छळ की AI कॉपी ? वर्गात टॉपर तरी साहिल वाकोडेने आत्महत्या का केली?
IIT Bombay Student Sahil Wakode Suicide : IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर कॉपीच्या आरोपासोबतच जातीय छळाचे आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी प्राध्यापकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छळ की AI कॉपी ?
वर्गात टॉपर तरी साहिल वाकोडेने आत्महत्या का केली?
यवतमाळचा रहिवासी आणि IIT बॉम्बेतील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याने 18 सप्टेंबर रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. साहिल हा अभ्यासात गुणवंत विद्यार्थी होता. पहिल्या वर्षात त्याला 8.5 CGPA मिळाले होते आणि त्याच्यावर कोणताही बॅकलॉग नव्हता. 2025 मध्ये JEE Advanced परीक्षेत त्याला 5 हजारांपेक्षा चांगली ऑल इंडिया रँक आणि 614 कॅटेगरी रँक मिळाली होती. IIT मद्रास आणि IIT दिल्लीमध्ये प्रवेशाची संधी असतानाही IIT बॉम्बेमध्ये शिकणे हे त्याचे स्वप्न होते. अभ्यासासोबत तो बॅडमिंटन क्लबचा समन्वयक होता आणि स्केटिंगमध्येही त्याने प्रावीण्य मिळवले होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर UPSC परीक्षा देऊन कलेक्टर किंवा एसपी होण्याचे त्याचे स्वप्न असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले होते. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे हे सहकारी बँकेत कर्मचारी असून आई सोनाली सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता.
साहिल वाकोडेसोबत त्या दिवशी काय घडले?
18 सप्टेंबर रोजी साहिलचा पेपर होता. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल फोन आढळला आणि त्याने प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. या परीक्षेचे पर्यवेक्षक प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला होते. परीक्षा संपल्यानंतर साहिलला विभाग प्रमुख आणि पर्यवेक्षकांकडे नेण्यात आले. IIT बॉम्बेच्या सुरुवातीच्या निवेदनानुसार, त्याचे समुपदेशन करण्यात आले आणि या घटनेमुळे त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर साहिल वसतिगृह क्रमांक चारमधील आपल्या खोलीत परतला आणि त्याच दिवशी सायंकाळी तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मात्र, नंतर IIT प्रशासनाने तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेबाबत निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे सांगत आधीच्या निवेदनाबाबत माफी मागितली.
जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप
साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप केले. साहिलचे वडील रविंद्र वाकोडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला गेल्या तीन महिन्यांपासून साहिलला जातीवाचक टोमणे मारून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पवई पोलिसांनी प्राध्यापक दुल्ला आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र IIT बॉम्बे प्रशासनाने कॅम्पसमध्ये जातीय भेदभावाचे आरोप फेटाळले आहेत. साहिलने आपल्या हयातीत SC-ST सेल किंवा प्रशासनाकडे जातीय भेदभावाबाबत कोणतीही अधिकृत तक्रार केली नव्हती, असेही संस्थेच्या SC-ST सेलने म्हटले आहे. फॅकल्टी फोरमनेही प्राध्यापक दुल्ला यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून, ते नियमांनुसार आपले कर्तव्य बजावत होते, असा दावा केला आहे.
