घटस्फोटावेळचा 'तो' टी-शर्ट पाठ सोडेना; प्रियांका चतुर्वेदींच्या 'गुगली'वर युजवेंद्र चहल क्लीन बोल्ड!

अजित बायस

23 Nov 2026 (अपडेटेड: 23 Nov 2026, 10:34 AM)

Priyanka Chaturvedi on Yuzvendra Chahal : क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्या फलंदाजांना फिरकीवर नाचवणारा युजवेंद्र चहल आपल्या राजकीय पदार्पणातच माजी खासदार प्रियांका चतुर्वेदींच्या एका ट्विटवर क्लीन बोल्ड झालाय. चहलच्या भाजपमधील नियुक्तीनंतर त्याच्या जुन्या 'शुगर डॅडी' टी-शर्ट प्रकरणाला आता नवा राजकीय ट्विस्ट मिळाला आहे.

Priyanka Chaturvedi on Yuzvendra Chahal

Priyanka Chaturvedi on Yuzvendra Chahal

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रियांका चतुर्वेदींकडून जुन्या टी-शर्टचा संदर्भ देत युजवेंद्र चहलला टोला

point

'मला ड्रामा करायचा नव्हता, टी-शर्टमधून मेसेज दिला'

Priyanka Chaturvedi on Yuzvendra Chahal, नवी दिल्ली : भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) क्रिकेटच्या मैदानावर अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर थयाथया नाचवलं आहे. पण आता त्याच्या राजकीय कारकिर्दीच्या डेब्यू इनिंगमध्ये मात्र शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माजी खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी टाकलेल्या गुगलीवर चहल क्लीन बोल्ड झालाय. विशेष म्हणजे, चतुर्वेदी यांच्या या गुगलीचा बॉल, बॅट किंवा विकेट्सशी काहीही संबंध नाही. विषय आहे 'शुगर डॅडी'चा! चहलच्या वैयक्तिक आयुष्यातील 'शुगर डॅडी' प्रकरणाला आता राजकीय ट्विस्ट मिळालाय. प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर चहलला उद्देशून केलेली टिप्पणी सध्या चांगलीच चर्चेत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्टमुळे अस्वस्थ, धुळ्याच्या महिला महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न?

2 दिवसांपूर्वी चहलच्या भाजपमधील नियुक्तीची बातमी आली आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी क्षणाचाही विलंब न लावता एक गुगली टाकली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "असं दिसतंय की त्याला स्वतःचा 'शुगर डॅडी' मिळालाय. IYKYK (ज्यांना समजायचं, त्यांना समजलं)." त्यांच्या या अवघ्या एका ओळीने क्रिकेट, चहलचं वैयक्तिक आयुष्य आणि राजकारण या 3 पूर्णपणे वेगळ्या जगांना एकाच धाग्यात गुंफून सोशल मीडियावर हास्याचे आणि उपहासाचे फवारे उडवले आहेत.

हेही वाचा : Solapur Drought | पाण्यासाठी 300 फूट खोल बोगद्यात उतरले शेतकरी; राजेंद्र राऊत यांच्यावर थेट आरोप

'मला ड्रामा करायचा नव्हता, टी-शर्टमधून मेसेज दिला'

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी गेल्या वर्षीच्या एका घटनेत दडली आहे. डिसेंबर 2020 मध्ये लॉकडाऊनमधील डान्स क्लासेसच्या निमित्ताने जुळलेलं युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचं लग्न अखेर मार्च 2025 मध्ये संपुष्टात आलं. जवळपास 18 महिने वेगळे राहिल्यानंतर 20 मार्च 2025 रोजी त्यांचा घटस्फोट अधिकृत झाला. मात्र, या विभक्त होण्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती चहलने अंतिम सुनावणीवेळी घातलेल्या टी-शर्टची. घटस्फोटाच्या अंतिम सुनावणीला चहल 'Be Your Own Sugar Daddy' असा संदेश असलेला टी-शर्ट घालून आला होता.

ऑगस्ट 2025 मध्ये राज शमानी यांच्या पॉडकास्टवर चहलने या टी-शर्टबाबत खुलासा केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला असा टी-शर्ट घालण्याचा त्याचा कुठलाही विचार नव्हता. मात्र, दुसऱ्या बाजूने काही घडल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. आपल्याला कोणताही ड्रामा करायचा नव्हता, केवळ एक संदेश द्यायचा होता आणि तो टी-शर्टच्या माध्यमातून दिला, अशी भूमिका चहलने मांडली होती. त्या काळात धनश्रीने 60 कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केल्याच्या अफवाही उडाल्या होत्या, ज्या तिच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावल्या होत्या. अखेर 4.75 कोटी रुपयांच्या पोटगीवर हा घटस्फोट मंजूर झाला. या वाटाघाटी कठीण होत्या, पण शेवटी "मी एक चांगली डील साईन केली," असं चहलने त्या मुलाखतीत सांगितलं होतं.

धनश्रीचं प्रत्युत्तर; 'अरे भाई, व्हॉट्सॲपच केला असतास ना!'

चहलच्या या 'नो-ड्रामा' टी-शर्टवर धनश्री वर्माही फार काळ शांत राहिली नाही. सप्टेंबर 2025 मध्ये 'राइज अँड फॉल' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेली असताना तिने लग्नाच्या आदरापोटी आपण गप्प राहिल्याचं सांगितलं. मात्र, तिने चहलच्या टी-शर्टवर मारलेला टोमणा देखील तितकाच खुमासदार होता. धनश्री म्हणाली, "लोकांना आता हे सांगण्याची वेळ आली आहे की मला साखर (Sugar) अजिबात आवडत नाही, मी साखर सोडली आहे." अर्थात, तिने लगेचच हेही कबूल केलं की तिने साखर सोडली असली तरी पैसे नाही. "पैसा तर खूप महत्त्वाचा असतो, कोणाला पैसा नको असतो?" त्यापूर्वी देखील 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'च्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. चहलला काही सांगायचं होतं, तर त्याने थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करायला हवा होता, असा सार्वजनिक तमाशा करायची काय गरज होती, असा चिमटा तिने काढला होता. तिने या घटनेला 'टी-शर्ट स्टंट' असं संबोधलं होतं.

पोलिटिकल इनिंगची सुरुवात आणि जुन्या टी-शर्टचा हिशोब

चहलच्या वैयक्तिक आयुष्यातील हा अध्याय आता विस्मरणात गेला असं वाटत असतानाच 2 दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलच्या नव्या राजकीय भूमिकेची बातमी समोर आली. भाजपच्या राष्ट्रीय ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणीत 'विशेष निमंत्रित' म्हणून चहलची नियुक्ती झाल्याची बातमी येऊन धडकली. क्रिकेटर्सची राजकारणात एन्ट्री हे काही भारतीय राजकारणासाठी नवीन नाही; पण चहलच्या बाबतीत मात्र त्याचा जुना 'टी-शर्ट' पोलिटिकल पिचवरील त्याच्या पदार्पणाच्याही आधी त्याच्या स्वागतासाठी हजर होता.

प्रियांका चतुर्वेदी यांनी 'एक्स'वर केलेली "त्याला स्वतःचा शुगर डॅडी सापडला" ही टिप्पणी थेट चहलच्या त्या जुन्या टी-शर्टच्या आणि व्हायरल मीम्सच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरली. एकेकाळी स्वतःच 'स्वतःचे शुगर डॅडी व्हा' असा स्वावलंबनाचा संदेश देणाऱ्या क्रिकेटपटूने राजकीय आश्रय घेतल्याचा उपहास करत चतुर्वेदींनी ही चर्चा थेट राजकीय आखाड्यात ओढून आणली.

एकंदरीत, क्रिकेटच्या मैदानावर टप्पा आणि दिशा कितीही अचूक असली, तरी सोशल मीडिया आणि राजकारणाच्या खेळपट्टीवर जुने सेल्फ गोल कधी 'बाऊन्सर'च्या स्वरूपात अंगावर येतील हे सांगता येत नाही. वर्षभरापूर्वी "ड्रामा नको" म्हणून घातलेल्या एका टी-शर्टने चहलच्या नव्या राजकीय प्रवासाच्या पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे लक्ष वेधून घेतलं आहे, ते पाहता असंच म्हणावं लागेल की कधीकधी टी-शर्टवरचे शब्द धुतल्याने जातात, पण इंटरनेटच्या स्मृतीतून मात्र कधीच पुसले जात नाहीत!