Raj Thackeray : दरवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेद्वारे दिवाळीनिमित्त साजरा केला जाणारा दीपोत्सव यंदा साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ संदेशाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्रातील दुष्काळामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांपैकी काहीजण गरबा खेळत बसल्याचंही ते म्हणाले.
ADVERTISEMENT
'महाराष्ट्र एका विचित्र अवस्थेतून जातोय'
राज ठाकरे म्हणाले की, 'दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा उत्सव साजरा व्हावा हे मला काही पटलं नाही. आज महाराष्ट्र एका विचित्र अवस्थेतून जातोय. ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुष्काळ तर भयानक आहे आणि येणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उत्साहात आपण दिवाळी साजरी करतोय ते पाहणं, ग्रामीण भागातील महिलांना, त्यांच्या कच्च्या बच्च्यांना काय वाटत असेल या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे.'
हे ही वाचा : काँग्रेसच्या बसमधील व्हिडिओ व्हायरल, महिला खासदारावर हात उचलल्याचा आरोप, शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी
'ते गरबा खेळत बसले'
यापुढं ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 72 पेक्षा हा भयानक दुष्काळ असेल. हे त्यांनी अगोदर जाहीर करुनदेखील सत्ताधारी पक्षातील लोकांना बहुधा ते समजलं नाही आणि ते गरबा खेळत बसले. तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु अशाप्रकारचा दीपोत्सव साजरा करणं मला काही पटत नाही. म्हणून यावर्षी दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. पुढील वर्षी सगळं ठीकठाक होईल, व्यवस्थित होईल अशी आशा अपेक्षा आहे.'
हे ही वाचा : Maharashtra Weather : दिवाळी सणाच्या तोंडावर मुरासू चक्रीवादळ, 'या' जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट
'उत्साहाला आवर घालण्याची आवश्यकता'
राज्यातील जनतेला विनंती करताना ते म्हणाले की, 'आज महाराष्ट्रातून असंख्य ठिकाणांहून तांडेच्या तांडे बाहेर पडून शहरांकडे येतील. शहरांची परिस्थिती आता आपण बघतोच आहोत. माझी आपल्याला देखील नम्र विनंती आहे की, आपल्याला काळी दिवाळी साजरी नाही करायची. परंतु त्या उत्साहाला आपण आवर घालण्याची आवश्यकता आहे. फटाके फोडताना, रोषणाई करताना आवर घालणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे. महाराष्ट्रातला नागरिक होरपळत असताना आपण प्रचंड मोठ्या प्रमाणवरती उत्सव साजरा करायचा हे मला पटत नाही, आपल्यालाही नाही पटलं पाहिजे. पुढल्या वर्षी पुन्हा एकदा ही दिवाळी, दीपोत्सव साजरा करुया.'
ADVERTISEMENT












