ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा का झाला? पोलिसांचा लाठीचार्ज

ठाण्यातल्या किसन नगरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा का झाला? पोलिसांचा लाठीचार्ज

शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर येताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच आता शिंदे-ठाकरे गटात राडा झाला. किसन नगरमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाली. या प्रकरणी दोन्ही गटांकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी देण्यात आली आहे.

ठाण्यातल्या किसन नगरमधील भट वाडीत शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना लाठीमार करावा लागला. भट वाडीत झालेल्या राड्यानंतर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारेंसह दोन्ही गटाचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात बाहेर जमा झाले होते.

खासदार राजन विचारे यांच्या दिशेनं पाण्याची बाटली फेकल्याचंही म्हटलं गेलं. मात्र, दोन्ही गटाकडून वेगळी कारणं देण्यात आलीयेत.

शिंदे गटाने ठाकरे गटाला धरलं जबाबदार

ठाण्यात झालेल्या वादावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के म्हणाले, "दोन गट आमने-सामने येण्याचा प्रश्नच नाही. मुद्दामहून भांडणं काढणं, या उद्देशानं हा प्रकार केलेला आहे आणि सहानुभूती घेणं याशिवाय काही राहिलेलं नाही", असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय.

"आमचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या दोन कार्यकर्त्यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या कार्यक्रम सुरू असताना राजन विचारे यांच्यासह १५-२० कार्यकर्ते आले आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याने योगेश जानकर यांच्या अंगावर धावून जाणं, शिवीगाळ करणं, मारहाण करणं अशा पद्धतीचा प्रकार केल्यानंतर कार्यकर्त्यांना राग आला. त्यामुळे धक्काबुक्की झाली", असं नरेश म्हस्के म्हणाले.

"मूळात कार्यक्रम सुरू असताना नगरसेवकाशी अशा पद्धतीने वागणं आणि खासदारांच्या समोर, हा केवळ भांडण काढणं आणि सहानुभूती निर्माण करणं हा त्यामागचा एकमेव उद्देश आहे. ते लोक या विभागाबाहेरचे आहेत. स्थानिक नागरिक नसताना शिवीगाळ करणं, हे योग्य आहे का?", असा सवाल नरेश म्हस्केंनी उपस्थित केलाय.

ठाण्यात शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले : ठाकरे गटाचं म्हणणं काय?

ठाण्यात झालेल्या वादाबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे म्हणाले, "किसननगर भटवाडी येथे आमचे पदाधिकारी संजय घाडेगावकर यांच्या कार्यालयात आम्ही गेलो होतो. तेथून परत येत असताना योगेश जानकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या १५० लोकांनी दीपक साळवी आणि नार्वेकर या दोघांना बेदम मारहाण केली. ते मोटारसायकलच्या गॅपमध्ये सापडले नसते, तर ठार मारलं असतं", असं राजन विचारे म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in