लाइव्ह

Maharashtra Assembly Adhiveshan Live : 'सरकारने प्रयत्न केला त्यावर शंका नाही'- उद्धव ठाकरे!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Assembly special session 2024 LIVE Updates : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे अधिवेशनात काय चर्चा होणार आणि काय निर्णय घेतला जाणार... हे महत्त्वाचे आहे... यासंदर्भातील लाईव्ह अपडेट्स वाचा... (Maratha Reservation Assembly Session Live News Marathi)

 

लाइव्हब्लॉग बंद

 • 03:46 PM • 20 Feb 2024

  'सरकारने प्रयत्न केला त्यावर शंका नाही'- उद्धव ठाकरे!

  'आरक्षण कोर्टात टिकेल अशी आशा आहे. सभागृहात सर्वपक्षांनी ठराव मंजूर केला. मराठा समाजातील अनेकांनी बलिदान दिलं, सरकारने प्रयत्न केला त्यावर शंका नाही. आज तर त्यांनी घोषित केलेलं आहे आणि आम्ही सर्वांनीही याचं समर्थन केलं आहे. परंतु लवकरात लवकर किती लोकांना आणि कुठे नोकरी मिळणार हे ही जाहीर केलं तर बरं होईल.' असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 • 03:21 PM • 20 Feb 2024

  Maratha Reservation : संभाजीराजेंनी आरक्षणाबद्दल शिंदे सरकारला दिला सल्ला

  विधानसभा आणि विधान परिषदेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. याबद्दल संभाजीराजे छत्रपतींनी सरकारचे अभिनंदन केले. ते म्हणाले, "मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो." 

  "शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक ! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी", असा सल्लाही त्यांनी राज्य सरकारला दिला.

 • 01:57 PM • 20 Feb 2024

  मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर

  राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देणारे विधेयक विधानसभेत मांडले. मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्यानंतर एकमताने हे विधेयक मंजूर करण्याचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांना केले. त्यानंतर हे विधेयक एकमताने विधानसभेत मंजूर करण्यात आले. 

 • 01:28 PM • 20 Feb 2024

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे 

  - ओबीसी बांधव असो किंवा इतर कोणताही समाज असो, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

  - छत्रपतींच्या आशीर्वादाने, संपूर्ण मराठा समाजासाठी, माझ्या लाखो मराठा बांधवांसाठी इच्छापूर्तीचा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. आजचा हा दिवस माझ्यासाठी आनंदाचा, समाधानाचा आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे.

  - लाखो करोडो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही. शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे, तरुण-तरुणींचे आभार व्यक्त करतो.

  - हा मराठा समाजाचा विजय आहे. हा मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढ्याचा विजय आहे.

  - मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख, वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न केले, करत आहोत.

  - एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्‍या तो मागे लोटला जातोय. त्यामुळे या समाजाचं मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हा पर्याय होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायच हा निर्धार आम्ही केला होता.

  - नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे, हे तीन दिवसाच्या चर्चेत मांडलं होतं. विशेष म्हणजे सर्व सभागृहाची मराठा आरक्षणास मजबूत समंती मिळाल्याने फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल हे मी जाहीर केले होते.

 • ADVERTISEMENT

 • 01:20 PM • 20 Feb 2024

  मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

  मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण केले. शिंदे म्हणाले, "मराठा समाजाचं आरक्षण सुरू असताना मी म्हणालो होती की, या आंदोलनासारखं इतर समाजाचं आंदोलन कुठे सुरू असतं तर मी तिच भावना व्यक्त केली असती. माझी जी भूमिका मराठा समाजासाठी आहे, तिच इतर समाजासाठी आहे."

  "एखाद्या समाजाला मागासलेपण आलं असेल, तर त्याला मूळ प्रवाहात आणणं सरकारचं कर्तव्य आहे. कुठल्यातरी एका समाजाची बाजू घ्यायची दुसऱ्याच्या विचार करायचा नाही, हे असं माझ्याकडून मुख्यमंत्री म्हणून होणार नाही."

  "आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता शैक्षणिक आणि नोकऱीतील आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आज राजकीय भाष्य मी करणार नाही. या समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे. यासाठी सर्वांनी सहकार्य केले. मी जे वचन दिलं होतं, त्याची पूर्तता कऱण्याचं समाधान मला आहे. अभिमानही आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि विरोधी पक्षांच्या सहकार्यामुळे आपण हा निर्णय घेतोय", असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

 • 12:25 PM • 20 Feb 2024

  "अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ", शेलारांनी ठाकरेंना खिजवले

  आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिले. त्यावरून मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलारांनी दंड थोपटले आहेत. "कलानगर वरुन वरळी पर्यंत चार वर्षात पोहचू न शकलले आमदार आता वरळीतून पळ काढून एवढ्या लांब ठाण्याला कधी कधी पोहचणार? त्यापेक्षा... श्रीमान आदित्य ठाकरे तुम्ही जिथे राहता, त्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून का लढत नाही? तिथे कुटुंबातीलच काही मते मिळणार नाहीत, याची भीती वाटते का? अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ!! असले धंदे बंद करा... द्या तातडीने राजीनामा आणि करा आमचा सामना!", असे म्हणत आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिले आहे. 

 • ADVERTISEMENT

 • 10:51 AM • 20 Feb 2024

  'आम्हाला दुसरं ताट का देता?...', आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंचा सरकारला सवाल!

  'मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं. आम्हाला दुसरं ताट का देता?, ओबीसीतूनच आरक्षण द्या. सरकारने दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणारं नाही. आजच्या निर्णयानंतर उद्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार.' असं जरांगे पाटील स्पष्टच बोलले आहेत.

 • 10:25 AM • 20 Feb 2024

  मराठा समाजाला SBEC तून आरक्षण? 

  राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षण सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यानंतर आज या अहवालाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याचबरोबर मराठा आरक्षण विधेयकालाही मंजुरी देण्यात आली आहे. मागासवर्ग आयागाने आपल्या अहवालात मराठा समाजाला SBEC प्रवर्गातून आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. 

 • 09:30 AM • 20 Feb 2024

  जरांगे सांगतात तसंच जर ऐकायचं असेल तर...; भुजबळ स्पष्टच बोलले

  आरक्षण टिकेल असं तुम्हाला वाटतं का? यावर भुजबळ म्हणाले, "आरक्षण टिकावं यासाठीच हे विधेयक तयार करण्यात आले आहे. विशेषतः उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींना यात लक्ष घातलं आहे. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की, त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला असेल. ज्या विधेयकांचं रुपांतर कायद्यात करायचं आहे, ते आमच्या हातात आलेलं नाही."

  "सगेसोयरे संदर्भात सहा-साडेसहा लाख हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत. यासाठी मी महात्मा फुले समता परिषद, ओबीसी एल्गार परिषद आणि इतरांचे अभिनंदन करतो. त्यांनी गावागावात जाऊन हरकती गोळा करून आणून दिल्या आहेत", असे भुजबळ म्हणाले. 

  "जरांगे सांगतात तसंच जर सगळं ऐकायचं असेल... जरांगे सांगतो ओबीसीतून द्या. मग आणखी हा वेगळा कायदा करण्याची आवश्यकताच नाही. पण, ज्याअर्थी सरकार हा कायदा करत आहे, त्याअर्थी वेगळं आरक्षण मराठा समाजाला देण्याचा स्पष्ट उद्देश सरकारचा दिसतो आहे."

 • 09:17 AM • 20 Feb 2024

  मराठा समाजाला शिंदे सरकार देणार 13 टक्के आरक्षण?

  राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आल्यानंतर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला स्वतंत्र 10 ते 13 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मांडला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 • 09:11 AM • 20 Feb 2024

  शिंदे सरकारची भूमिका काय?

  मनोज जरांगे पाटील हे सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकार स्वतंत्र आरक्षण देण्याची भूमिकेत आहे. "मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढत असताना ओबीसीच नव्हे, तर इतर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यात येईल", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवजयंतीच्या (20 फेब्रुवारी) दिवशी शिवनेरी किल्ल्यावर बोलताना म्हणाले. त्यामुळे यातून मार्ग काढणे सरकारसमोर आव्हान असणार आहे. 

 • 09:09 AM • 20 Feb 2024

  मनोज जरांगेची मागणी काय?

  "या विशेष अधिवेशनात सरकारने सगेसोयरेची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरूवातीलाच करावी. नंतर मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला आहे, त्याचा कायदा करण्यासाठी तो विषय दुसऱ्या सत्रात चर्चेला घ्यावा. कारण हे आंदोलन मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून उभं केलेलं आहे", अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT