'उद्धव ठाकरे, तुम्ही उलट्या काळजाचे'; सुप्रिया सुळेंचं नाव घेत आशिष शेलारांचं टीकास्त्र

'उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच'; उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजपचे नेते आशिष शेलारांची खोचक प्रतिक्रिया
ashish shelar uddhav thackeray
ashish shelar uddhav thackeray

शरद पवारांनंतर महाराष्ट्रात विश्वासघात कुणी केला असेल, तर उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असं म्हणत भाजपने नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या मुलाखतीचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत ठाण्यातील पालापाचोळा असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली. यावर बोट ठेवत शेलारांनी सुप्रिया सुळेंना सवाल केला.

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आशिष शेलार काय म्हणाले?

"उद्धव ठाकरेंनी आपल्याच विदूषकासमोर मुलाखत दिलीये. त्यामुळे भाजपने यावर भाष्य करावं की,नाही हा प्रश्न आहे. भाष्य केलंही नसतं, पण सातत्यानं भाजपचा उल्लेख आणि इशारे देण्याचा प्रयत्न केला."

"जेव्हा मुख्यमंत्रीपदावर बसले तेव्हा भाजपला इशारे. जेव्हा शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केलं, त्यानंतरही भाजपलाच इशारे. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळे आहे."

"सुप्रिया सुळे, हा महाराष्ट्रद्रोह नाही का?"

"भाजपबद्दल बोलणं, इशारे देणे, टोमणे मारणे, असं केलं तरच त्यांना महाराष्ट्रात स्थान उरेल. अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांची ही वाईट खोड सहजासहजी जाणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा म्हणत असेल, तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घालून पाडून अपमानित करणं, हे महाराष्ट्राला मान्य नव्हे. आता सुप्रिया सुळे यावर काही बोलणार आहेत का, हा महाराष्ट्रद्रोह नाही का?"

उद्धव ठाकरेजी, तुमची सत्तेची लालसा किती होती -आशिष शेलार

"उद्धवजी, तुम्ही सत्तेत असताना जसे वागलात, तसे आम्ही बिलकूल वागणार नाही. तुम्ही सत्तेत असताना प्रश्न विचारणाऱ्याचं घरात घुसून मुंडण करत होतात. सोशल मीडियावर बोलणाऱ्यांचे सोसायटीत जाऊन डोळे फोडले होते. सरकार धोरणाविरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना घरातून अटक केली. आम्ही असे वागणार नाही."

"तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. पण आजारपणाच्या काळासुद्धा तुमची सत्तेची लालसा किती होती, हे आम्हाला माहिती नाहीये का? कोरोना होता, वाढते अत्याचार, शेतकरी अडचणीत होते, पण त्याही काळात तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा पदभार एका दिवसासाठीही तुम्ही कुणाला दिला नाही. त्यामुळे सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करू नका. त्या आजारपणाच्या काळात तुम्ही ममता बॅनर्जींना का भेटत होतात?," अशी टीका शेलार यांनी केली आहे.

"शरद पवारानंतर उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला"

"२०१७ साली आमच्यासोबत असताना युतीत आम्ही सडलो असं म्हणणारे कोण होते? २०१९ ची लोकसभा. कुणाचे फोटो लावून मतं मागितली? मोदींच्या नेतृत्वामुळे तुम्ही तरलात. विश्वासघात या महाराष्ट्रात शरद पवारांनंतर जर कुणी केला असेल, तर तो उद्धव ठाकरेंनी केलाय," असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

"नितीश कुमार आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारवरून ठाकरेंकडून सातत्याने टीका केली जाते. यावर आशिष शेलार म्हणाले, "नितीश कुमार नक्कीच बरे. त्यांनी विरोधात असताना संघावर (आरएसएस) टीका केली. सोबत आल्यानंतर कधीही टीका केली नाही," असं उत्तर आशिष शेला यांनी दिलं.

"उद्धव ठाकरे, आम्हाला हिंदुत्व शिकवता"

"उद्धवजी तुम्ही आणि तुमची शिवसेना तर इतके उलट्या काळजाचे आहात की, सोबत राहूनही तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. आमच्याबरोबर राहुन सुद्धा तुम्ही संघावर टीका केली. याला काय म्हणणार? जे कश्मीरमध्ये केलं, ते देशहितासाठी केलं. तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता. आषाढी एकादशीला पांडुरंगाला पदस्पर्श न करणारा मुख्यमंत्री आम्ही पाहिला आहे," असं आशिष शेलार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in