प्रविण नलावडे, मीरारोड: मीरारोडच्या सेवन स्क्वेअर अकॅडमीच्या परिपत्रकावरून सुरू झालेला वाद आता आमदार नरेंद्र मेहता यांच्या हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या मेनूपर्यंत पोहोचला आहे. पर्युषण काळात विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे पदार्थ टाळावेत, अशा सूचनांवरून मनसेने आक्षेप घेत आंदोलन केलं होतं. त्यानंतर शाळेने हे परिपत्रक मागे घेतल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला.
ADVERTISEMENT
आता मनसे पदाधिकाऱ्यांनी थेट आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेवन इलेव्हन क्लब आणि फाउंटन परिसरातील सीएन रॉक हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर सवाल उपस्थित केला आहे.
‘हॉटेलमध्ये पदार्थ विकता, मग विद्यार्थ्यांवरच नियम का?’
मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे आणि शहर सचिव सचिन साळुंखे यांनी सेवन इलेव्हन क्लबमध्ये जाऊन चना गार्लिक, सलाड आणि फ्रेंच फ्राय ऑर्डर केल्याचा दावा केला आहे. या पदार्थांमध्ये कांदा, लसूण आणि बटाट्याचा वापर होत असल्याचं मनसेचं म्हणणं आहे.
त्यानंतर मनसे पदाधिकारी फाउंटन येथील सीएन रॉक हॉटेलमध्येही गेले. तिथेही संबंधित पदार्थ उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
एकीकडे विद्यार्थ्यांना कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे पदार्थ टाळण्याच्या सूचना दिल्या जातात, तर दुसरीकडे संबंधित हॉटेलमध्ये याच घटकांचा वापर असलेले पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
नरेंद्र मेहता यांनी यापूर्वी कांदा, बटाटा, अद्रक आणि लसूण हे आरोग्यासाठी चांगले नसल्याचं सांगितल्याचा दाखला देत, ‘ही भूमिका फक्त विद्यार्थ्यांसाठीच का?’, असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला.
काँग्रेसचीही मेहता यांच्या भूमिकेवर टीका
मनसेनंतर आता काँग्रेसनेही या मुद्द्यावरून नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांनी मेहता यांच्या भूमिकेवर टीका केली.
कांदा, लसूण, बटाटा आणि बीट हे शरीरासाठी चांगले नाहीत, अशी भूमिका नरेंद्र मेहता यांनी घेतली असेल तर त्यांनी विज्ञान आणि जीवशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज आहे, असा टोला मुजफ्फर हुसेन यांनी लगावला.
जर सेवन इलेव्हन क्लब आणि सी अँड रॉक येथे केवळ जैन पद्धतीचं जेवण द्यायचं असेल, तर ‘येथे फक्त जैन जेवण मिळेल’ अशी जाहिरात करावी, असंही हुसेन यांनी म्हटलं.
‘आमदारांनी संविधानाचा अभ्यास करावा’
मुजफ्फर हुसेन यांनी नरेंद्र मेहता यांच्या आमदारपदाचाही संदर्भ घेतला. नरेंद्र मेहता हे आमदार असून त्यांनी संविधानाची शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांनी संविधानाचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं हुसेन म्हणाले.
संविधानाचा अभ्यास केला असता तर शाळेत अशा प्रकारचं दिशाभूल करणारं आणि चुकीचं परिपत्रक काढलं नसतं, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आहारासंदर्भातील शाळेच्या परिपत्रकावरून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. मनसे आणि काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आमदार नरेंद्र मेहता किंवा संबंधित हॉटेल व्यवस्थापनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या आरोपांवर त्यांची बाजू काय आहे, हे स्पष्ट होणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT












