Uttar Pradesh Vidhansabha Election : उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक 4 महिन्यांवर येऊन ठेपलीये. ज्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांचं राजकीय भविष्य ठरणार आहे, त्याच निवडणुकीत दोन दिग्गज मुस्लिम नेत्यांच्या राजकीय वादाचीही चर्चा जोरात रंगलीय. 'अब्दुल दरी नहीं बिछाएगा, अब अब्दुल की सरकार आयेगी और अब्दुल नेता बनेगा..', विधान करत असदुद्दीन ओवैसी यांनी यूपीतल्या मुस्लिम मतदारांना साद घातलीय, तर त्यांच्याविरोधात समाजवादी पार्टीचे अत्यंत प्रभावशाली मुस्लिम नेते मानल्या जाणाऱ्या आजम खान यांनी मैदानात उतरून दंड थोपटलेत. जे नाव थेट अल्लाशी जोडलं जातं, त्या अब्दुल नावाचा अपमान झालाय, असा राग आजम खान यांनी आवळलाय. त्यामुळे आता यूपीत अब्दुल नावावरून राजकारण का तापलंय? उत्तर प्रदेशात देशातील दोन मोठे मुस्लिम राजकीय चेहरे एकमेकांसमोर का आलेत? ओवैसी आणि आजम खान अचानक आमने-सामने आले की त्यांना आणलं गेलंय? यूपीच्या राजकारणात ओवैसी आजम खान यांना रिप्लेस करू पाहताहेत का? उत्तर प्रदेशात जवळपास 20 टक्के मुस्लिम मतदार आहेत, यूपीत मुसलमान मतांचा अंदाजे 143 विधानसभा मतदारसंघात थेट प्रभाव पडतो, समाजवादी पार्टीला मिळणाऱ्या मुस्लिम मतांमध्ये ओवैसी फुट पाडू शकतील का? अखिलेश यादवांचं एमवाय आणि पीडीएचं गणित ओवैसींमुळे गणित बिघडू नये म्हणून आजम खान यांना मैदानात उतरवलं गेलंय का? या सगळ्या प्रश्नांची समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बारामती : थार चालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला उडवलं; व्हिडीओ व्हायरल
मुस्लिम-यादव फॉर्म्यूल्याला तडा देण्याचा ओवैसींचा प्रयत्न
उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतांभोवती कसं राजकारण सुरू झालंय? हे पाहण्यापूर्वी ओवैसी नेमकं काय म्हणाले होते ते बघणं महत्त्वाचं आहे. एका मुलाखतीत मुस्लिम मतदारांना उद्देशून बोलताना ओवैसी म्हणाले की, 'अब्दुल अब दरी नहीं बिछाएगा, अब्दुल आँख मे आँख डाल कर उस का हिस्सा लेगा, अब अब्दुल की सरकार आयेगी और अब्दुल नेता बनेगा', म्हणजे आता मुस्लिम कोणाच्या सतरंज्या उचलणार नाहीत, असं म्हणत ओवैसींनी अखिलेश यादवांच्या मुस्लिम-यादव फॉर्म्यूल्याला तडा देण्याचा प्रयत्न केला. परंतु काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलेल्या आजम खान यांनी ओवैसींच्या विरोधात मोर्चा उघडला. ते म्हणाले की.. 'अब्दुल लफ्ज को आप इतनी घटिया सिसायत के लिए इस्तेमाल कर रहें हो? सरकार मे बैंठे ओहदे दारां को खुश कर ने के लिए? कुछ फायदा हासिल कर ने के लिए, आप उस नाम की जिल्लत कर रहें हैं, जो सिधे अल्लाह के नाम से जुडता हैं. अगर मुसलमान को जलील ही करना था, तो जुम्मा भाई कह देते, मुन्ना भाई कह देते, अब और कितना जलील करोगे?', असं म्हणत त्यांनी अजूनही युपीत मीच सर्वात मोठा मुस्लिम नेता आहे, हे ओवैसींना अप्रत्यक्षरित्या सांगण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : पुणे : एसटीला ओव्हरटेक करताना भीषण अपघात, MPSC करणारी तरुणी चाकाखाली चिरडली, VIDEO
आजम खान आहेत तरी कोण?
आता तुम्ही म्हणाल हे आजम खान कोण आहेत? तर आजम खान हे उत्तर प्रदेशातील अत्यंत प्रभावशाली मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जातात. मुलायम सिंह यांचे अत्यंत जवळचे नेते म्हणून त्यांना ओळखळं जायचं. 10 वेळा आमदार, रामपूरमधून एकदा खासदार आणि पश्चिम युपीतील अनेक जिल्ह्यांमध्ये आजम खान यांची मोठी राजकीय पकड असल्याचं सांगितलं जातं. परंतु गेले काही वर्ष ते तुरुंगात होते, मुलाच्या जन्मदाखल्यातील कथित बनावटगिरी, जमीन बळकावल्याचे आरोप, घरात घुसून तोडफोड केल्याचे प्रकरण, द्वेषपूर्ण भाषण प्रकरण आणि दोन PAN कार्ड प्रकरणात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देखील झालेली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना जामीन मंजूर झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूडाच्या भावनेने कारवाई केली होती, असा आरोप आजम यांनी अनेकदा केला होता. रामपूरमधील जौहर विद्यापीठावरील कारवाईनंतरही आजम खान यांना टार्गेट करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले.
त्यामुळे जेलमधून बाहेर आल्यानंतर आजम खान हे पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा मुस्लिम चेहरा म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरूय, सोबतच ओवैसींवर थेट टीका करण्यावर अखिलेश यादवांना मर्यादा आहे, ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आजम खान करत आहेत का? समाजवादी पक्षाची सत्ता आली तर त्यातून स्वत:चंही राजकीय पूनर्वसन करण्याचं स्वप्न आजम खान यांना पडत असल्याचंही बोललं जातंय. दुसरीकडे हैदराबादेतून येणाऱ्या ओवैसींनी आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आसाम आणि पश्चिम बंगालमध्येही हात-पाय पसरवले, परंतु त्यांना मोठी मुस्लिम लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात अजूनही मोठा चमत्कार करता आलेला नाहीये? म्हणून पॅन इंडिया प्रेझेन्स तयार करून देशभर समाजमान्यता मिळवण्याचा प्रयत्न ओवैसींकडून सुरू असल्याची चर्चा आहे.
परंतु उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदार किती महत्त्वाची भूमिका बजावतात? मागच्या निवडणुकीत भाजप, सपा किंवा ओवैसींनी मुस्लिम भागांमध्ये किती जागा जिंकल्या? तर पश्चिम उत्तर प्रदेश, रोहिलखंड आणि तराई भागात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. रामपूर, मुरादाबाद, बिजनौर,सहारनपूर, मुजफ्फरनगर, अमरोहा, बलरामपूर, बरेली, मेरठ आणि बहराइच या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 35 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विधानसभेच्या 73 जागांवर मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांपेक्षा अधिक तर ७० जाागंवर मुस्लिम लोकसंख्या 20 ते 30 टक्के असल्याचं सांगितलं जातं. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 14 मुस्लिमबहुल जिल्ह्यांतील 75 जागांपैकी 38 तर समाजवादी पार्टीने 30 जागा जिंकल्या होत्या. हिंदू मतांचे एकत्रीकरण, विरोधी पक्षांमधील मतविभाजन आणि स्थानिक राजकारणामुळे भाजपला हे यश मिळवता आलं असं सांगितलं गेलं. ओवैसींच्या पक्षाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 95 जागांवर उमेदवार उभे केले होते, परंतु संपूर्ण उत्तर प्रदेशात MIM ला केवळ 4 लाख 50 हजार लाख मतं मिळाली, ज्यामुळे ओवैसींना एकही आमदार निवडून आणता आला नाही. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीत खरा मुस्लिम चेहरा कोण? सत्ता कोणाची येणार? ओवैसी मुस्लिम मतांमध्ये फूट पाडतील की किंगमेकर ठरतील? की दहा वर्षे सत्तेच्या बाहेर राहिलेल्या अखिलेश यादवांसाठी आजम खान पुन्हा एकदा तारणहार ठरतील? या प्रश्नांची उत्तरं आगामी काळात मिळणारय.
ADVERTISEMENT











