27 dead after massive fire breaks out in building पश्चिम दिल्ली येथील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या इमारतीला भीषण आग लागली. या आगीत होरपळून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेतल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता आहे. या घटनेत १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तर १९ हून जास्त लोक बेपत्ता आहेत ज्यांचा शोध सुरू आहे.
अग्निशमन दलाने या ठिकाणी तातडीने पोहचत आग नियंत्रणात आणण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले. दिल्लीत संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाच्या ३० गाड्या या ठिकाणी पाठवण्यात आल्या होत्या. सुमारे पाच ते सहा तास अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग नियंत्रणात आली. मात्र आत्तापर्यंत या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ हून जास्त लोक बेपत्ता आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. वरूण गोयल आणि सतीश गोयल यांना दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे.
आगीचे लोळ इमारतीत उठत होते, त्या सगळ्यातून सुमारे ७० नागरिकांची सुटका करण्यात आली. या ठिकाणी लागलेली आग भीषण असून जे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यांची ओळख पटवण्याची परिस्थिती नाही अशी माहितीही अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितलं.
सीसीटीव्ही कॅमेरे आणि राऊटर बनवणाऱ्या कंपनीचे कार्यालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रथम आगीचा भडका उडाला. त्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावर पसरली. आग विझवण्यासाठी ३० बंब प्रयत्नांची शर्थ करीत होते, अशी माहिती दिल्ली अग्निशमन सेवेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. आगीत २७ जणांचा होरपळून किंवा गुदमरून मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त समीर शर्मा यांनी दिली.