MOTN: देशात भाजपची त्सुनामी, आज निवडणुका झाल्या तर एकट्या भाजपला मिळतील 'एवढ्या' जागा: Survey
Mood of the Nation 2026: मूड ऑफ द नेशनमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा भाजपची देशात सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर आज घडीला निवडणुका झाल्या तर अशा प्रकारचा निकाल लागू शकतो असं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)च्या जागा 352 जागा निवडून येतील असं इंडिया टुडे-सी व्होटरच्या "मूड ऑफ द नेशन" (MOTN) सर्वेक्षणातून समोर आलं आहे. शिवाय, भाजपच्या जागा देखील तब्बल 287 जागा येऊ शकतात. याचाच अर्थ आज घडीला जर निवडणुका झाल्या तर भाजप पुन्हा एकदा बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवू शकत असल्याचं वातावरण देशात आहे. या सर्वेक्षणावरून देशात भाजपची लाट असल्याचं पाहायला मिळत आहे.
मतदानाच्या टक्केवारीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जर आज निवडणुका झाल्या तर NDA ला 47% मते मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडी 39% आणि तर इतरांना 14% मतं मिळण्याचा अंदाज आहे.
हे सर्वेक्षण 8 डिसेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान करण्यात आले. सर्व वयोगटातील, जाती, धर्म आणि लिंगांचे प्रतिनिधित्व करणारे 36265 लोकांनी यामध्ये भाग घेतला होता. तथापि, या आकडेवारीत अंदाजे पाच टक्के मार्जिन एरर आहे.
MOTN सर्वेक्षणात विचारले गेले की, "जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर निकाल काय लागेल आणि प्रत्येक आघाडी किती जागा जिंकेल?" सर्वेक्षणात असे दिसून आले की NDA ला 352 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडी 182 जागा जिंकू शकेल, तर इतरांना 9 जागा मिळू शकतील. तथापि, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत, NDA ने 293 जागा जिंकल्या होत्या, तर इंडिया आघाडीने 234 जागा मिळाल्या होत्या. ऑगस्ट 2025 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात NDA ला 324 जागा आणि इंडिया आघाडीला 208 जागा मिळण्याचा अंदाज होता.










