प्रदीप पुर्णेकरांची हत्या झाली त्यावेळी काय घडलं ? FIR मध्ये नेमकं काय?

मुंबई तक

Pradeep Purnekar Murder Case : प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या वेळी त्यांच्या कार्यालयात नेमकं काय घडलं, याचा घटनाक्रम तक्रारीतून समोर आला आहे. पप्या शिंदे घटनास्थळी उपस्थित असल्याने त्याच्यावर संशय का घेतला जात आहे, याची माहितीही तक्रारीत देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Thane Murder Case
Thane Murder Case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

प्रदीप पुर्णेकरांची हत्या झाली त्यावेळी काय घडलं ?

point

FIR मध्ये नेमकं काय?

Pradeep Purnekar Murder Case : ठाण्यातील मानपाडा परिसरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू यशवंत पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरच्या रात्री हत्या झाली. पूर्णेकर हे त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यावर गोळीबार आणि धारदार हत्याराने वार करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी पप्या शिंदे हा हल्ल्याच्या वेळी पूर्णेकर यांच्या कार्यालयातच उपस्थित होता, असा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याशिवाय, आज (दि.1) पोलिसांनी आणखी काही संशयितांना ताब्यात घेतलंय. 

चार ते पाच वेळा फायरिंग झाल्यासारखा आवाज आला अन्..

तक्रारीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्णेकर हे गणेशनगर, मानपाडा येथील कार्यालयात बसले होते. त्यावेळी तक्रारदार आणि राहुल जयस्वाल हे त्यांच्यासोबत चर्चा करत होते. पप्या शिंदे कार्यालयात आल्यानंतर पूर्णेकर आणि पप्या शिंदे यांनी दोघांना बाहेर जाण्याचा इशारा केला. त्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यानंतर निखिल यादव उर्फ शूटर, संतोष कनोजिया उर्फ टल्ली, तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला एक व्यक्ती आणि हेल्मेट घातलेला एक अनोळखी व्यक्ती कार्यालयाजवळ दिसल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर काही वेळातच मागून चार ते पाच वेळा फायरिंग झाल्यासारखा आवाज आला. आवाज ऐकून तक्रारदार आणि राहुल जयस्वाल पुन्हा कार्यालयाकडे गेले. त्यावेळी काही जण दुचाकीवरून पळून जाताना, तर काही जण कार्यालयातून बाहेर पळताना दिसल्याचं तक्रारीत नमूद आहे.

पप्या शिंदेवर संशय कशामुले आला? 

कार्यालयात गेल्यानंतर प्रदीप पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं दिसलं. त्यावेळी पप्या शिंदे त्यांना पकडून असल्याचं आणि त्याच्या कपड्यांवर रक्त लागल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर पूर्णेकर यांना कार्यालयाबाहेर आणण्यात आलं. साईराज क्लिनिकचे डॉक्टर रोहित जैन यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पूर्णेकर यांना मृत घोषित केलं. तक्रारीत पूर्णेकर यांच्या शरीरावर विविध ठिकाणी धारदार हत्याराने वार झाल्याचं नमूद आहे. पप्या शिंदे हा घटनास्थळी उपस्थित असूनही त्याला कोणतीही जखम झाली नाही, तसंच त्याने पूर्णेकर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीयांकडून पप्या शिंदेच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तक्रारीत पप्या शिंदे, संतोष उर्फ टल्ली कनोजिया, निखिल यादव उर्फ शूटर, तोंडाला पांढरा रुमाल बांधलेला एक व्यक्ती आणि हेल्मेटधारी अनोळखी व्यक्ती यांनी संगनमत करून पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजकीय आणि सामाजिक कारणांवरून झालेल्या वादातून पूर्णेकर यांची हत्या केल्याचा आरोपही तक्रारीत आहे. हत्येच्या आदल्या दिवशी पप्या शिंदे पूर्णेकर यांच्या कार्यालयात सुमारे एक तास बसून गेल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पप्या शिंदे पूर्णेकर यांच्या विरोधात गेला होता, असंही तक्रारीत नमूद आहे. पूर्णेकर यांच्या मुलानेही पप्या शिंदे घटनास्थळी उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. मुख्य आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. मात्र, या हत्येमागील नेमकं कारण आणि कोणाची भूमिका काय होती, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे.