शिवसेना सुनावणी : तेव्हा कुठे गेलेला मतभेद? सिब्बलांचा थेट सवाल, कोर्टात काय घडलं?

अनुजा धाक्रस

• 04:34 PM • 25 Nov 2026

Shivsena symbols case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. शिंदे गटाला खरी शिवसेना मानणे घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केला.

Shivsena symbols case

Shivsena symbols case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शिवसेना सुनावणी : तेव्हा कुठे गेलेला मतभेद?

point

सिब्बलांचा थेट सवाल, कोर्टात काय घडलं?

Shivsena symbols case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याचा घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाच्या निकालाच्या थेट विरोधात असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 

हे वाचलं का?

हेही वाचा : 'भांडणं थांबवा आणि...', सुप्रिया सुळेंची 'त्या' गोष्टीसाठी सरकारला हात जोडून विनंती!

विधानसभा अध्यक्षांनी 'या' दोन्ही गोष्टींची गल्लत केली - सिब्बल 

विधिमंडळातील बहुमत आणि राजकीय पक्ष या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी या दोन्ही गोष्टींची गल्लत केली आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा निवडून आलेला सदस्य ही स्वतंत्र कायदेशीर व्यक्ती नसतो, तर तो त्या राजकीय पक्षाचा सदस्य असतो. त्यामुळे विधिमंडळ पक्षाला स्वतंत्र अस्तित्व देऊन शिंदे यांना नेते आणि भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता कशी दिली जाऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा निर्णय वेळीच रोखला नाही, तर त्याचे लोकशाहीवर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही सिब्बल यांनी दिला.

हेही वाचा : मुंबई : 'बॅग भरली होती, उद्या हॉस्टेलला जाणार होता...' पण काळाने घातला घाला; बिल्डरवर गंभीर आरोप

एकनाथ शिंदे अन् त्यांच्या समर्थक आमदारांनी MVA सरकारमध्ये मंत्रिपदे भूषवली

सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी 2019 ते 2022 या कालावधीतील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. 10 नोव्हेंबर 2019 रोजी भाजपने राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण नाकारले आणि भाजप-शिवसेना यांची निवडणुकीपूर्वी केलेली युती संपुष्टात आणली. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 23 नोव्हेंबर 2019 रोजी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि 30 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. 2019 ते 2022 या काळात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सरकारमध्ये मंत्रिपदे भूषवली. या काळात त्यांनी कोणताही विरोध नोंदवला नव्हता. त्यामुळे त्यांच्यात मतभेद किंवा पक्षांतर्गत असंतोष असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे सिब्बल यांनी नमूद केले.

20 जून 2022 रोजी शिंदे गटातील आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले आणि 21 जून रोजी ते सुरतला गेले. त्यानंतर ते गुजरातमधून आसाममध्ये गेले. भाजपशासित राज्यात एकत्र राहून त्यांनी ठराव मंजूर केले. पक्षात मतभेद होते, तर त्यांनी सुरतला जाण्याऐवजी मुंबईत परत येऊन पक्षाचे सर्वसाधारण अधिवेशन बोलवायला हवे होते, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. 21 जून रोजी सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला होता. हा व्हीप बजावल्याचे शिंदे गटाने सुनील प्रभू प्रकरणात दाखल केलेल्या उत्तरात मान्य केले आहे. मात्र, त्याच वेळी व्हीपला अधिकार नसल्याचा दावा त्यांनी केला. 22 जून रोजी विधानसभा अधिवेशनाला उपस्थित न राहता त्यांनी पक्षाच्या व्हीपला आव्हान दिले. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. त्यामुळे त्यांची कृती पक्षविरोधी होती, असे सिब्बल यांनी सांगितले.

शिंदे गटाचा उद्देश महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा होता, असा आरोपही सिब्बल यांनी केला. 21 जून रोजी आमदारांनी भाजपशासित राज्यात एकत्र राहून घेतलेल्या निर्णयांना पक्षांतर्गत मतभेदांचे स्वरूप देता येणार नाही. अपात्रतेच्या सुनावणीत आमदारांचे पुढील वर्तनही विचारात घेणे आवश्यक आहे. राज्यपालांनी 22 जून रोजी बहुमत चाचणीचे निर्देश का दिले? यामागे आमदारांनी पक्षांतर केल्याचे गृहीतक होते. मात्र, राज्यपालांचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने रद्द केला होता, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

 निवडणूक आयोगाचा निर्णय हा वेगळ्या आधारावर होता. अपात्रतेचा निर्णय आधी न घेतल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, असे सिब्बल म्हणाले. विधानसभा अध्यक्षांचा शिंदे गटाला खरी शिवसेना मानण्याचा निर्णय केवळ चुकीचा नसून घटनाबाह्य आहे. अशा युक्तिवादाला मान्यता दिल्यास कोणत्याही राजकीय पक्षातील काही आमदारांना एकत्र करून सरकार पाडण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे लोकशाही आणि पक्षव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले.