फटाके फोडू नका म्हटल्याने तरुणाची हत्या, नागपुरात थेट रक्तरंजित थरार..
Nagpur Crime : दिवाळीच्या दिवशी कारसमोर फटाके फोडण्यास विरोध केल्याने अमन सपाटे या तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. मुख्य आरोपी अक्षय मडावी याच्यावर यापूर्वी 22 ते 25 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फटाके फोडू नका म्हटल्याने तरुणाची हत्या
नागपुरात थेट रक्तरंजित थरार..
Nagpur Crime : दिवाळीच्या दिवशी कारसमोर फटाके फोडण्यास विरोध केल्याने एका तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपुरातील बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनगर परिसरात ही घटना घडली. अमन उर्फ बॉबी सपाटे असे मृत तरुणाचे नाव असून तो हुडकेश्वर परिसरात राहत होता. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अमन आपल्या काही मित्रांसोबत देवनगर परिसरात गेला होता. त्यावेळी त्याच्या कारसमोर काही तरुण फटाके फोडत होते. कारसमोर फटाके का फोडत आहात, अशी विचारणा अमनने केली. मात्र, या किरकोळ कारणावरून आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी आक्रमक होत अमनवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
अमनच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांसह मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला
या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव अक्षय मडावी असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय आणि त्याच्या तीन साथीदारांनी अमनवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर अमनला सुरुवातीला नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही घटना घडली होती. अमनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दुसरीकडे, नागपूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून किरकोळ कारणांवरून हत्येच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी छोट्या कारणांवरून चाकूने हल्ले करून हत्या करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जात असल्याने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा : Personal Finance: जुन्या गाड्यांमध्येही दडलाय पैशांचा खजिना! गुंतवणुकीची संधी
या घटनेनंतर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजाजनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांची तडकाफडकी पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. ही घटना घडल्यानंतर प्रकरण हाताळताना आवश्यक संवेदनशीलता दाखवण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. मृत अमनच्या कुटुंबीयांशी आणि मित्रांशी पोलिसांनी केलेले वर्तन असंवेदनशील असल्याचा आरोप करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरात गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने या घटनेची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय मडावी आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात भारतीय न्यायसंहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री उशिरा पोलिसांनी अक्षय मडावी आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेऊन अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय मडावी याच्याविरोधात नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी २२ ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात तो सराईत गुन्हेगार म्हणून वावरत असल्याचे सांगितले जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही तो घातक शस्त्र घेऊन फिरत असताना पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर अमनची हत्या टाळता आली असती, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
