Mumbai NCP Meeting : मुंबईतील एनसीपीच्या बैठकीत काय ठरलं?

ओमकार वाबळे

27 Nov 2026 (अपडेटेड: 27 Nov 2026, 08:15 AM)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेतून आणि या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांतून जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा.

Mumbai NCP Meeting

Mumbai NCP Meeting

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक

point

नव्या समीकरणांची जुळवाजुळव?

Mumbai NCP Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण, भाजपसोबत जाण्याची शक्यता आणि सुप्रिया सुळे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबईतील बलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या विविध विभागांच्या बैठका सुरू असून, या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाची पुढील रणनीती ठरवली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे या बैठकीतून अचानक बाहेर पडून ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्या भेटीसाठी गेल्याने चर्चांना आणखी उधाण आले. शरद पवार यांना डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, डॉक्टरांनी त्यांना विश्रांती आणि प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

हे वाचलं का?

नव्या समीकरणांची जुळवाजुळव?

शरद पवार यांच्या राजकीय वाटचालीचा विचार केला तर भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवरून यापूर्वीही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. 2014 मध्ये प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. 2019 मध्ये पहाटेचा शपथविधी, अजित पवार यांचे भाजपसोबत जाणे आणि त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना या घडामोडींमध्ये शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका होती. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र, अलीकडेच ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्या भेटीला गेलेल्या प्रफुल्ल पटेल यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणार का, तसेच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू आहे का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे ही वाचा : Personal Finance: घर खरेदीसाठी जमा केलेले पैसे SIP मध्ये ठेवणे कितपत योग्य?

सुप्रिया सुळे, रोहित पवार यांची भूमिका महत्त्वाची

या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोन नेत्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरत आहेत. सुप्रिया सुळे यांचे राजकारण सुरुवातीपासूनच सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध राखणारे आणि तुलनेने सावध भूमिका घेणारे राहिले आहे. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर त्यांनी अद्याप स्पष्ट विरोधाची भूमिका घेतलेली नसल्याने भाजपसोबत त्यांचे राजकीय समीकरण जुळत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, रोहित पवार यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकरी प्रश्न, शक्तिपीठ महामार्ग, एमपीएससी विद्यार्थ्यांची आंदोलने, कांदा उत्पादकांचे प्रश्न आणि सरकारविरोधातील आरोपांमुळे ते विरोधकांचा आक्रमक चेहरा म्हणून पुढे येत आहेत. विशेष म्हणजे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि अजित पवार यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेले प्रश्न यामुळे त्यांची भूमिका अधिक चर्चेत आली आहे. त्यामुळे एका बाजूला सुप्रिया सुळे यांची सावध राजकीय भूमिका, तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांचा आक्रमक पवित्रा, अशा दोन वेगवेगळ्या दिशांनी राष्ट्रवादीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

हे ही वाचा : दोन दिवसांनी साखरपुडा होणार होता, त्याआधीच बापाने लेकीला संपवलं; धक्कादायक कारण समोर

राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय

दरम्यान, शरद पवार यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. भाजपसोबत जाण्याबाबत ते होकारही देत नाहीत आणि ठाम नकारही देत नाहीत. राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत योग्य वेळी निर्णय घेण्याची त्यांची रणनीती असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, केंद्रातील राजकीय गणितांसाठी भाजपला प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याची गरज असल्याने शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्याबाबतही हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी गटांचे विलीनीकरण होणार की नाही आणि शरद पवार स्वतः भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शरद पवार यांच्या पुढील राजकीय खेळीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.