धाराशिव- गणेश जाधव: धाराशिव जिल्ह्यात पैसा, सत्ता, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील नातं गेल्या काही वर्षांपासून अधिक घट्ट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता, पुण्यातील एका कुख्यात गुन्हेगारी टोळीचा 'शार्प शुटर' म्हणून ओळख असलेला एक डॉन थेट धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून, शिवसेना (शिंदे गट) कडून त्याला उमेदवारी देण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचं उद्दातीकरण करून त्यांना राजाश्रय देण्याची नवी राजकीय पद्धत जिल्ह्यात रुजत असल्याची तीव्र चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
गजानन उर्फ गजा मारणे टोळीचा 'शार्प शुटर'
पुण्यातील गजानन उर्फ गजा मारणे टोळीचा 'शार्प शुटर' म्हणून गुन्हेगारी विश्वात ओळख असलेला सुनील बनसोडे हा तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. बनसोडे हा मारणे टोळीचा 'उजवा हात' आणि टोळीतील 'टॉप हँड' म्हणून ओळखला जातो. टोळी युद्धातून त्याच्यावर अनेकवेळा कारवाया झाल्या असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी असल्याचं पोलीस नोंदी दर्शवतात. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या बनसोडेला पुणे शहर पोलिसांच्या झोन-3 पथकाने काही महिन्यांपूर्वी वारजे माळवाडी येथून अटक केली होती. त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असून त्याची 'जंत्री' मोठी आहे. त्याचं पुण्यात गुन्हेगारी साम्राज्य असलं तरी गावाकडे उपद्रव नसल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जातं. मात्र गुन्हेगारी जगतातून थेट राजकारणात होणारी ही एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.
काटी हे मूळ गाव असलेला बनसोडे सध्या पुण्यात स्थायिक असून, शहापूर गटातून 'धनुष्यबाण' चिन्हावर निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे, या गटात शिवसेनेला दुसरा सक्षम उमेदवार मिळाला नसल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात अशोक जाधव (राष्ट्रवादी –शरद पवार गट), कचरू सगट (शिवसेना उबाठा) आणि लिंगय्या स्वामी असे एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत. विकासाच्या गप्पांबरोबरच अधूनमधून गुन्हेगारी भाषाही मतदारांच्या कानी पडेल, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.
जागा वाटपात टोकाची रस्सीखेच करणाऱ्या भाजपने शहापूर जिल्हा परिषद गटाची जागा शिवसेनेच्या गळ्यात घातली, तर शहापूर पंचायत समिती गणात भाजपचा उमेदवार दिला. काही ठिकाणी शिवसेनेच्या जागेवर भाजपने एबी फॉर्म देऊन स्वतःचे उमेदवार उभे केल्याचा आरोपही झाला. एबी फॉर्म चुकीच्या पद्धतीने वाटप झाल्याने गोंधळ निर्माण झाल्याचं पालकमंत्री प्रतापराव सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी स्पष्ट केलं आहे. तुळजापूर तालुक्यात शिवसेनेला एकमेव जागा देण्यात आली आणि तीही वादग्रस्त उमेदवारासह. त्यामुळे एबी फॉर्म व उमेदवारीचे अधिकार नेमके कोणाकडे होते? कोणाच्या दबावाने व संमतीने हा निर्णय झाला? असे सवाल स्थानिक शिवसैनिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
हे ही वाचा: MOTN: देशात भाजपची त्सुनामी, आज निवडणुका झाल्या तर एकट्या भाजपला मिळतील 'एवढ्या' जागा: Survey
जाहीर सभांमध्ये गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांच्या उच्चाटनाची भाषा करणारे काही नेते प्रत्यक्षात अपप्रवृत्तींना राजाश्रय देत असल्याचा आरोप होत आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर याआधी टीका झाली होती. आता या नव्या प्रकरणामुळे शिवसेना अडचणीत सापडली असून राजकीय अडचणी वाढल्या आहेत. बनसोडेने भाजपकडूनही उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र भाजपने यावेळी 'सेफ कार्ड' खेळत पाऊल मागे घेतल्याचं बोललं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, बनसोडेची राजकीय एन्ट्री एका 'गॉडफादर'च्या मध्यस्थीने भाजपमार्गे झाली; मात्र वाद टाळण्यासाठी उमेदवारी शिवसेनेकडून देण्यात आली. बनसोडेने अपक्ष, भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही मार्गांनी अर्ज भरले होते. मात्र शिवसेनेने त्याच्यावर ठाम विश्वास दाखवला. स्थानिक शिवसेना नेते व पदाधिकारी मात्र या निर्णयाबाबत अनभिज्ञ असून, उमेदवारीचे निकष काय होते, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
यापूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी भागात पुण्यातील निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीचा हस्तक्षेप पवनचक्की प्रकल्पांसह विविध कामांमध्ये दिसून आला होता. त्याच्यावर काही अदखलपात्र गुन्हेही नोंद झाले होते आणि कामापुरता राजाश्रय मिळाल्याची चर्चा होती. आता बनसोडेच्या रूपाने पुण्यातील दुसऱ्या एका गुन्हेगारी टोळीची थेट राजकारणात दमदार एन्ट्री झाली आहे. विकासाच्या नावाखाली सत्तेत थेट वाटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे.
ADVERTISEMENT











