पश्चिम बंगालचं नाव बदलणार; 'हे' असेल नवे नाव!

अजित बायस

24 Nov 2026 (अपडेटेड: 24 Nov 2026, 02:46 PM)

देशातील कुठल्याही राज्याचे नाव बदलायचे असल्यास सर्वप्रथम संबंधित राज्य सरकारला अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून राज्य विधानसभेची मंजूरी घ्यावी लागते.

Paschim Banga

Paschim Banga

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पश्चिम बंगालचं नाव बदलणार; 'हे' असेल नवे नाव!

point

नामांतराच्या प्रयत्नांना ऐतिहासिक पार्श्वभूमी

पश्चिम बंगालच्या मंत्रिमंडळाने राज्याचे 'वेस्ट बंगाल' (West Bengal) हे इंग्रजी नाव बदलून 'पश्चिम बंग' (Paschim Banga)करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय. राज्य विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, बंगाली भाषेत राज्याला आधीपासूनच याच नावाने संबोधले जाते.

हे वाचलं का?

राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 9 डिसेंबर 2026 रोजी राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल. केंद्राच्या मंजुरीनंतर अधिकृतरीत्या राज्याचे नाव बदलले जाईल. 

हेही वाचा : कोल्हापुरात हिट अँड रनचा थरार! चुलत भावांचा जीव गेला; गोकुळच्या माजी अध्यक्षाच्या मुलाचा प्रताप

नामांतराच्या प्रयत्नांना ऐतिहासिक पार्श्वभूमी

पश्चिम बंगालचे नाव बदलण्याच्या या प्रयत्नांना ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे. राज्यातील वेगवेगळ्या पक्षांच्या सरकरांकडून यापूर्वी देखील राज्याचे नाव बदलण्याचे प्रयत्न झाले आहेत. जुलै 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांच्या नेतृत्वाखालील
तृणमूल काँग्रेस सरकारने राज्याचे नाव बदलून 'बांगला' (Bangla) करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र त्याला केंद्र सरकारची मंजुरी न मिळाल्याने नावातील हा बदल होऊ शकला नाही. 

राज्याच्या नावातील बदलाचा सर्वात पहिला प्रयत्न जुलै 1999 मध्ये ज्योति बसु (Jyoti Basu) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केला होता. मात्र, तो देखील केंद्र सरकारच्या मंजुरी अभावी पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्यानंतर तृणमूल काँग्रेस सरकारने 2011 आणि 2018 मध्ये या संदर्भातील प्रस्ताव आणला. मात्र प्रत्येक वेळी केंद्राची मंजूरी ही नामांतरामध्ये आडकाठी ठरली. आता मात्र केंद्रात देखील भाजपचे सरकार असल्याने या प्रस्तावास मंजूरी मिळण्याची शक्यता वाढली आहे. 

राज्याचे नाव बदलण्याची घटनात्मक प्रक्रिया

देशातील कुठल्याही राज्याचे नाव बदलायचे असल्यास सर्वप्रथम संबंधित राज्य सरकारला अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून राज्य विधानसभेची मंजूरी घ्यावी लागते. राज्य विधानसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो. 

केंद्राकडून हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला जातो. राज्याचे मत जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती हा प्रस्ताव संबंधित राज्याच्या विधानसभेकडे पाठवतात. त्यानंतर राष्ट्रपतींच्या शिफारशीनंतर राज्याच्या नामांतराचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडले जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या मान्यतेनंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने राज्याचे नाव अधिकृतरीत्या बदलले जाते.