‘त्या’ 41 जीवांसाठी अखंड डोंगर पोखरला अन् जिंकले युद्ध, रेस्क्यू टीमचा कसा होता प्रवास
ज्या सिल्कियराच्या बोगद्यात 41 जीव अडकले होते, त्यासाठी उत्तर काशीपासून ते अगदी अमेरिकेतील तज्ज्ञापर्यंत संपर्क साधून मजूरांच्या जीवासाठी बाजी लावण्यात आली. ज्या ठिकाणी वाहन जाण्याची परिस्थिती नव्हती, त्या ठिकाणी मोठ मोठं यंत्रे घेऊन जाऊन बचाव पथकाने एक नाही तर 41 जीवांना जीवदान देत त्यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणले आहेत.
ADVERTISEMENT

Silkyara Tunnel : गेल्या 17 दिवसांपासून एका बोगद्यामध्ये 41 जीव 17 दिवस अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू होते. एका बाजूला डोंगरासारख्या असणाऱ्या त्या बोगद्याचे संकट होते, तर दुसरीकडे जीव वाचवणाऱ्या टीमचेही मोठे धाडस होते. त्या बोगद्यातील 41 जणांच्या धडधडणाऱ्या जीवांना अनेक हातांचे बळ मिळाल्यामुळेच 41 मजूरांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसून आला होता. या 17 दिवसांमध्ये उत्तरकाशीतील बचाव पथकाने एका पर्वतापेक्षाही मोठं काम करुन 41 माणसांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.
कारही आणि विमानंही सज्ज
सिल्क्यरा बोगद्यात 13 नोव्हेंबर रोजी 41 जीव अडकल्याची बातमी समोर आली. तेव्हापासून त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी लागणारी यंत्रे देशाच्या विविध भागातून घटनास्थळी आणण्यात आली. हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली त्याच बरोबर हवाई दलाची विमानंही या कामासाठी सज्ज राहिली. रेल्वेपासून ते अगदी सर्व सुविधांनी मदत कार्यासाठी सर्व गोष्टी तयार ठेवण्यात आल्या. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ ते बीआरओपासून ते आयटीबीपीपर्यंत आणि हवाई दलापासून पोलीस प्रशासनापर्यंत या सगळ्या यंत्रणांनी 41 जीवांसाठी प्रचंड प्रयत्न केले.
जीवाची बाजी
ज्या टनेलमध्ये 41 जीव अडकले होते, त्यांच्यासाठी ना दिवस पाहिला ना रात्र पाहिली गेली. ना अन्नाची चिंता होती ना झोपेचा त्रास होता. कडाक्याच्या थंडीतही बचाव पथकातील प्रत्येकाने आपल्या जीवाची बाजी लावून जीवांना सुखरूप बाहेर काढले. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता कारण गरज पडली तेव्हा त्यांनी अखंड डोंगर पोखरले आणि बोगद्यात शिरून प्रत्येक संकट पार केले.
देश-विदेशातून तज्ज्ञांना पाचारण
दिल्लीपासून डेहराडूनपर्यंत, पीएमओपासून ते सीएमओपर्यंत, जिल्ह्यापासून ते विभागीय पातळीपर्यंत, मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पोलिसांपासून प्रशासनापर्यंत केवळ एका मिशनवर 24 तास काम करण्यात आले. त्यामुळेच 41 जीवांचे प्राण वाचले. या बचाव कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी देश-विदेशातून गरज असेल तेथून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आणि मजूरांचा जीव वाचवण्यात आला.