उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, अकोल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया एकनाथ शिंदे गटात

गोपीकिशन बाजोरियांसह सुमारे १०० जण एकनाथ शिंदे गटात गेले आहेत त्यामुळे अकोल्यातली उभी फूट समोर आली आहे
Another setback for Uddhav Thackeray, former Akola MLA Gopikishan Bajoria in Eknath Shinde group
Another setback for Uddhav Thackeray, former Akola MLA Gopikishan Bajoria in Eknath Shinde group

-धनंजय साबळे, अमरावती

अकोल्यातील शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा गट एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार आहे. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह माजी जिल्हा आणि शहरप्रमुख तसंच नगरसेवक असे जवळपास १०० जण शिंदे गटात सहभागी होणार आहेत. अकोल्यातून एका बसने हे सगळेजण मुंबईला रवाना झाले आहेत. ही माहिती गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली आहे.

गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंना झटका

गोपीकिशन बाजोरिया यांच्या या निर्णयामुळे अकोल्यात शिवसेनेला झटका बसला आहे. उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे हे शिवसेनेतली फाटाफूट थांबावी म्हणून प्रयत्न करत आहेत. मात्र दुसरीकडे विविध गट शिंदे गटासोबत जात आहेत. दिल्लीतल्या १२ शिवसेना खासदारांचा गटही शिंदे गटात गेला आहे. त्यापाठोपाठ आता अकोल्याचे माजी आमदार आणि सुमारे १०० कार्यकर्ते हे एकनाथ शिंदे गटात जात आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवाहाटी येथे गेलेले बाळापूरचे आमदार तथा जिल्हा प्रमुख नितीन देशमुख नंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले होते. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून शिंदे गटात कोण सहभागी होणार, असा प्रश्न चर्चेत असतानाच शिवसेनेतील नाराज बाजोरिया गट शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. आता बाजोरिया आणि त्यांच्यासह १०० जण एकनाथ शिंदे गटात जात आहेत. गेल्या काही वर्षांपासीन अकोला शिवसेनेत प्रचंड गटबाजी उफाळून आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मविआकडे मोठे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभवाचा धक्का बसला. तेव्हापासून शिवसेनेत उभी फूट पडली. या निवडणुकीत आमदार नितीन देशमुख यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप पक्षातूनच करण्यात आला. शिवसेनेचे अकोल्याचे माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांनी अनेकदा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्यावर आरोप केले होते. आता बाजोरिया यांच्यासह संपूर्ण मोठा गट एकनाथ शिंदे गटात जातो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा झटकाच मानला जातो आहे.

एकनाथ शिंदे यांनी २१ जूनला बंड केलं. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. तसंच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. २१ जूनपासून आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंना एका पाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. अशात आता आणखी काय काय होतंय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in