मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी हजारो आंदोलकांसह थेट मुंबईत धडक मारली आहे. मुंबईतील आझाद मैदानात त्यांनी आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी आता थेट मुंबईत येऊन जरांगेंनी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच सगळ्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
'आमचं सरकार सगळ्या समाजाने निवडून आणलं आहे. त्यामुळे प्रत्येक समाजाला सांभाळावं लागेल. कोणावरही अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे.' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत त्यांची सविस्तर भूमिका स्पष्ट केली.
मनोज जरांगे मुंबईत.. वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
'मला असं वाटतं की, आज सकाळी आंदोलक आले आहेत. मनोज जरांगे-पाटील हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी देखील सर्वांना आवाहन केलं आहे की, आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे. सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शासनाची भूमिका पण सहकार्याचीच आहे. कारण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगितलं की, लोकशाही पद्धतीने एखादं आंदोलन चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही. कारण चर्चेतून प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्यातीलच एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीने आम्ही करतो आहोत. विशेषत: उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार, सगळं सहकार्य चाललं आहे.'
हे ही वाचा>> 'आता पाटील म्हणतील तसं..', अखेर मनोज जरांगे आझाद मैदानावर धडकले, मराठा आंदोलकांचा मुंबईत एल्गार
'हे खरं आहे की, तुरळक प्रमाणात काही ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको केला, ट्रॅफिक जाम केलं.. पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या ठिकाणीही आंदोलकांनी सहकार्य केलं आणि त्या-त्या जागा मोकळ्या केल्या आहेत.'
'अर्थात एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं आल्यावर ट्रॅफिक जाम होतं असतं. अर्थात या सगळ्या गोष्टीत एका गोष्टीची खबरदारी निश्चितपणे घ्यावी लागेल की, काही लोकं जरा वेगळ्या पद्धतीने वागतात आणि त्यामुळे संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागतं. तर अशा प्रकारे कोणी वागू नये याकडे लक्ष द्यावं लागेल.'
'मला असं वाटतं की, मनोज जरांगे-पाटील यांनीही तशाच प्रकारचं आवाहन केलं आहे की, कोणीही आडमुठेपणाने वागू नये. शेवटी मी देखील आंदोलकांना हेच आवाहन करणार आहे. कारण, आज त्याठिकाणी जे काही चालेलेलं आहे ते उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला काम करावं लागणार आहे. आता हे काही शासनाच्या निर्देशाने नाहीए.'
हे ही वाचा>> मनोज जरांगेंनी केली गणपती बाप्पाची आरती, मुंबईकडे कूच करण्याआधी CM फडणवीसांवर साधला निशाणा, म्हणाले..
'उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करणार आहे. त्यामुळे प्रशासनावरही काही बंधनं ही उच्च न्यायलयाने टाकलेली आहेत ती पाळावी लागतील. अर्थात त्या बंधनात राहून लोकशाही पद्धतीने सगळं सहकार्य हे त्या ठिकाणी प्रशासनही करतंय आणि सरकारचंही त्या ठिकाणी वेगळं कुठलं मत नाही.'
'त्यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून पोलीस त्याचा सकारात्मक विचार करतील. या आंदोलनात त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यांसंदर्भात जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की, आम्ही कमिटी तयार केली आहे.'
'आमच्याकडे आधी ज्या मागण्या आल्या होत्या त्याबाबत उपसमिती विचार करत आहे. कायदेशीर मार्ग काढावा लागेल. केवळ आश्वासन देऊन चालणार नाही. संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा सध्या प्रयत्न आहे. मी असेन, एकनाथ शिंदे असो अजितदादा असोत आम्ही संपर्कात आहोत.'
'आम्ही समितीला सांगितलं आहे की, त्यांनी चर्चा करून आमच्याशी पण चर्चा करावी. जेणेकरून यातून आपल्याला मार्ग काढता येईल. शेवटी आमचा एकच प्रयत्न आहे की, कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांपुढे उभे राहिले आहेत. अशाप्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहू नये.'
'म्हणून ओबीसी समाजाला पण आपल्याला सांभाळावं लागेल, मराठा समाजालाही न्याय द्यावा लागेल.'
'मी पुन्हा एकदा सांगतो की, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की, गेल्या 10 वर्षामध्येच जेवढा काळ आमचं पहिलं युतीचं सरकार होतं, दुसरं युतीचं सरकार आणि आता तिसरं युतीचं सरकार.. या काळातच मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे. इतर कुठल्याही काळात मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही. आरक्षण देण्याचं कामही आम्ही केलेलं आहे, सारथीचं कामही आम्ही केलं आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं कामही आम्ही केलं आहे.'
'या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या किंवा वेगवेगळ्या असतील.. या सगळ्या गोष्टी आमच्याच सरकारने केलेल्या आहेत. यामुळे मराठा समाजबाबत आम्ही सकारात्मकच आहोत. कुठल्याही प्रकारे मराठा समाजाबाबत आमच्या मनात शंका नाही. या समाजाच्या पाठिशी आम्ही आहोत. पण त्याचवेळी काही लोकं जाणीवपूर्वक हा प्रयत्न करत आहेत की, दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजे. कसं ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लागलं पाहिजे.'
'काही लोकांच्या प्रतिक्रिया मी सकाळी बघितल्या. त्यांचे प्रयत्न काय आहेत ते माझ्या लक्षात येतंय. पण त्यांना मी सांगतो की, अशाप्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं तोंड भाजेल. हे मला त्यांना सांगायचंय. शेवटी मुंबई, महाराष्ट्र आमचं सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असतो त्याचा दीर्घ कालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतून घ्यायचे असतात. एकाला समोर करायचं मग दुसऱ्याला नाराज करायचं. मग त्याला समोर आणायचं.. अशा प्रकारचे प्यादे लढवणे, लोकं झुंजवणे हे या सरकारचं धोरण नाही. आम्ही त्यातून प्रयत्नपूर्वक मार्ग काढू. पण लोकांना त्रास होईल असं कुणीही वागू नये.'
'चर्चेतून मार्ग निघतो. त्यांनाही माहिती आहे की, कायदे आहेत.. व्यवस्था आहे. समिती आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम पदरात पडत असतात असं नाहीए. पण आपण चर्चेतून मार्ग काढतो. मागच्या काळात आपण 10 टक्के आरक्षण दिलं. आज 10 टक्के आरक्षण लागू आहे. त्या 10 टक्क्यांपर्यंत भरती सुरू आहे. ते आरक्षण कोर्टाने कुठेही नाकारलेलं नाही. कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आताची परिस्थिती अशी नाही की, मराठा समाजाला आरक्षण नाही.. ते आहेच. मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे.'
'पण एक गोष्ट निश्चित आहे की, वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत. त्या पक्षांना आवाहन आहे की, सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची आहे तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही.'
'आम्ही तर बोललोच होतो. याचंही करा, त्याचंही करा.. अशाप्रकारची भूमिका नको. जी कायदेशीर भूमिका घ्या.. तुमची भूमिका सांगा.. पण ते हे करणार नाहीत. कारण त्यांना समाजा-समाजात भांडण होताना कुठेतरी त्यांना राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत.'
'आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येने निवडून आलं कारण की आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे. सगळ्या समाजाने मतदान केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना सांभाळावं लागेल. सगळ्यांना सांभाळून त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करता येतील असा आम्हाला प्रयत्न करायचा आहे.' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
