पंढरपुरी अंपायर ‘बिली बाऊडेन’ची सोशल मीडियावर हवा; दिग्गज मंडळीही झाले फॅन, व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

• 03:11 AM • 08 Dec 2021

– नितीन शिंदे, पंढरपूर प्रतिनिधी क्रिकेटच्या खेळात अंपायरचं सर्वात महत्वाचं स्थान असतं. कोणताही निर्णय निष्पक्षपणे देणं हे अंपायरचं काम असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक अंपायर आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध झाले. काही अंपायर चांगल्या निर्णयांसाठी तर काही अंपायर आपल्या वादग्रस्त निर्णयासाठी ओळखले जाऊ लागले. डेव्हिड शेफर्ड, स्टिव्ह बकनर, सायमन टॉफेल, बिली बाऊडेन ही काही प्रसिद्ध अंपायर्सची […]

Mumbaitak
follow google news

– नितीन शिंदे, पंढरपूर प्रतिनिधी

हे वाचलं का?

क्रिकेटच्या खेळात अंपायरचं सर्वात महत्वाचं स्थान असतं. कोणताही निर्णय निष्पक्षपणे देणं हे अंपायरचं काम असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक अंपायर आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध झाले. काही अंपायर चांगल्या निर्णयांसाठी तर काही अंपायर आपल्या वादग्रस्त निर्णयासाठी ओळखले जाऊ लागले. डेव्हिड शेफर्ड, स्टिव्ह बकनर, सायमन टॉफेल, बिली बाऊडेन ही काही प्रसिद्ध अंपायर्सची नावं. परंतू या दिग्गज मंडळींव्यतिरीक्त महाराष्ट्रातल्या पंढरपूरमधल्या एका अंपायरची सध्या जागतिक पातळीवर चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात बॉलरने वाईड बॉल टाकल्यानंतर अंपायरने नेहमीच्या शैलीऐवजी दोन हातांवर उभा राहत पाय फाकवून वाईड बॉल दिला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही या अंपायरच्या शैलीला दाद दिली. जागतिक पातळीवर पोहचलेले हे अंपायर आहेत पंढरपूरचे दिपक नाईकनवरे.

दिपक नाईकनवरे ग्रामीण महाराष्ट्रात DN Rock या नावाने ओळखले जातात. सामन्यात प्रेक्षक जेवढे खेळाडूंचा सामना पहायला येतात तेवढेच ते नाईकनवरेंच्या करामतीही पहायला येतात. अनेकांना प्रश्न पडला असेल की अंपायरिंग करण्याची ही अतरंगी पद्धत नेमकी कुठून तयार झाली असेल. मुंबई तक ने याबद्दल नाईकनवरेंशी संपर्क साधून त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. त्यावेळी नाईकनवरे हे डान्सर असल्याचंही कळलं. २०१३ साली नाईकनवरेंची डान्स महाराष्ट्र डान्स या स्पर्धेतही भाग घेतला होता.

लहानपणापासून दिपक नाईकनवरेंना कला आणि क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे अंपायरिंग करताना काहीतरी वेगळं करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. आपल्यामुळे लोकं हसली पाहिजेत हे मनाशी पक्क करुन त्यांनी अंपायरिंगला डान्सिंगचा तडका लगावत आपली स्टाईल तयार केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले न्यूझीलंडचे अंपायर बिली बाऊडेन हे नाईकनवरेंसाठी आदर्श आहेत. नाईकनवरेंचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई तकने त्यांच्याशी संपर्क साधला.

“मी सहा वर्षापासून अंपायरिंग करतो आहे. आता तर मला बाहेरील देशातूनही फेसबुक-यु ट्यूबवर फॉलो केलं जातं. मला कलेची खूप आवड आहे. त्यातूनच मी ही माझी शैली विकसीत केली. कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मी घरी होतो तेव्हा मी यावर आणखीन काम केलं. आता मैदानात आल्यानंतर लोकांकडून याला प्रतिसाद मिळत गेला आणि अशा पद्धतीने माझी स्टाईल ओळखली जाऊ लागली”, असं नाईकनवरे म्हणाले.

सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. याच सोशल मीडियामुळे नाईकनवरे थेट सातासमुद्रापार पोहचले आहेत. परंतू कधीकाळी त्यांना आपले व्हिडीओ सोशल मीडियावर टाकलेलं आवडायचं नाही. परंतू एक दिवस त्यांच्या मित्राने त्यांचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यानंतर महाराष्ट्रभरात दिपक नाईकनवरे प्रसिद्ध झाले.

सामना सुरु झाल्यावर प्रेक्षक जसेजसे मला प्रतिसाद देत जातात तशी मग माझ्यातली कला बाहेर येत जाते. महाराष्ट्रात कोकणापासून ते थेट पुण्यापर्यंत सर्वच ठिकाणी स्थानिक स्पर्धांचे आयोजक दिपक नाईकनवरेंनी अंपायरिंग करावं यासाठी आतूर असतात. इतकच नव्हे तर आता त्यांना दिल्ली, गोवा, कलकत्ता येथूनही स्थानिक स्पर्धांमध्ये अंपायरिंग करण्यासाठी आमंत्रण यायला लागलं आहे. त्यामुळे सध्या पंढरपूरच्या या बिली बाऊडेनचा कार्यक्रम चांगलाच व्यस्त आहे.

अंपायरिंग करताना मी कधीच मानधन किती मिळतंय याचा विचार केला नाही असं नाईकनवरे यांनी सांगितलं. इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉर्नने आपल्याबद्दल ट्विट केल्यानंतर आपला आनंद गगनात मावेनासा झाला असं नाईकनवरे म्हणाले. मी दोनवेळा स्वतः वाचलं तेव्हा माझा विश्वास बसला. तरीही मी नंतर घरातल्या लोकांना, मित्रांना वाचायला देऊन हे खरंच माझ्याबद्दल लिहीलं आहे ना याची खात्री करुन घेतल्याचंही नाईकनवरेंनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लोकांमध्ये खूप मोठं टॅलेंट आहे. परंतू अनेकदा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळत नाही. परंतू सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट इंग्लंडपर्यंत पोहचलेल्या नाईकनवरेंनी आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे.

    follow whatsapp