Gopichand Padalkar on Jayant Patil, सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटी गटातून विजय मिळवला आहे. पडळकर यांनी 54 मते मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार विनोद पवार यांचा 20 मतांनी पराभव केला. विनोद पवार यांना 34 मते मिळाली. या निकालानंतर जत तालुक्यात पडळकर यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पडळकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'करेक्ट कार्यक्रम' करणाऱ्यांचा आम्ही 'टप्प्यात आणून' कार्यक्रम केला', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निवडणुकीत पडळकर यांच्याविरोधात विनोद पवार यांनी उमेदवारी दाखल केली होती. विनोद पवार हे जत तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांचे बंधू आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सांगली जिल्हा बँकेचा पहिला निकाल जाहीर; गोपीचंद पडळकरांचा मोठा विजय; किती मतं मिळवली?
विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवले जात असल्याचा पडळकरांचा आरोप
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 15 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. त्यापैकी जत तालुका 'अ' वर्ग विकास संस्था सोसायटी गटाचा निकाल जाहीर झाला असून, या गटातून गोपीचंद पडळकर विजयी झाले आहेत. या विजयानंतर त्यांनी विरोधकांकडून सातत्याने फेक नरेटिव्ह पसरवले जात असल्याचा आरोप केला. 'विद्यमान आमदार जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभा राहिला की पराभूत होतो आणि त्यानंतर विधानसभेलाही पडतो, असे सांगितले जात होते. मात्र, जतच्या जनतेने हे नरेटिव्ह मोडीत काढले आहे. मतदारांनी माझ्या पाठीशी भक्कम ताकद उभी करून नवा इतिहास निर्माण केला', असे पडळकर म्हणाले. तसेच विरोधकांच्या 'करेक्ट कार्यक्रम' या विधानावर प्रत्युत्तर देताना त्यांनी, 'टप्प्यात आल्यावर कोणीही कार्यक्रम करतं, आम्ही मात्र त्यांना टप्प्यात आणून मैदानात त्यांचा कार्यक्रम केला आहे', असा टोला लगावला. मतदानाच्या दिवशी विरोधकांना मिरजेतूनच माघारी फिरावे लागले. जत आणि कवठेमहांकाळमध्ये पाऊल ठेवण्याची हिंमतही ते दाखवू शकले नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
हेही वाचा ; निलेश लंकेंची जिल्हा बँकेत धमाकेदार एन्ट्री, विखे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव
'विरोधकांनी तब्बल सहा वेळा न्यायालयाच्या पायऱ्या चढल्या'
या निवडणुकीत आपला विजय रोखण्यासाठी विरोधकांनी न्यायालयीन प्रक्रियेचा आधार घेतल्याचा आरोपही पडळकर यांनी केला. 'या एका निवडणुकीसाठी विरोधकांनी तब्बल सहा वेळा न्यायालयाच्या पायऱ्या चढल्या. कच्ची मतदार यादी, डीडीआर, सहनिबंधक, सर्किट बेंच कोल्हापूर ते थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत आमचा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, शेवटी सत्याचा आणि जतच्या जनतेचाच विजय झाला', असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारावरही भाष्य केले. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून जिल्हा बँकेवर एकहाती ताबा ठेवून संस्था मोडीत काढायच्या आणि त्या कवडीमोल भावाने विकत घ्यायच्या, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 'ही बँक कोण्या पुढाऱ्यांची किंवा आमच्या बापाची नाही, तर गरीब शेतकरी सभासदांची आहे. मूठभर पुढाऱ्यांची मक्तेदारी आम्ही चालू देणार नाही. चांगल्या संस्था आणि कारखान्यांना आम्ही ताकद देऊ, मात्र खोटेपणा करणाऱ्यांचा पर्दाफाश करू', असेही पडळकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कवठेमहांकाळमधून 'अ' गटातून विजयी झालेले ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे सरकार यांचेही पडळकर यांनी अभिनंदन केले. त्यांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी आखलेली व्यूहरचना घोरपडे यांनी उधळून लावल्याचे ते म्हणाले. आपल्या विजयाचे श्रेय देताना पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, सुरेश शिंदे सरकार, डॉ. रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे, आप्पासाहेब नामद आणि संजीव सावंत यांच्यासह स्थानिक नेते व महायुतीच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. जिल्हा बँकेची निवडणूक ही शेतकरी सभासदांच्या हिताशी संबंधित असून, बँकेवर मूठभर पुढाऱ्यांची मक्तेदारी चालू देणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा मांडली. या निकालामुळे सांगली जिल्हा बँकेच्या उर्वरित सहा जागांच्या निवडणुकीकडेही लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












