अकोला- धनंजय साबळे: अकोल्याच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आल्याचं समोर आलं आहे. अकोल्यात शरद पवार गटाने भाजपला पाठींबा दिल्यामुळे प्रकाश आंबेडकरांना धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, अकोला महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे. 38 नगरसेवक असलेल्या भाजपने 'शहर सुधार आघाडी' स्थापन केल्यामुळे आता अकोला महापालिका भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता स्थापन होणार आहे.
ADVERTISEMENT
शहर सुधार आघाडीत भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि अपक्ष एक नगरसेवकाचा सहभाग असणार आहे. त्यामुळे भाजपने बहुमतासाठी 44 आकड्यांची जोडतोड केल्याचं सांगण्यात येत आहे. नेमकं कसं ते पाहूया..
अकोला महापालिकेत एकूण जागा 80, आणि बहुमताचा आकडा 41 आहे. आज भाजपने 38 जागा जिंकल्या तर मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांचा 1 नगरसेवक आणि शिंदेसेनेचा 1 नगरसेवक आहे. भाजप समर्थित अकोला विकास समितीचा देखील 1 नगरसेवक आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक भाजपने स्थापन केलेल्या 'शहर सुधार आघाडीत' गटात सहभागी झाले आहेत. एकंदरीत असं गणित जुळल्याने आज भाजपने बहुमताचा 41 आकडा गाठला असून भाजपच्या शहर विकास आघाडीत नगरसेवकांची संख्या 44 वर गेली. याशिवाय भाजपचा बंडखोर अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार देखील या गटात सहभागी होणार असल्याचं समोर आलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच ठरल्या किंगमेकर?
अकोल्याच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बैठकांचं सत्र चाललं आहे. दिवसा या बैठकांचं केंद्र होतं ते कृषी नगर भागातील प्रकाश आंबेडकरांचं निवासस्थान असलेलं 'यशवंत भवन'. तर मूर्तिजापूर रोडवरच्या 'सिटी स्पोर्टस क्लब' येथे काल रात्री डिनर डिप्लोमॅसी'ची बैठक झाली. काल सिटी स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या स्नेहभोजनाला प्रकाश आंबेडकरांसह ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्यासह एमआयएम, दोन्ही राष्ट्रवादी आणि अपक्ष आशिष पवित्रकारांचे भाऊ राज पवित्रकार यांची उपस्थिती होती. 35 पेक्षा जास्त नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत या पक्षांनी पदांचं वाटप आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा झाल्याचा दावा केला होता. ही चर्चा सायंकाळपर्यत पुढे जाणार असल्याचं सांगण्यात येत आलंय. तसेच संध्याकाळपर्यंत या आघाडीतील संभाव्य सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असण्याची शक्यता वर्तवली खरी, परंतु अद्यापही बैठकीवर पुढील चर्चा झाली नसल्याची माहिती आहे.
हे ही वाचा: उल्हासनगरचं महापौरपद ओबीसींसाठी राखीव, शिंदेंच्या शिवसेनेतून 'ही' तीन नावं चर्चेत
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने अकोला महापालिकेत कोणतंच पद घेणार नसल्याची भूमिका दाखवली होती. अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची भाजप आणि काँग्रेसकडून मोठी जुळवणी सुरू होती. अखेर सत्ता स्थापनेत दोन्ही राष्ट्रवादी महत्वाची आणि 'किंगमेकर' दिसून आल्या. दोन्ही राष्ट्रवादी भाजपने स्थापन केलेल्या 'शहर सुधार आघाडी'त सहभागी झाल्या आहेत.
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण जागा : 80
बहुमताचा आकडा : 41
भाजप : 38
काँग्रेस : 21
उबाठा : 06
शिंदे सेना : 01
अजित राष्ट्रवादी : 01
शरद राष्ट्रवादी : 03
वंचित : 05
एमआयएम : 03
अपक्ष : 02
ADVERTISEMENT











