'जर दम होता तर...', जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात जोरदार वादावादी

इम्तियाज मुजावर

23 Nov 2026 (अपडेटेड: 23 Nov 2026, 01:01 PM)

Jaykumar Gore on Shambhuraj Desai : सातारा जिल्हा बँकेतील सत्तास्थापनेवरून मंत्री जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'जर दम होता तर वेगळी निवडणूक लढायची होती', असं म्हणत गोरे यांनी देसाईंना टोला लगावला.

Jaykumar Gore on Shambhuraj Desai

Jaykumar Gore on Shambhuraj Desai

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

'जर दम होता तर वेगळी निवडणूक लढायची होती'

point

जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना टोला

Jaykumar Gore on Shambhuraj Desai, सातारा :  सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तास्थापनेवरून महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आमनेसामने आले आहेत. सातारा जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्थापन केली. या सत्तास्थापनेत भाजपला दूर ठेवण्यात आल्याने मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता या मुद्द्यावरून मंत्री जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जयकुमार गोरे यांनी शंभूराज देसाई यांना उद्देशून 'जर दम होता तर वेगळी निवडणूक लढायची होती', असा टोला लगावला. त्यांच्या या विधानाला शंभूराज देसाई यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या सत्तास्थापनेवरून महायुतीमधील राजकीय वातावरण तापलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : Solapur Drought | पाण्यासाठी 300 फूट खोल बोगद्यात उतरले शेतकरी; राजेंद्र राऊत यांच्यावर थेट आरोप

'जर दम होता तर त्यांनी वेगळी निवडणूक लढायची होती' : गोरे

मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेत या वादावर भूमिका स्पष्ट केली. जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडी आणि जिल्हा बँकेतील सत्तास्थापना या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेत भाजप आणि इतर पक्षांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेतील घडामोडींची तुलना करता येणार नाही, असं गोरे म्हणाले. काही नेत्यांनी जुन्या जखमा खोलवर असल्याचं सांगितलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी जखमेवर औषध लावण्याची गरज मान्य केली. मात्र, कधी कधी अघोरी विद्येने जखमेवर उपचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात, असा टोला त्यांनी लगावला. महायुती म्हणून निवडणूक लढवल्यानंतर आता वेगळी भूमिका घेण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

हेही वाचा : सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्टमुळे अस्वस्थ, धुळ्याच्या महिला महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न?

...तर आम्हालाही अनेक गोष्टी सांगता येतील - शंभूराज देसाई 

'जर दम होता तर त्यांनी वेगळी निवडणूक लढायची होती. तेव्हा निवडणूक लढल्यानंतर जखमा भरल्या, असं सांगण्याचा अधिकार होता. आज तो अधिकार नाही', असं जयकुमार गोरे म्हणाले. आमच्या मतांवर निवडून आलेल्या संचालकांनी सत्तेची निवड केली आहे. त्यामुळे आता त्यावर वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. गोरे यांच्या या विधानानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीवर बोलायचं झालं तर आम्हालाही अनेक गोष्टी सांगता येतील, असं म्हणत त्यांनी गोरे यांना सुनावलं. जिल्ह्यातील 11 जागांवर निवडणूक झाली होती. त्यापैकी मकरंद पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने मिळून सात जागा जिंकल्या, असा दावा त्यांनी केला. आम्ही कधी दमाची भाषा केली नाही आणि करणारही नाही, असं देसाई म्हणाले.

शंभूराज देसाई यांनी पुढे जिल्हा बँकेतील जागांच्या गणिताचा संदर्भ देत जयकुमार गोरे यांच्या विधानावर प्रश्न उपस्थित केले. जिल्हा स्तरावरील पाच जागांमध्ये दोन महिला, एक मागासवर्गीय, एक ओबीसी आणि एक एनटी प्रवर्गातील जागांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. या जागांवर मतदान करणारे ठरावधारक तालुक्यांमधीलच असल्याचंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे निवडणुकीतील आकडेवारी आणि जागांचं गणित समजून घेतलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. वारंवार दमाची भाषा केली जात असेल तर त्यावर एकदा चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, स्वबळावर निवडणूक लढली असती तर जयकुमार गोरे पराभूत झाले असते का? असा सवाल देसाईंना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना ते मंत्रिमंडळातील सहकारी असल्याने त्यांच्याबद्दल काही बोलणार नसल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं. अशा प्रकारे सातारा जिल्हा बँकेतील सत्तास्थापनेवरून सुरू झालेला वाद आता महायुतीतील दोन मंत्र्यांच्या शाब्दिक संघर्षापर्यंत पोहोचला आहे.