‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव नाही’, शरद पवार विरुद्ध संजय राऊत ‘सामना’
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस करत असतानाच आता शरद पवारांनी असं काही होणार नाही, असं म्हटलंय. त्यांच्या भूमिकेनंतर संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Vs Sanjay Raut : ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कोणताही विचार दिल्लीतील नेत्यांच्या मनात नाही”, असं विधान शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केलं आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईतील वज्रमूठ सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईला तोडण्याचा डाव असल्याची भूमिका मांडली होती. त्यानंतर पवारांचं हे मत समोर आल्यानंतर दोन्ही पक्षाची अडचण झाली आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता खासदार संजय राऊतांनी भाष्य केलं आहे.
‘मुंबई तोडण्याचा डाव नाही’, शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवार त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, “मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो.”
संजय राऊतांचा विरोधी सूर, काय मांडली भूमिका?
शरद पवारांच्या याच भूमिकेबद्दल खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विरोधी सूर लावला. त्याचबरोबर दिल्लीतील भाजप नेतृत्वालाही राऊतांनी लक्ष्य केलं.
संजय राऊत म्हणाले, “नाही, असा पूर्णविराम लागू शकत नाही. कारण मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव तर होताच. मग 105 हुतात्मे का मेले? 105 हुतात्मे मुंबईसाठीच मेले ना. याचा विसर कुणालाही पडू नये. वारंवार मुंबईवर हल्ले होताहेत, ते कशासाठी होताहेत? मुंबईला आर्थिक, सामाजिक, भौगोलिकदृष्ट्या कमजोर करणं म्हणजेच मुंबई तोडण्याचा डाव आहे.”