
तिला असा खून करायचा होता जो खून वाटू नये. ही ओळ वाटून तुम्हाला वाटेल की आम्ही तुम्हाला एखाद्या सिनेमाची वगैरे स्टोरी तर सांगत नाही ना? पण हे सगळं आपल्या मायानगरीत म्हणजेच मुंबईत घडलं आहे. एका महिलेने तिच्या पतीला रोज थोडं थोडं संपवलं. तिचा पती गेला.. त्याचे ब्लड रिपोर्ट पाहून डॉक्टरांना संशय आला नसता तर हा खून मृत्यू म्हणून पचला असता. पण तसं झालं नाही. या खुनाला वाचा फुटलीच.
एका व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागलं. त्यानंतर त्याला या वेदना असह्य होऊ लागल्या ज्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्यानंतर त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तसंच हळूहळू त्याचे अवयव निकामी होऊ लागले आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र या व्यक्तीचा मृत्यू हा काही सामान्य नव्हता. यामागे एक नियोजनबद्ध पद्धतीने केलेला कट होता. सात महिने हा कट रचला गेला आणि दोन महिने तो अंमलात आणून या व्यक्तीला मारलं गेलं. प्रेम, धोका आणि विश्वासघाताची ही कहाणी चक्रावून टाकणारी आहे.
२४ ऑगस्ट २०२२ ला मुंबईत कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या कमलकांत शाह यांच्या पोटात अचनाक दुखू लागलं. आधी त्यांच्या घरातल्यांना वाटलं की हे काहीतरी खाल्लं असेल म्हणून पोटात दुखत असेल. कमलकांत शाह डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्यांचं दुखणं तपासलं आणि गोळ्या दिल्या. त्यांना औषधं घेऊन आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र कमलकांत यांना बरं वाटण्याऐवजी त्यांचं दुखणं वाढलं.
सप्टेंबर महिन्यात कमलकांत यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १-२ तारखेच्या दरम्यान त्यांना दाखल करण्यात आलं. पण १९ सप्टेंबर २०२२ ला मल्टि ऑर्गन फेल्युअरमुळे ४६ वर्षीय कमलकांत यांचा मृत्यू झाला.
कमलकांतचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू नेमका का झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न डॉक्टर करत होते. कमलकांत यांच्यावर उपचार सुरू होते तरीही मल्टि ऑर्गन फेल्युअर कसं झालं? हे डॉक्टर शोधत होते. त्यांच्या हाती कमलकांत यांचा ब्लड रिपोर्ट आला आणि त्यामुळे डॉक्टर चक्रावून गेले. डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांना हे कळलं की कमलकांत यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणावर धातू आहे. ही मात्रा सामान्य माणसापेक्षा १०० पटीने जास्त होती. यात काही प्रकार असे होते जे मानवी शरीरासाठी अत्यंत घातक होते. हे सगळे असे घटक होते ज्यामुळे माणूस तीळ तीळ रोज मरत जातो.
कमलकांतच्या रक्तात आर्सेनिकचं प्रमाण चौपटीपेक्षा जास्त होतं. तर थेलियमचं प्रमाण ३६५ पटीने जास्त होतं. या दोन्ही धातूंचं प्रमाण इतकं कसं वाढलं? हा प्रश्न डॉक्टरांना सतावत होता. डॉक्टरांसह कमलकांतच्या नातेवाईकांनीही मृत्यूबाबत संशय व्यक्त केला.
कमलकांतच्या आईचा मृत्यू १३ ऑगस्ट २०२२ ला झाला. त्यांचा मृत्यू धीरूबाई अंबानी रूग्णालयात ऑर्गन फेल्युअरमुळेच झाला. आता या दोन्ही मृत्यूंमध्ये काही साम्य होतं का? हा प्रश्नही चर्चिला जातो आहे.
या प्रकरणात जेव्हा पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा पोलिसांनी कमलकांतची पत्नी काजलसह कुटुंबासह इतरांचीही चौकशी सुरू करण्यात आली. यावेळी कमलच्या बहिणीने पोलिसांना सांगितलं होतं की जेव्हा माझा भाऊ रूग्णालयात दाखल होता तेव्हा माझी वहिनी म्हणजेच काजल ही भावाच्या बँक अकाऊंटबाबत माहिती घेत होती. तसंच कमलचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या एलआयसी पॉलिसीविषयीही तिने माहिती घेतली होती असंही कमलकांतच्या बहिणीने म्हणजेच कविताने सांगितलं.
घरातल्या लोकांना काजलचा स्वभाव खूपच विचित्र वाटत होता. पोलिसांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी हे सांगितलं की आर्सेनिक आणि थेलियम हे स्लो पॉयझनिंग आहे. जर हे जेवणात मिसळलं तरीही जेवणाच्या चवीत काहीही फरक पडत नाही. तसंच जेवणाचा रंगही बदलत नाही. मात्र हे दोन्ही घटक शरीराला आतून पोखरू लागतात. आता प्रश्न हा होता की कमलकांतच्या शरीरात इतक्या मोठ्या प्रमाणात हे दोन घटक कसे गेले?
पोलिसांना कमलच्या पत्नीवर संशय होताच. त्यामुळे पोलिसांनी काजलच्या सीडीआरचा तपास केला. त्यात पोलीसही चक्रावले. कमलकांतची बायको काजल सातत्याने हितेश जैन या व्यक्तीसोबत जास्त काळ बोलत असे. त्यानंतर पोलिसांनी हितेश जैनबाबत माहिती घेण्यास सुरूवात केली. ज्यानंतर पोलिसांना हे कळलं की काजलचं हितेशवर प्रेम आहे. कमलकांतचा खून काजलने आणि हितेशने मिळून केला आहे. कमलकांतच्या मृत्यूनंतर आपण सुखानं राहू शकतो असं आम्हाला दोघांना वाटत होतं असं काजलने पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितलं.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत काजलने आपणच कमलकांतला स्लो पॉयझनिंग केल्याचं सांगितलं. तसंच माझं हितेशवर प्रेम आहे त्याच्यासोबत राहायचं होतं म्हणून नवऱ्याला आर्सेनिक आणि थेलियम जेवणातून दिल्याची बाब तिने कबूल केली. काजल आणि कमलकांत यांचं लग्न होण्यापूर्वी कमलकांतचा मित्र हितेशला भेटली होती. कमलकांत आणि काजल यांचं लग्न झाल्यानंतर काही प्रमाणात खटके उडू लागले. ज्यानंतर हितेश आणि काजल एकमेकांच्या जवळ येऊ लागले.
काजलने काही महिन्यांपूर्वी मुलांना घेऊन निघून गेली होती. त्यानंतर ती १५ जूनला परतली. त्यानंतर ती हळूहळू सासूला आणि नवऱ्याला स्लो पॉयझनिंग करू लागली. सात महिन्यांनी या विषाने परिणाम दाखवला आणि काजलची सासू आणि पती या दोघांचा मृत्यू झाला.