लाइव्ह

Maharashtra Lok Sabha Election Live : 'बाळासाहेबांना सर्वाधिक वेदना होत असतील', मोदींनी डिवचलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
social share
google news

Maharashtra Lok Sabha Election 2024 Live News : महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे, तर देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान झाले असून, आता उर्वरित तीन टप्प्यातील मतदान असलेल्या लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा पारा चढला आहे. 

महाराष्ट्रात धुळे लोकसभा, दिंडोरी लोकसभा, नाशिक लोकसभा, पालघर लोकसभा, भिवंडी लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, उत्तर मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा, उत्तर पूर्व मुंबई लोकसभा, उत्तर मध्य मुंबई लोकसभा, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा आणि दक्षिण मुंबई लोकसभा या मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. 

या १३ लोकसभा मतदारंसघात २० मे रोजी मतदान होणार असून, मोजकेच दिवस प्रचारासाठी राहिले आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मतदारसंघावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह, उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत.

वाढलेल्या पाऱ्यातही रोड शो आणि सभांचा धडाका सुरू असून, उमेदवार पायाला भिंगरी बांधून फिरताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील आणि देशातील वातावरण ढवळून निघत असून, यासंदर्भातील सर्व माहिती जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स... (Maharashtra Lok Sabha election 2024 Latest Updates)

लाइव्हब्लॉग बंद

 • 04:02 PM • 15 May 2024

  Maharashtra Lok Sabha election : नकली शिवसेनेला शिक्षा देण्याची तयारी महाराष्ट्राने केलीये -मोदी

  नाशिक येथील सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. मोदी काय म्हणाले पहा प्रमुख मुद्दे...

  मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, "सप्तश्रृंगी मातेला आणि नाशिकच्या श्रीरामचंद्रांना नमन करतो. आपली सेवा हेच माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे", असे ते म्हणाले. 

  - एनडीएला मोठा विजय मिळणार, काँग्रेस वाईट पद्दतीनं हरणार, विरोधी पक्ष नेताही मिळणार नाही.

  - एका नेत्यानं छोट्या पक्षांना काँग्रेसमध्ये मर्ज करण्याचा सल्ला दिलाय, हे यांचे हाल आहे.

  - नकली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणं निश्चित आहे. जेव्हा नकली शिवसेना काँग्रेसमध्ये जाईल तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेबांची येईल. बाळासाहेब म्हणायचे की जेव्हा मला वाटेल की शिवसेना काँग्रेस होईल तेव्हा मी शिवसेना बंद करेल. हा विनाश बाळासाहेबांना सर्वाधिक वेदना देत असेल.

  -नकली शिवसेनेनं बाळासाहेबांचे विचार नष्ट केले. राममंदिर व्हावं हा बाळासाहेबांचं स्वप्न, जम्मूमधून ३७० संपवणं हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण झाल्याची सर्वाधिक चीड नकली शिवसेनेला आलीय. राममंदिर प्राणप्रतिष्ठेला आमंत्रण देऊनही नाकारलं.

  - शिवसेना आणि काँग्रेसची पापाची पार्टनरशीप, यांचं पाप उघड झालंय. सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसला डोक्यावर घेऊन नकली शिवसेना फिरतेय. नकली शिवसेनेला शिक्षा देण्याची तयारी महाराष्ट्रानं केलीय.

  -काँग्रेसचा विचार आहे की, देशातील सरकारं जितकं बजट बनवतात त्यातील 15 टक्के बजेट अल्पसंख्यकावर खर्च व्हावेत. धर्माच्या आधारे देशाचे तुकडे करत आहेत. काँग्रेसनं धर्माच्या आधारे काही वर्षांपूर्वी बजेटला हिरवा झेंडा दाखवलेला.

  - काँग्रेससाठी अल्पसंख्याक केवळ एकच ते म्हणजे वोटबॅंक. देशातील संपूर्ण बजेटच्या 15 टक्के मुसलमानांवर खर्च व्हावेत, मात्र भाजपच्या विरोधानं ते करु शकले नाहीत.

  -गरिबांचं आरक्षण हिसकावून मुसलमानांना देण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीवाल्यांनी नीट ऐकावं. मोदी असं होऊ देणार नाही. धर्माच्या आधारे मतविभागणी आणि आरक्षण होऊ देणार नाही. वंचितांचे अधिकारांचा मोदी चौकीदार आहे.

  - एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना देऊ देणार नाही. धर्माच्या आधारे मतविभागणी आणि आरक्षण होऊ देणार नाही. वंचितांचे अधिकारांचा मोदी चौकीदार आहे. छज्ञपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करणारी माणसं.

  - एका तरुणानं कांद्यावर बोला अशा घोषणा केल्या मोदींच्या भाषणादरम्यान....

   

 • 03:52 PM • 15 May 2024

  Prabir Purkayastha : जितेंद्र आव्हाडांनी का मानले सर्वोच्च न्यायालयाचे आभार?

  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट करत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

  सर्वोच्च न्यायालयाने 'न्यूज क्लिक'चे संस्थापक आणि संपादक प्रबीर पूरकायस्थ यांची अटक बेकायदेशीर ठरवली असून, त्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

  सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर आव्हाड यांनी एक पोस्ट लिहिली आहे. ते म्हणतात की, "एकेकाळी स्वतंत्र ओळख असलेल्या देशातील प्रतिष्ठित सरकारी यंत्रणांचा गलिच्छ कारभार वारंवार उघडा पडतोय."

  "भाजपच्या वळचळणीला गेलेल्या देशातील सर्व यंत्रणांना भविष्यात कधी ना कधीतरी त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारवायांचा लेखाजोखा देशातील जनतेसमोर सादर करावाच लागेल. तूर्तास न्यायालयाचे आभार", असे म्हणत आव्हाड यांनी आभार मानले आहेत. 

 • 02:52 PM • 15 May 2024

  Maharashtra Lok Sabha election : पाठिंबा देण्यास वंचित तयार, पण...; ठाकरेंना आंबेडकरांनी घातली अट

  ठाणे लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. 

  या लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला ४७ हजार ४३२ मते मिळाली होती.

  यावेळी वंचितने निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. रामराम केंद्रे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यांचा अर्ज अवैध ठरल्याने बाद झाला. त्यानंतर वंचितने कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. 

  दरम्यान, राजन विचारे यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. विचारे यांच्या पत्राला वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी अट ठेवली आहे. 

  पाठिंबा हवा असेल, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करायला हवी. उमेदवाराच्या मागणीवर आम्ही पाठिंबा देत नाही. तसे आमचे धोरण आहे, असे विचारे यांना सांगितले आहे. 

  आता ठाणे लोकसभा मतदारसंघात विचारे यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांना विनंती करणार का? हे बघावं लागेल. 

 • 02:38 PM • 15 May 2024

  Maharashtra Lok Sabha election : राज ठाकरेंनी स्वीकारलं भाजपचं निमंत्रण

  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 

  १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानात महायुतीची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेसाठी येणार असून, राज ठाकरे यांनीही या सभेला उपस्थित राहावे म्हणून भाजपकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. 

  महायुतीच्या सभेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 

  "राज ठाकरे १७ मे रोजी महायुतीच्या सभेत भूमिका मांडतील. आम्ही त्यांना विनंती केली आहे की, अजून जास्त वेळ द्यावा. १८ मे रोजी सुद्धा प्रचार करावा. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना बळ मिळेल", असे बावनकुळे यांनी सांगितले. 

 • ADVERTISEMENT

 • 02:15 PM • 15 May 2024

  Maharashtra lok Sabha : अजित पवार सोबत आल्याने भाजपचा मतदार रागावला, पण... -फडणवीस

  एका मुलाखतीत अजित पवार सोबत आल्याने भाजपचा मतदार नाराज झाल्याचे म्हटले जात असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला. 

  त्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, "अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुतीत आल्याने सुरुवातीला आमचा मतदार रागावला होता, पण अखेरीस अजित पवारांच्या वर्तनामुळे आता अवमान होणार नाही, याची खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळे भाजपचा मतदार खडकवासला मतदारसंघात कसा मतदान करतो, हे बारामतीच्या निकालात दिसेल", असे फडणवीस म्हणाले.

 • 09:14 AM • 15 May 2024

  आमदार रवी राणांच्या घरात चोरी

  Mumbai Crime : आमदार रवी रामा यांच्या खार येथील घरामध्ये चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. राणा यांचे स्वीय सहायक संदीप ससे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

  ससे यांच्याकडे घर खर्चासाठी राणा यांनी दोन लाख रुपये दिले होते. ते बेडरुममधील कपाटात ठेवले होते. दरम्यान, राणा यांनी बिहारमधील दरभंगातील अर्जुन राणा या व्यक्तीला घरकामासाठी नोकरीवर ठेवले होते. 

  तो रक्कम घेऊन मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात गावी गेला. होळीसाठी कुटुंबीयांना भेटायला जात असल्याचे त्याने सांगितलं. त्याला कॉल केले तरीही तो प्रतिसाद देत नव्हता. दरम्यान, खर्चासाठी पैशांची गरज पडल्याने ससे यांनी तिजोरी उघडली तेव्हा त्यात पैसे नव्हते. त्यामुळे नोकरावर संशय आला. या प्रकरणी आता पोलीस तपास करत आहेत. 

 • ADVERTISEMENT

 • 08:56 AM • 15 May 2024

  PM Modi in Mumbai : मुंबईत रोड शो, कल्याणमध्ये सभा

  पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होत आहे. येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत असणार आहेत. मुंबईत मोदींचा रोड शो असणार आहे. 

  घाटकोपरमधील एलबीएस रोडवर हा रोड शो असणार असून, अशोक सिल्क मिल ते पार्श्वनाथ चौकापर्यंत असणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. 

  एलबीएस मार्गावरील गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन, माहुल-घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर.बी. कदम जंक्शन, उत्तर व दक्षिण मार्गावरील वाहतूक दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत पूर्ण बंद असणार आहे. 

  या काळात पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबुर लिंक रोड, शीव-वांद्रे लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

  नाशिक-कल्याणमध्ये सभा

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिक आणि कल्याण येथे जाहीर प्रचारसभा होणार आहे. दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारासाठी नाशिकमध्ये दुपारी १ वाजता सभा होणार आहे. 

  कल्याण आणि भिवंडी या चार लोकसभा मतदारसंघासाठी मोदींची प्रचार सभा होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबई आणि कल्याणमधील सभा परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT