Manohar Joshi News Live : पवार रायगडावरून फुंकणार रणशिंग! महत्त्वाची अपडेट
Maharashtra breaking news live : महाराष्ट्रातील सर्व घटनांचे ताजे अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra news live updates : राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासह इतर मुद्देही चर्चेत आहेत. त्याबद्दल आणि महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारीविषयक महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी वाचा एकाच ठिकाणी...
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
- 03:22 PM • 23 Feb 2024
पवार रायगडावरून फुंकणार रणशिंग! समोर आली महत्त्वाची अपडेट
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला नवे चिन्ह दिले आहे. तुतारी हे निवडणूक चिन्ह देण्यात आले असून, याचा अनावर सोहळा खास पद्धतीने केला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
"आता अवघा देश होणार दंग, शरद पवार साहेबांच्या साथीने फुंकलं जाणार विकासाचं रणशिंग! ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा उद्या, दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे", अशी माहिती पवारांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे.
- 01:55 PM • 23 Feb 2024
कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज उमेदवार?
महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबद्दल त्यांनीच सूचक विधान केले आहे. "नाही. अजून तरी मला ऑफर आलेली नाही, पण येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टिकोणातून आपण सगळे मिळून वाटचाल करूयात", असं विधान शाहू महाराजांनी केले.
- 01:22 PM • 23 Feb 2024
मनोहर जोशींचं निधन; उद्धव ठाकर म्हणाले, 'संकट काळात...'
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. यामुळे उद्धव ठाकरेंनी विदर्भ दौरा रद्द केला. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी जोशींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. "मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी आणि दत्ता साळवीही होते." (uddhav thackeray on manohar joshi)
"जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे दुर्दैव आहे. मी आता मुंबईला निघालो आहे. शिवसेना परिवाराच्या वतीने मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. मनोहर जोशी पहिल्या फळीतील शिवसैनिक होते. जोशी यांच्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटावर मात करून वेळोवेळी उभी राहिली", अशा भावना ठाकरेंनी व्यक्त केल्या.
- 11:55 AM • 23 Feb 2024
‘जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार’, जयंत पाटील म्हणाले...
संगीता वानखेडे या महिलेने असा आरोप केला की, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे. त्याचा खर्चही शरद पवार करता. या आरोपाची चर्चा सुरू आहे. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, "जरांगे यांच्याशी कधीही शरद पवारांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे, असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारनं अशी आंदोलनं वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे."
- 11:49 AM • 23 Feb 2024
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन
Bjp Mla Rajendra Patni : लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्यानंतर भाजपने आणखी एक आमदार गमावला. भाजपचे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांची प्राणज्योत शुक्रवारी (23 फेब्रुवारी) मालवली. ते ५९ वर्षाचे होते.
कारंजाचे आमदार असलेले राजेंद्र पाटणी हे मागील २ ते ३ वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच २३ फेब्रुवारी सकाळी पाटणी यांनी अखेरचा श्वास घेतला.
- 11:41 AM • 23 Feb 2024
'बाळासाहेबांचं स्वप्न मनोहर जोशींच्या रुपाने पूर्ण झालं'; राज ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी पोस्ट करत म्हटल आहे की, "मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली."
"शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले."
"१९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली", अशा शोक भावना राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
- 11:36 AM • 23 Feb 2024
एकनाथ शिंदेंनी मनोहर जोशींच्या आठवणींना दिला उजाळा
एकनाथ शिंदे यांनी एक पोस्ट करत मनोहर जोशींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले."
"महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले."
"शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो."
"आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत… भावपूर्ण श्रद्धांजली !"
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT