राजाकडे पाहणाऱ्या प्रजेचीही आहे.